विज्ञान शाप की वरदान
पृथ्वी निर्माण झाल्यावर, सगळ्यात पहिला जीव ‘अमिबा’ याला मानला जात! जेव्हा माणसाचा काळ सुरू झाला, तेव्हा तो अश्मयुगात होता. अश्मयुगापासून ते आजच्या एकविसाव्या शतकापर्यंत, आपण म्हणजे संपूर्ण मानव जातीने जी प्रगती केली ती फक्त विज्ञानामुळेच शक्य झालेली आहे. अगदी बाकीच्या ग्रहांवरचे देखील अभ्यास माणसाने या काळात केले. इतकेच नाही तर माणूस हा एकमेव प्राणी आहे, जो दुसऱ्या ग्रहावर जाऊन देखील आलाय! माणसानेच फक्त अशा प्रकारे स्वतःचा विकास केला आहे. बाकीचे प्राणी जसे की कुत्रा, मांजर व इतर हे जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत एकाच अवस्थेत राहतात.
हे सर्व शक्य झाले आहे कारण आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे वापरायचे हे शिकलो आणि विज्ञानामुळे तंत्रज्ञानाची देखील प्रगती झालेली आहे. अगदी सफरचंद डोक्यावर पडल्यावर न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम सगळ्यात पहिले जगाला दिला, तिथपासून ते चंद्रयान-३ पर्यंतचा प्रवास माणूस खरंच विज्ञानामुळेच करू शकला.
विज्ञानामुळे आपल्याला अनेक सोयीसुविधा मिळतात. माणसाचे दैनंदिन आयुष्य खूप सुखी झाले आहे. तसेच पूर्वीच्या काळी जेव्हा तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते, तेव्हा एका कामासाठी अनेक माणसे लागायची. जसे की जर एखाद्या स्टीलच्या कंपनीत मोठमोठ्या गोष्टी उचलायला पूर्वी जर शंभर माणसे लागायची, तर आता वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर मुळे आणि विकसनशील तंत्रज्ञानामुळे तेच काम दोन माणसात शक्य होऊ लागले आहे.
पूर्वी ज्या गोष्टी बनवायला दहा ते पंधरा दिवस लागायचे, तेच काम मशीन मुळे आणि तंत्रज्ञानामुळे आपण दोन दिवसात करू शकतो. कमी माणसांमध्ये आणि कमी वेळात आपण सर्व कामे पूर्ण करू शकतो.
आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, आपण विज्ञानाचा अनेक गोष्टींमध्ये उपकरणांमध्ये वापर करतो जसे सकाळी उठल्या उठल्या आपण ‘केटल’ वापरतो, ज्यात पाणी आपोआप गरम होऊन येते. त्यानंतर गॅस गिझर किंवा इलेक्ट्रॉनिक गिझरचा वापर करून, आपण अंघोळ करतो. ब्रेकफास्ट साठी आपण ब्रेड टोस्ट करतो. त्या उपकरणात दोन मिनिटे ठेवला, की तो टोस्ट होऊनच वर येतो. अशा एक नाही अनेक गोष्टींसाठी आपण तंत्रज्ञानाचा सतत वापर करत असतो.
तंत्रज्ञानाचा विकास झाल्यावरती, दळणवळणात देखील खूप फरक पडला आहे. पूर्वीच्या काळात माणसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला घोड्यांचा, गाढवाचा, बैलांचा वापर करायचे. परंतु आता खूप कमी वेळात आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. आता अनेक सोयी- सुविधा विज्ञानामुळे उपलब्ध झाल्या आहेत. खूप लांब जायचे असल्यास माणूस विमानाचा वापर करतो. जवळच्या ठिकाणी जायचे असेल ट्रेनने जातात. अगदी खूप जवळ जायचे असेल तर रिक्षा देखील वापरतो. नाहीतर स्वतःची दुचाकी घेऊन जातो, ट्रेन व जहाज यासारखे गोष्टींचा देखील वापर करतो. म्हणजेच काय दळणवळण हे विज्ञानाचे एक खूप मोठे शस्त्र आहे. तसेच अजून एक महत्त्वाचा शोध माणसाने लावला तो म्हणजे ‘विजेचा’ शोध.
ज्या दिवशी विजेचा शोध लागला, त्या दिवसानंतर तर माणसाचे आयुष्य खरंच खूप सुखकर झाले. आज आपण जी उपकरणे रोजच्या जीवनात अगदी सहज वापरतो. ती विजेच्या गोष्टींनी बनलेली असतात. अशा एक नाही तर कितीतरी महत्त्वाच्या घटना घडल्या जातात माणसाने विज्ञानाचा आधार घेऊन खूप गोष्टींमध्ये प्रगती केलेली आहे. विज्ञान हे माणसासाठी एक वरदानच ठरलेला आहे!
परंतु जसे चंद्रावरती सुद्धा डाग असतो. तसेच प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या मागे एखादी वाईट गोष्ट असतेच. विज्ञानाचा खूप फायदा जरी आपण दैनंदिन जीवनात करत असलो, तरी अति विज्ञानाच्या वापरामुळे बरेचसे तोटेही निर्माण झालेले आहेत ते कोणते ते पाहूया.
विज्ञानाचा अतिवापर त्याने होणारे दुष्परिणाम हे माणसाला भोगावे लागत आहेत. विज्ञानाच्या अति शोधांमुळे आपण अणुशक्तीची हत्यारे सारख्या भयानक गोष्टींचा देखील शोध लावला. आत्ताच्या कलियुगात अणुशक्तीची हत्यारांना मान दिला जातो. ज्या देशाकडे अणुशक्तीची हत्यारे असतात त्या देशाला एक वेगळ्या जागतिक दर्जा मिळतो.
खरेतर किती वाईट आहे, कारण या न्यूक्लियर फॉर्मचा माणसांवर खूप वाईट प्रभाव पडतो. माणसे अपंग होतात. खूप मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होते. परंतु विज्ञानाच्या या शोधामुळे बरेचसे देश जागतिक दर्जा उंचावण्यासाठी या शक्तीचा वापर करताना आपण बघतो.
विज्ञानात आणि तंत्रज्ञानात झालेल्या अति प्रगतीमुळे AI आणि बाकीच्या नवीन आलेल्या ॲपमुळे संपूर्ण मार्केट झोपवला आहे. लोकांच्या नोकऱ्या जायला लागल्या आहेत. शंभर माणसांचे काम एका तंत्रज्ञानामुळे शक्य झालेले आहे, त्यामुळे आपसूकच १०० लोकांचे जॉब जात आहेत.
तंत्रज्ञानामुळे ‘सोशल मीडिया’ हा प्लॅटफॉर्म सर्वजणांना हातात मिळत आहे. त्यामुळे कोणाच्याही आयुष्यात आपण अगदी सहजतेने दखलंदाजी करू शकतो. त्यामुळे मुला-मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सोशल मीडियाचा अतिवापर बुद्धिमत्तेला थांबवणाराच ठरतो, कारण आपण संपूर्ण वेळ मोबाईलवर घालवतो आणि स्वतःच्या बुद्धीचा काहीच वापर करत नाही. या वाढत्या तंत्रज्ञानामुळे अनेक ठिकाणी युद्ध होत आहेत, दहशतवादी हमले होत आहेत, आजारपणाला आपण निमंत्रण देत आहोत. तंत्रज्ञानामुळे आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे विकार होतात, लहान मुलांना चष्मे लागतात. लोकांमध्ये हार्ट-अटॅकचे प्रमाण वाढलेले दिसते. अशा एक नाही अनेक गोष्टींना आपण रोज सामोरे जातो, त्यामुळे त्याचा वापर किती करायचा हे आपण ठरवले पाहिजे.