वाचाल तर वाचाल

वाचाल तर वाचाल! हे बोधवाक्य सगळ्या शाळा, कॉलेजेस मध्ये वापरले जाते. यातून मुलांना वाचण्यासाठी प्रवृत्त केले जाते. आपल्या लहानपणी आपण अगदी बाराखडी ‘क, ख, ग’ पासून आईने आणि शिक्षकांनी शिकवल, पण तरीसुद्धा आपण निरक्षर ते अक्षर हा प्रवास पुस्तकांमुळेच पूर्ण करतो.

मुळात ‘पुस्तके’ ही आपल्याला आयुष्याचे धडे देतात. कारण प्रत्येक पुस्तकाचे विषय हे वेगळे असतात. प्रत्येक लेखक त्याच्या पुस्तकातून आपल्याला आयुष्याचे वेगवेगळे अनुभव देण्याचे काम करत असतो. त्यामुळे जितकी जास्त पुस्तके आपण आयुष्यात वाचतो, तितके आपण विचारांनी प्रगल्भ बनतो. नवनवीन शब्द शिकतो. त्याचप्रमाणे कोणत्या परिस्थितीत कसे वागावे? याचे देखील आपल्याला त्यातून शिक्षण मिळते. म्हणजेच काय तर पुस्तके आपल्याला खूप काही शिकवून जातात.

पुस्तकांमुळे आपण प्रगल्भ होतो. आपल्याकडे जर ज्ञान असेल तर आपण बाहेरच्या जगात लोकांमध्ये स्वतःची मते मांडू शकतो. जर आपल्याला काही माहितीच नसेल कोणत्याही विषयाबद्दल, तर आपण कोणत्याच गोष्टींमध्ये आपले स्वतःचे मत मांडू शकत नाही.

पुस्तकांमुळे आपले व्यक्तिमत्व बदलते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. म्हणजेच काय तर पुस्तके वाचून आपण जे काल होतो, त्यात बदल होऊन आपण आज काहीतरी नवीन असतो. साध्या शब्दांत सांगायचे झाले, तर पुस्तके हे आपल्या आयुष्याशी खूप संबंधित असतात. पुस्तकांमध्ये असणारे व्यक्तिमत्व हे आपल्याला अगदी आपल्या जवळचे वाटते. कधीकधी तर आपलेच व्यक्तिमत्व या पुस्तकात लिहिले आहे का? असा आपल्याला प्रश्न पडतो. त्यामुळे पुस्तकात असणाऱ्या पात्रांचा प्रवास आपल्याला समजून घ्यायला खूप मजा येते. कारण ती पात्रे आपल्याला आपलीशी वाटतात. त्यांचा संघर्ष हळूहळू आपला संघर्ष बनतो. त्यांनी त्या संघर्षावर केलेली मात ही आपल्याला अगदी जवळची वाटते. कारण आपणही रोजच्या आयुष्यात अनेक उलाढाली करत असतो. अनेक गोष्टींवर मात करत असतो. म्हणूनच पुस्तके आपल्याला सतत वेगळे अनुभव देऊन जातात.

पुस्तकांमुळे एक वैचारिक समृद्धी येते. जेव्हा आपल्या कोणत्याही गोष्टीत अडथळा निर्माण होतो. तेव्हा वैचारिक प्रकल्पासाठी वेगवेगळ्या कादंबऱ्या, ललित लेख, कविता अशा प्रकारची पुस्तके वाचल्यास आपल्याला वैचारिक खुराक मिळतो. पुस्तके वाचून आपण माणूस म्हणून खूप चांगल्या पद्धतीने घडतो. मोठमोठे लेखक म्हणूनच म्हणतात, की पुस्तकांमुळे पिढ्या घडतात किंवा बिघडतात.

आजकाल लहान मुलांचा पुस्तक हा खूप मोठा मित्र झाला आहे. कारण त्यांचे आई-बाबा दोघेही नोकरी करणारे असतात. मग ते आपल्या बालकाला पाळणाघरात ठेवून जातात. अशा वेळेला लहान मुले पुस्तकाचा आधार घेतात. पुस्तके त्यांना कधीच एकटा पडू देत नाही. तसेच म्हातारे आजी-आजोबा देखील वेगवेगळे पुस्तक वाचून आपला वेळ घालवतात. आजी-आजोबांकडे तशी करायला फार जास्त काही कामे नसतात. मग अशा वेळेला वेगवेगळी पुस्तके वाचून, त्यातून त्यांना स्फूर्ती येते. नवीन काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते. म्हणूनच पुस्तके आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत.

आपणही पुस्तकाला एकटे नाही सोडायचे. म्हणजे एक पुस्तक संपल्यावर दुसरे पुस्तक वाचायचे असते. त्यातून आपला व्यक्तिमत्व विकास होतो. आपल्या आयुष्यात वैचारिक प्रगल्भता येते.

पुस्तकांची अजून एक खूप मोठे वैशिष्ट्य असते, ते म्हणजे पुस्तके आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातात. ज्या जगात जाण्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. अशा जगात पुस्तके आपल्याला घेऊन जातात. कधी आपण परदेशात जातो, तर कधी भुताच्या जंगलात, कधी परी कथेत जातो, तर कधी आजीच्या बटव्यात! म्हणूनच पुस्तके खूप सुंदर निसर्गाचे वर्णन करून सांगतात. त्यामुळे ते चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. पुस्तकांमुळे आपण कित्येक क्षण नुसते वाचत नसतो, तर ते जगत असतो. पण त्यासाठी आपण तितके मग्न होऊन पुस्तकाचे वाचन केले पाहिजे. तरच ती मजा आपल्याला घेता येईल.

माझ्या लहानपणी तर माझ्या बाबांनी मला अनेक पुस्तकांचे संग्रह आणून दिले होते. पण माझ्या बालपणीची सगळ्यात जास्त आवडती पुस्तक म्हणजे ‘चिंटूची’ पुस्तके. चंपक नावाचा एक मासिक यायचे. त्यात बरेचसे व्यंगचित्र आणि छोटे-छोटे लेख असायचे. ‘छात्र प्रबोधन’ नावाचा दिवाळी अंक आम्ही सगळे दिवाळीत एकत्र वाचायचो. माझ्या आजीच्या घरी कोकणात, आम्ही सगळे भाऊ-बहीण मिळून छात्र प्रबोधन वाचायचो. त्यातील आकाश कंदील एकत्रपणे बनवायचो.

पुस्तके आपल्याला जगणे देतात. म्हातारपणीचा आधार देतात.

सध्याच्या आधुनिक काळात पुस्तके जणू नामशेष झाले आहेत. परंतु सगळ्यांपेक्षा वेगळे सिद्ध व्हायचे असेल, तर पुस्तके वाचणे आणि स्वतःचे विचार बदलणे, हाच मार्ग आहे. त्यामुळे जर वाचले-लिहिले तरच तुम्ही स्पर्धात्मक युगात नीट उभे राहू शकाल. म्हणूनच खरच मोठ्या लोकांनी म्हटलेले मला आज खरं वाटत, की खरंच ‘वाचाल तर वाचाल !’ही म्हण आयुष्यभर लक्षात ठेवावी लागेल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *