पाणी वाचवा जीवन वाचवा

पाण्याला आपण ‘जीवन’ असे म्हणतो! पृथ्वीतलावर जरी ७०% भूभाग हा पाण्याने व्यापला असला, तरी समुद्राचे पाणी फक्त काही जीवनाचं उपयोगी असते. ७% पाणी पृथ्वीतलावर आहे जे चांगले पाणी आहे, समुद्राचे सोडून आहे. ते पाणी मानव आणि इतर काही प्राण्यांच्या जगण्याला उपयोगी आहे.

त्यामुळे मानवाच्या नशिबात फक्त तीन टक्के इतके चांगले पाणी आहे! आणि जर ते आपण चांगल्या पद्धतीने नीट वापरले, तरच आपण आयुष्यात जिवंत राहू शकू. माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या गरजा आहेत. त्यात पाणी ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गरज आहे, म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात.

पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पाण्यामुळे झाडे जिवंत राहतात आणि झाडांमुळे मानव! त्यामुळे हे ऋतुचक्र जर नीट चालवायचे असेल, तर आयुष्यात पाणी असणे खूप गरजेचे आहे.

पाणी हा पर्यावरणाचा एक घटक आहे. तसेच सर्व ऋतुचक्रातीलही एक घटक आहे. पाण्याची वाफ होऊन ढग तयार होतात आणि ढग संपूर्ण तयार झाल्यावरती पाऊस पडतो, हे चक्र सतत चालू राहते. परंतु सध्याचे प्रदूषण या निसर्गचक्राला अगदी खराब करून टाकते. जवळ-जवळ सगळेच ऋतुचक्र सध्या बदलले आहे. नोव्हेंबर मध्ये पडणारा अवकाळी पाऊस असू दे की मे मध्ये पडणारी थंडी.

कारखाने आणि इतर गोष्टींमुळे संपूर्ण पर्यावरण खूप दूषित झाले आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे देखील पाण्याचे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर होते. कारखान्यांमधून सोडले जाणारे घाणेरडे द्रव्य देखील रोज नदीच्या पात्रात येऊन मिळते, त्यामुळे नदीचे पाणी देखील दूषित झालेले आढळते.

पाणी हे काय नुसते माणसांनाच लागत नाही, पक्षी आणि प्राण्यांना देखील पाण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावर असते. गाई, म्हशी यादेखील नदीवरती शुद्ध पाणी पिण्यासाठी येतात, परंतु नदीच जर दूषित असेल तर मानवासहित बाकीच्या प्राण्यांना देखील दूषित पाणीच प्यायला मिळते.

शहराच्या ठिकाणी जिथे पाणी अगदी सहजपणे उपलब्ध आहे, तिथे राहणारे लोक पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग करतात. परंतु गावांमध्ये जिथे पाणी अगदी सहज उपलब्ध होत नाही, तिथे बायका दोन-दोन तास विहिरीतून आणि नदीतून पाणी आणून आपल्या घरातील पाण्याची समस्या दूर करत असतात.

म्हणजेच काय तर शहरातील लोक पाण्याचा नीट साठा करून ठेवत नाहीत. त्याचप्रमाणे रोज शॉवरच्या खाली आंघोळ करायचे, त्यासाठी लागणारे इतके जास्त पाणी, त्याचा दुरुपयोग करायचा. हे दुष्टचक्र रोज चालू राहते, शहरात राहणारी माणसे अशा पद्धतीने जीवनशैली जगतात, त्यातून त्यांना कळतच नाही की ते पाण्याचा किती दुरुपयोग करत आहेत!

दहा-दहा किलोमीटर डोक्यावर हंडा घेऊन जाणाऱ्या बायकांकडे बघून मात्र पाणी नसल्याची सत्य परिस्थिती आणि भीषण अवस्था डोळ्यांसमोरून जाते. म्हणूनच आजकाल सरकारने शहरी भागांमध्ये एक दिवसाआड पाणी सोडणे, थोड्या पाण्याची कपात या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या दिसून येतात.

शहरातील ज्या लोकांना पाणी सहज मिळते, त्यांना त्यांची किंमत नाहीये. जितके जास्त पाण्याचे प्रदूषण करू तितका जास्त पृथ्वीवर असलेला थोडाफार पाणीसाठा आपण संपवतोय. मग येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागणार आहे. आधीच मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत आहे, त्यामुळे न मिळणारा ऑक्सिजन आहेच आणि त्यात भर म्हणून आपण पाण्याची देखील नीट काळजी घेतली नाही तर पुढच्या पिढीला ऑक्सिजन आणि पाणी हे फक्त चित्रांमध्येच दिसून येईल. त्या पिढीला त्याचा सगळ्यात मोठा त्रास होईल.

गेल्या दोन-तीन वर्षात ऋतू चक्रातला झालेला बदल हा खूप मोठा आहे. अवकाळी पावसाने जागोजागी थैमान घातलेले आपल्याला दिसते, त्यामुळे पिकांचे खूप नुकसान होते. शेतकऱ्याचे देखील खूप नुकसान होते आणि या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई झालेली सुद्धा आपण बघतो.

मुळात पाण्याचे इतके प्रदूषण आपण करत आहोत, समुद्रात आणि नदीत आढळणाऱ्या कित्येक माशांच्या प्रजाती नष्ट होताना दिसून येत आहेत. काही कासवांच्या प्रजातींना देखील खूप मोठ्या प्रमाणावर हानी जाणवत आहे. ‘साऊथ आफ्रिका’ या देशातील एक कासवाची प्रजाती तर मागच्याच वर्षी नष्ट झाली, कारण त्या शेवटच्या कासवाच्या तोंड काचेच्या तुकड्यामुळे फाटले गेले आणि त्याने तो तुकडा गिळल्यामूळे त्याचा मृत्यू झाला! मग हा काचेचा तुकडा बाकीच्या प्राण्यांनी तर तिथे नेऊन ठेवला नसणार! म्हणजे मानवाच्या चुकीमुळे ही गोष्ट घडलेली आहे! आपण मानव एकूणच संपूर्ण पर्यावरणाला हानी पोहोचवत आहोत आणि हे जितक्या लवकर आपल्याला समजेल तितके बरे आहेत आणि त्यावर मात करणे खूप जास्त गरजेचे आहे. म्हणूनच छोट्या-छोट्या गोष्टीतून आपण पाणी वाचवू शकतो. जसे अंघोळ करताना एका बादलीतच आंघोळ करावी, ब्रश करताना बेसिनचा नळ चालू ठेवू नये, कपडे खूप कमी पाण्यात धुवावेत तसेच सांडपाण्याचा परत प्रक्रिया करून वापर करावा. जो पाण्याचा साठा आहे त्याचे नीट संवर्धन करावे. या अशा छोट्या-छोट्या दैनंदिन सवयी मधून देखील आपण पर्यावरणाचा खूप मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होण्यापासून थांबवू शकतो. म्हणूनच पाणी वाचवा आणि जीवनही वाचवा!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *