महिलांचे सक्षमीकरण
महिला सक्षमीकरण म्हणजे, महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे. त्यांच्या आयुष्यातील निर्णय त्यांनी स्वतःहून घेणे, आणि कुटुंब व समाजात त्यांना समान दर्जा मिळाला पाहिजे. तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाला मान मिळाला पाहिजे. बऱ्याचदा असे होते की जरी समान दर्जा मिळाला, तरी सुद्धा महिलांना त्यांचे स्वतःचे निर्णय घ्यायला मिळत नाहीत. त्यांना बऱ्याचदा वडिलांकडून, भावांकडून आणि नवऱ्याकडून ऐकून घ्यावे लागते. आणि त्यांनी जे निर्णय त्या महिलांसाठी घेतील तेच योग्य असे देखील मानले जाते. त्यामुळे महिलांनी स्वतःचे निर्णय स्वतः घेणे खूप जास्त महत्त्वाचे आहे.
‘महिला सक्षमीकरणाची गरज काय आहे?’
महिला सक्षमीकरणाची गरज भारतात यासाठी आहे, कारण गेल्या कित्येक वर्षांमध्ये भारतात ‘पुरुषप्रधान संस्कृती’ आहे. त्यामुळे बऱ्याचदा महिलांचा आवाज दाबला जातो. त्यांना अनेक प्रकारचे त्रास वर्षानुवर्षे सहन करायला लागले आहेत. त्यामुळे जर महिला सक्षमच नाही झाल्या, तर हा देश पुढे जाणे कठीण आहे. म्हणूनच महिलांनी सक्षम होणे हे काळाची गरज आहे. आणि तसेही महिलांनी सक्षमीकरणासाठी सगळ्यात आधी शिक्षण पूर्ण करणे गरजेचे असते. कारण शिक्षण हा एकच उपाय आहे जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात, नोकरी करू शकतात, स्वतःचे पैसे कमवू शकतात.
फार पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या प्रथा होत्या. त्यामुळे महिलांवर अनेक अत्याचार झाले ते पुढील प्रमाणे –
1. हुंडा प्रथा – अगदी ब्रिटिश काळापासून हुंडा प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. राजाराम मोहन रोय व त्यांचे सहकारी तसेच ज्योतिबा फुले, त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी हुंडा विरोधी प्रथेसाठी खूप पुढाकार घेतला होता. आता कोणीही हुंडा घेऊ शकत नाही, कारण भारतीय राज्यघटनेनुसार जे लोक लग्नाआधी हुंडा मागतात किंवा हुंड्याची गोष्ट करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा कायदा निर्माण केला आहे! त्या कायद्याअंतर्गत जर कोणी आरोप केला, तर तो अत्यंत मोठा गुन्हा ठरतो.
त्यामुळे हुंडा प्रथा ही थोडीफार प्रमाणात कमी झालेली आहे, परंतु आता मुलाकडचे लोक 21 व्या शतकातही हुंडा न मागता गिफ्ट काय देणार? किंवा भेटवस्तू काय देणार? किंवा सोनं किती घालणार? अशा प्रकारे मुलीकडच्यांना विचारतात. आजही बऱ्याचशा राज्यांमध्ये ही प्रथा सर्रास चालू असलेली आपण बघतो.
2. निरक्षरता – पूर्वीच्या काळात महिलांना शिक्षण घ्यायला परवानगीच नव्हती. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कष्टामुळे महिलांना मुलींना शिकायला संधी मिळू लागली आणि निरक्षरता इतकी असायची की त्यांना साधी बाराखडी देखील माहिती नसायची. जर शिक्षणच घेतले नाही तरी विचारांमध्ये प्रगल्भता येत नाही आणि त्यामुळे महिलांचे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खच्चीकरण केले जायचे. त्यांना इतके दुबळ बनवायचे की ते कोणतीही निर्णय स्वतःच्या स्वतः घेऊ शकत नाहीत. त्यामुळे महिलांचे वर्षानुवर्षे अनेक प्रकाराने नुकसान होत राहिले आहे.
3. लैंगिक हिंसा – हा भारतीय राज्यघटनेत तर सगळ्यात मोठा गुन्हा आहे. पूर्वीच्या काळापासून जर त्या स्त्रीला मुलगा झाला नाही, तर तिचे लैंगिक शोषण केले जायचे किंवा जर एखादी स्त्री आवडली आणि ती जर तुमची पत्नी नसेल तरीसुद्धा तिचे लैंगिक शोषण केले जायचे. अशाप्रकारे अनेक वर्ष स्त्रियांनी लैंगिक शोषण ही समस्या सहन केलेली आहे.
4. भ्रूणहत्या आणि घरगुती हिंसाचार – पूर्वीपासून पुरुषप्रधान संस्कृती असल्याकारणाने वंशाचा दिवा मिळावा म्हणून मुलींना खूप त्रास दिला जायचा. जर सुने कडून मुलगा झाला नाही, तर दोष हा सुनेला दिला जात असे. जर चुकून तिला मुलगी झाली तर त्या बाळाला मारून टाकले जायचे यालाच ‘भ्रूणहत्या’ असे म्हणतात. पूर्वीच्या काळी हे सर्रास केले जायचे परंतु आता संविधानाच्या कलमांमुळे त्याचप्रमाणे कायदेमंडळाने बनवलेल्या कायद्याची जोड असल्यामुळे हे प्रमाण खूप कमी झाले आहे. तसेच घरगुती हिंसाचार हा तर स्त्रियांना अनेक वर्षांपासून सहन करावा लागला आहे. आपण बऱ्याचदा वृत्तपत्रांमध्ये अशी बातमी वाचतो की या महिलेला मारहाण झाली, ती मारहाण दुसरे तिसरे कोणीच नाही तर तिच्या नवऱ्याकडून, सासर कडच्या व्यक्ती किंवा तिच्या वडिलांकडून केली जाते. स्त्रियांचे तोंड दाबले जायचे त्यामुळे इतकी वर्ष स्त्रिया सहनच करत आल्या आहेत. फक्त एवढेच नाही तर शैक्षणिक असमानता, विनयभंग हे तर वृत्तपत्रांमध्ये आपण आजही वाचतो आणि बऱ्याचश्या स्त्रियांमध्ये आजही शिक्षणाचा अभाव असल्या कारणाने त्या अन्याय विरुद्ध वाचा फोडत नाहीत. तो अन्याय थांबवण्यासाठी शिक्षण हा एकच मार्ग आहे.
पूर्वीच्या काळापासून बऱ्याचश्या स्त्रियांना फक्त ‘चूल आणि मुल’ यामुळे तिचे मानसिक खच्चीकरण केले जायचे आणि तिने कधीच स्वतःचे मत मांडू नये अशी त्या घरातील पुरुषाची किंवा कर्त्या पुरुषाची इच्छा असायची.
परंतु एक गोष्ट लक्षात ठेवणे खरंच महत्त्वाचे आहे की भारतात ऐतिहासिक काळापासून महिलांची देवी म्हणून पूजा करतात, त्यामुळे त्यांना मान देणे हे गरजेचे आहे. कारण एक स्त्री ही जितकी प्रेमळ असते, तितकीच ती अन्यायाला वाचा फोडणारी ही असते. मुळात आजकालच्या 21व्या शतकात देखील अनेक गोष्टीत सुनेने हे करावे, सुनेने असे वागावे अशा अपेक्षा केल्या जातात. त्यामुळे मुलींना अजूनही थोड्या फार प्रमाणात कमी लेखने, वारंवार तिने स्वतःला सिद्ध करणे या अशा गोष्टी चालूच आहेत. यावर जर मात करायची असेल तर संविधानाद्वारे संरक्षण मिळते हे आधी माहित असले पाहिजे, त्यामुळे महिलांनी संविधानाचा नीट अभ्यास करावा. वेगवेगळे कायदे कसे लागू होतात? हे लक्षात घ्यावे. वेळोवेळी पोलिसांची मदत घ्यावी, आपले शिक्षण व्यवस्थितपणे पूर्ण करावेत. कोणाचाही दबाव जरी असला तरी त्यावर मात करावी. तसेच सगळ्यात महत्त्वाचे शिक्षण पूर्ण झाल्यावरती स्वतःच्या पायावर उभे राहावे, पैसा कमवावा त्यामुळे कोणीच तुमच्यावर हक्क दाखवू शकत नाही. आणि जर स्त्रिया स्वतंत्र असतील तरच त्या स्वतःसाठी मत मांडू शकतील आणि होणाऱ्या अन्यायाला थांबवू शकतील.