व्यसनमुक्ती काळाची गरज निबंध

व्यसनमुक्ती

सध्याच्या काळात जगात आणि भारतात व्यसनाधीनता खूप मोठी समस्या झालेली आहे. त्याला अनेक कारणे देखील आहेत. सहज उपलब्ध होणारी दारू, सिगरेट, अन्य मद्यजन्य आणि अंमली पदार्थ त्याचप्रमाणे तरुण पिढीला सहज उपलब्ध होणारा पैसा यामुळे हे घडत आहे. सगळ्यात मोठी समस्या हीच आहे की सध्या तरुण पिढीच्या हातात पैसा खूप जास्त प्रमाणात खेळतो आहे. पूर्वी पैसा कमवायला स्वतःला कष्ट करायला लागायचे. परंतु आजकाल आई-बाबा मुलांच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी अतोनात कष्ट करत असतात आणि त्यांना पुरेल इतपत पैसा ते त्यांच्या हातात ठेवत असतात. पण त्या पैशाचा खरंच योग्य प्रमाणात उपयोग होतो की नाही? हे मात्र कुठे ना कुठे बघायचे राहून जाते. मग अशा वेळेला तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होते.

तसेच सध्याच्या आधुनिकीकरणामुळे सर्वांचेच जीवन थोड्या मोठ्या प्रमाणात बदलले आहे. त्यांची बदललेली जीवनशैली आणि चकाकीत जगण्याचे तंत्र सगळ्यात महत्त्वाचे आहे. पूर्वी लोकांच्या आयुष्यात तत्वे होती. सर्व माणसांना तत्त्वानुसार राहणे हे जास्त महत्त्वाचे वाटत होते. जर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना सांगितले की, ‘दारू पिणे, सिगरेट फुंकणे, तंबाखू खाणे इत्यादी गोष्टी करणे वाईट आहे, ते करू नये’ तर ती पिढी केवळ आई-वडिलांनी सांगितले आहे या कारणामुळे त्या गोष्टीला कधी आयुष्यात हात लावायची नाहीत! कारण त्यांची तत्वे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची होती. परंतु सध्याच्या आधुनिकीकरणामुळे, वाढत्या औद्योगीकरणामुळे लोकांच्या नवीन शैलीमध्ये व्यसनाधीन होणे याला दर्जेदार मानले जाते, जे कोण व्यसनाच्या आहारी नाहीये त्याला देखील आपल्यासारखे बनवण्याचा प्रयत्न करतात! या सगळ्यांमध्ये तरुण पिढी खूप बरबाद होत चालली आहे. पूर्वी हा प्रश्न फक्त तरुण मुलांमध्ये असायचा. मात्र आता तरुण मुली देखील यात सहभागी होताना दिसतात. त्यांच्या खांद्याला खांदा लावून व्यसनाधीन झालेल्या आपण बघतो. कोणत्याही आयटी पार्क च्या खाली जशी मुले सिगरेटी फुकताना दिसतात, तशाच मुली देखील मोठ्या प्रमाणावर सिगरेट फुकताना आपण पाहतो!

सध्या व्यसनाधीनता एवढी आहे की, तिला आळा घालण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर ‘व्यसनमुक्ती केंद्र’ देखील चालवले जात आहेत. व्यसनमुक्ती ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे, कारण इतके लोक त्याच्या आधीन झाले आहेत की व्यसनमुक्ती करणे हे खूप महत्त्वाचे झालेले आहे! पूर्वीच्या काळात शहरात एखादे व्यसनमुक्ती केंद्र असायचे, परंतु तेच शहरातल्या भागात आता ठिकठिकाणी वेगवेगळे व्यसनमुक्ती केंद्र एनजीओ कडून चालवले जातात. जिथे रुग्णांना मोठ्या संख्येवर पाठवले जाते.

या सगळ्यात तरुण पिढीला प्रत्येक वेळेला का गृहीत धरले जाते? कारण सध्याच्या काळात तरुण वर्ग आणि त्यांची व्यसनाधीनता ही भारतातील सगळ्यात मोठी समस्या आहे! भारताला जर महासत्ता बनायचे असेल, तर त्यात तरुण वर्ग आणि त्यातील पिढीचा सगळ्यात मोठा वाटा असणार आहे. कारण हीच तरुण पिढी भारताचे भविष्य बनणार आहे. जर तरुण पिढीच व्यसनाधीन असेल तर आपले भविष्य उज्वल होणार नाही. म्हणूनच व्यसनमुक्ती होणे आणि त्यावर आळा बसणे हे सध्याच्या काळात खूप गरजेचे झालेले आहे.

व्यसनामुळे कुटुंबच्या कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत. मारहाण, खून, पैशांची चणचण या सगळ्यांमुळे खूप जास्त प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. व्यसनमुक्ती होण्यासाठी अनेक केंद्र उभारली जात आहेत. जे रुग्ण आहेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन देणे, तसेच आजकाल प्रत्येक गोष्टीवर समुपदेशन देण्याचे मार्ग देखील उपलब्ध झाले आहेत, त्यामुळे त्यांना जर व्यसनमुक्तीवर वेळीच समुपदेशन मिळाले तर कदाचित ती पिढी वाचू शकते. अनेक वेगवेगळे एनजीओ देखील व्यसनमुक्ती अभियान उभारत आहेत.

याचप्रमाणे आजकालच्या जगात सगळ्यात जास्त जाहिराती आणि प्रसार माध्यमांमुळे देखील व्यसनमुक्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. ते जाहिराती बनवतानाच व्यसनमुक्ती कशी करता येईल? याचे धडे देतात. सिगरेटला उपाय म्हणून वेगळ्या प्रकारचे च्युंईंगम बनवतात, ते चघळल्यास त्या माणसाला सिगरेटची सवय लागणार नाही याची काळजी घेतली जाते.

तसेच आजकाल नवनवीन प्रकारची औषधे देखील मार्केटमध्ये आलेली आहेत, ज्याने व्यसनमुक्तीला फायदा होतो. अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपण व्यसनमुक्तीवर मात करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा आणि जालीम उपाय म्हणजे स्वतःवर नियंत्रण करणे! एखादा माणूस व्यसनाधीन होत आहे हे त्या माणसाला कळत असते, त्यामुळे त्याने स्वतःहून जर या गोष्टीला आळा घालायचा ठरवले तर कधीच तो माणूस व्यसनाधीनतेकडे झुकणार नाही. त्यामुळे येथे स्वनियंत्रण हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. आपण सगळे मिळून प्रयत्न करूया आणि या भारत देशाला व्यसनाधीनतेकडे जाण्यापासून थांबवूया!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *