सोशल मीडिया शाप की वरदान

सोशल मीडिया म्हणजे काय? तर सोशल मीडिया हे एक माध्यम आहे. जिथे माणसे एकमेकांशी जोडली जातात. नुसत्याच एका राज्यातली किंवा एका देशातले नाही तर जगभरातील सगळ्या व्यक्ती एकमेकांशी सोशल मीडिया द्वारा जोडल्या जातात. त्यामुळेच आपण जग जवळ आले आहे असे देखील म्हणतो.

मुळात सोशल मीडियामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. सोशल मीडिया म्हणजे फक्त अँप्स नाही! तर सोशल मीडिया म्हणजे ‘वेगवेगळे सोशल अँप्स, लिंक्स, ऍडव्हर्टिसिमेंट या सगळ्यांचा एकत्रित रित्या त्या जे काही तंत्रज्ञान बनते, त्याला आपण सोशल मीडिया असे म्हणतो.’

सोशल मीडियाचे काय काय फायदे असतात?

सोशल मीडियामुळे आपण एकमेकांशी जोडले जातो. जगातील कुठलीही व्यक्ती कुणाशीही संपर्क साधू शकते. त्याचप्रमाणे जर एखादा नातेवाईक खूप लांब असेल किंवा आपल्या जवळच कोणीतरी व्यक्ती लांब असेल, तर पूर्वी पत्र हा एकच उपाय होता, परंतु आता तंत्रज्ञानामुळे मोबाईल मुळे आणि सोशल मीडियामुळे आपण त्या व्यक्तीशी एका मिनिटात संपर्क साधू शकतो.

तसेच सोशल मीडियामुळे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षणही घेता येते. म्हणजेच ‘स्किल डेव्हलपमेंट’ करता येतात, नवनवीन गोष्टी शिकता येतात, उदाहरणार्थ जर एखादा कोर्स भारतात उपलब्ध नसेल पण तो अमेरिकेत उपलब्ध असेल, तर आपण भारतात बसून देखील अमेरिकेतील तो कोर्स करू शकतो.

येथे जगभरातील सगळी माहिती आपल्याला अगदी सहज उपलब्ध होते. त्यामुळे तुम्ही जनरल नॉलेज घेऊ शकता आणि सतत स्वतःला अपडेट ठेवू शकता.

तुम्ही सोशल मीडियावर व्यक्त होऊ शकता. तुमच्या कविता, लेख लिहू शकता आणि सोशल मीडिया वर टाकू शकता.

पूर्वी जर तुम्हाला तुमचे काही लिखाण लोकांसमोर आणायचे असेल, तर पुस्तके लिहिणे किंवा पेपरात देणे हे दोनच पर्याय उपलब्ध होते. परंतु आता तुम्ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या अँप्स वर आणि वेबसाईटवर तुमचे ब्लॉग लिहून टाकू शकता!

सोशल मीडियामुळे तुम्ही तुमचा बिजनेस वाढवू शकता, तुमच्या प्रॉडक्ट बद्दल जाहिरात करू शकता, तसेच सोशल मीडिया वरती प्रमोशनही करू शकता.

तसेच सोशल मीडियामुळे तुमची मेंटल हेल्थ सुधारते, एकटेपणा जाणवत नाही. सध्याच्या काळात सोशल मीडियामुळे जे कोणी एकटे राहतात, त्यांच्याशी आपण अगदी सहज संपर्क साधू शकतो. त्यामुळे आपली मेंटल हेल्थ सुधारण्यात मदत होते.

जसे प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात. तसे काही तोटेही असतात. तसेच सोशल मीडियाचेही फायदे आपण बघितले, आता सोशल मीडियाचे तोटे काय आहेत ते बघूया.

सोशल मीडियामुळे आपल्याला कुटुंबाला वेळ देता येत नाही. सोशल मीडियाचा अती वापर झाल्यामुळे आपण घरातही आणि बाहेरही नुसते मोबाईल किंवा लॅपटॉप बघत असतो, त्यामुळे घरातील लोकांशी आपली चर्चा होत नाही. त्यांची सुखदुख आपण जाणून घेत नाही. मुळात कुटुंब म्हटले की सगळ्यांचे एकत्र बोलणे होणे खूप गरजेचे असते, परंतु अति सोशल मीडियाच्या वापरामुळे हे शक्य होत नाही.

तसेच सोशल मीडियामुळे आपले पूर्णपणे कामात लक्ष नसते, सतत आपले लक्ष विचलित होत राहते. वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट लाईक करणे, कोणाला फॉलो करणे, आपल्या आवडत्या व्यक्तीने काय पोस्ट केले आहे? हे बघणे या सगळ्यात इतका वेळ निघून जातो कि आपले कोणत्याही कामात पूर्णपणे लक्ष राहत नाही.

तसेच अति सोशल मीडियाच्या वापरामुळे आपण त्या गोष्टीच्या आहारी जातो आणि दुसऱ्या काही गोष्टी करायला मागत नाही. सोशल मीडियाचे व्यसन हे सध्याच्या काळात खूप मोठी समस्या झाली आहे, कारण ही तरुण पिढी सध्या सोशल मीडिया वरती खूप जास्त प्रमाणात अवलंबून आहे आणि त्यामुळे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत.

सोशल मीडियाच्या वापरामुळे तुम्ही एखाद्या जागी फक्त शरीराने असता मात्र मनाने तुम्ही कोणी काय पोस्ट केले असेल? कोणाचे काय चालले असेल? या विचारात असतात, त्यामुळे तुमचे चित्त एका ठिकाणी स्थिर राहत नाही. सोशल मीडिया हे एक माध्यम आहे, त्याला आयुष्य बनवायचे नाही! हे कळणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर हा प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. सोशल मीडिया हे शाप आहे का वरदान हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामांसाठी केला तर आपण वर बघितलेल्या सगळ्या गोष्टी या वरदान ठरू शकतात, परंतु तेच तुम्ही सोशल मीडियाच्या आहारी गेला आहात आणि त्याचा अतिवापर करत आहात तर सोशल मीडिया तुमच्यासाठी शाप ठरू शकते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *