निसर्ग माझा मित्र निबंध | निसर्ग आपला सोबती निबंध

निसर्ग माझा मित्र निबंध | निसर्ग आपला सोबती निबंध

या संपूर्ण अवकाशात आपली ‘पृथ्वी’ हा एक ग्रह आहे. पृथ्वीतलावर पशु, पक्षी, डोंगर, नद्या, माती, पाणी, हवा, झाडे, फुलं, फळ व फुलं अशा असंख्य गोष्टी आहेत. निसर्ग, सृष्टी कोणी निर्माण केली? याचे उत्तर अजूनही अनुत्तरितच आहे. कोणी म्हटलं की अमिबा हा पृथ्वीतलाचा पहिला जिवाणू आहे. त्यानंतर सगळे जीवसृष्टी निर्माण झाली, परंतु याचे कोणतेही वैज्ञानिक कारण आपल्याकडे अजून मिळालेले नाही! त्यामुळे ही जीवसृष्टी कोणी निर्माण केली? कशी निर्माण केली? काय काय गोष्टी यात होत आहे? हे अजून कोणालाच उलगडलेले नाही. सामान्य माणूस असू देत की मोठे मोठे शास्त्रज्ञ याची कारणे अजूनही शोधत आहे.

या जीवसृष्टीत अनेक घटक बघायला मिळतात. निसर्ग हा कोणताही एक घटक नसून अनेक घटकांचा मिळून एक असा सामुदायिक घटक तयार होतो. निसर्गामध्ये असंख्य गोष्टी असतात. जसे फक्त फुलांचे उदाहरण घेतले तर भारतातच 2,300 पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती सापडतात. हे झाले फक्त फुलांचे! तसेच वेगवेगळ्या प्रकारची फळे, पक्षी, प्राणी, असंख्य प्रकारची झाडे, डोंगर, प्रत्येक डोंगराचे वेगळे आकार, प्रत्येक डोंगराला मिळालेले वेगवेगळे वरदान या सगळ्या गोष्टी माणसाला अगदी आश्चर्यचकीत करून सोडतात ज्यांनी कोणी ही निसर्गसृष्टी बनवली आहे तो निर्माता महान आहे हे नक्कीच!

निसर्गसृष्टीत किती गोष्टी या वेगळ्या आहेत. साध्या फुलपाखराच्या रंगाला सुद्धा किती छटा असतात. निसर्ग कायमच आपल्याला सर्व गोष्टी देत असतो. माणसाला जगण्यासाठी आवश्यक गोष्टी या निसर्गातूनच उपलब्ध होतात. निसर्ग हे एक वरदान मानवासाठीच नाही तर प्राण्यांसाठी देखील आहे. आपण सगळेच निसर्गचक्राचा एक भाग आहोत आणि निसर्ग आपल्याला नैसर्गिक संपत्ती पुरवतो. अगदी फळा-फुलांपासून ते खनिजांपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गातूनच उपलब्ध होतात. या खनिजांमध्ये तेल, कोळसा, वायू, सोने-चांदी, हिरे तसेच अल्युमिनियम व तांबे असे धातू या सगळ्यांचा समावेश होतो.

आजच्या आधुनिक जगात देखील आपण निसर्गावरच अवलंबून आहोत. सोलार सिस्टिम साठी देखील सूर्याची उष्णता लागते किंवा विंड सिस्टीम मध्ये देखील जर हवा नसेल तर ती पवन चक्की फिरणारच नाही, म्हणूनच आपण निसर्गावर अगदी जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत अवलंबून असतो आणि आजच्या या काळात निसर्ग हा आपल्याला सतत सोयी सुविधा देत असतो.

एकविसाव्या शतकात आपल्याला इतर खूप कृत्रिम गोष्टी आनंद देऊन जातात. मात्र ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या गोष्टींना बघून जितका आनंद माणसाला होतो तितका बाकी कशानेच होत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पक्षांचा आवाज, त्यांचा किलबिलाट, माणसाचं मन प्रसन्न करून जातो. तसेच आकाशाकडे पाहिल्या नंतर सूर्याच्या प्रकाशाने मन आनंदून जाते. आकाशात सूर्य उगवण्याच्या वेळेला पिवळसर तांबडा असा रंग असतो आणि सूर्य मावळण्याच्या वेळी तो थोडासा गुलाबीसर केशरी लाल अशा वेगवेगळ्या छटांमध्ये असतो. म्हणजेच काय तर एक सूर्य उगवताना, मावळताना सुद्धा रोज त्याचा रंग बदलतो. रोज त्याला नाविन्य प्राप्त होतं.

निसर्ग म्हणजे खरंच किमयागार आहे. माणसाच्या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी बऱ्याचदा आपण अनुभवतो. लोक सकाळी उठले की मॉर्निंग वॉकला जातात. त्यावेळेला वेगवेगळ्या फुलांचा फळांचा रंग बघून त्यांचा मन प्रसन्न होते. त्याचप्रमाणे पक्षांचा किलबिलाट, सकाळी हवेत असलेला जास्त ऑक्सिजन या सगळ्याच गोष्टी माणसाला महत्त्वाच्या ठरतात. म्हणजेच काय तर निसर्ग आपल्याला सतत देत असतो!

रात्रीच्या वेळेला कधी-कधी चंद्राच्या प्रकाशात नदीतून प्रवास करायला खूप मजा येते, एक विलक्षण वेगळा अनुभव माणसाला मिळतो!

रोज बदलणारे आकाश, त्याचे रंग कधी निळाशार, कधी नारंगी, कधी केशरी, कधी लाल तर कधी जांभळा असे अनेक रंग रोज आपल्याला बघायला मिळतात. पक्षाच्या रंगांमध्ये, त्यांच्या आकारांमध्ये देखील फरक जाणवतो. प्रत्येक फळाचा वेगळा रंग, रूप, व आकार असतो. फुलपाखराच्या रंगांबद्दल तर काही बोलायलाच नको! प्रत्येक पक्षाचे घरटे देखील वेगळे असते! प्रत्येक प्राण्याचे आकार वेगळे असतात!  हा निसर्ग खरंच खूप परिपूर्ण आहे.

ही सृष्टी नेमकी कोणी निर्माण केली आहे हे अजून देखील माणसाला पूर्णपणे कळले नाहीत परंतु त्यातील प्रत्येक गोष्ट ही परिपूर्ण आहे. कारण निसर्गचक्रात दिवसरात्र उन्हाळा-पावसाळा-हिवाळा हे ऋतुचक्र सतत बदलत असते आणि त्यात कधीही कोणताही खंड पडत नाही किंवा दिवसाची वेळ आणि रात्रीची वेळ यात कधीच चक्र बदलत नाहीत. हेच नाही तर भारताच्या दक्षिण भागात जास्त उष्णता असते तर उत्तर भागात बऱ्यापैकी थंडी असते. इतकं परफेक्ट प्लॅनिंग तर माणसाच्या हातून होत नाही.

निसर्ग हा खूप वेगळा आणि अवाक् करणारा प्रकार आहे. निसर्गाचे आपण कायम देणे लागतो पण आपण मात्र त्याचा ऱ्हास करत असतो. आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. माणसाला निरोगी राहण्यासाठी निसर्ग खूप मदत करतो. आजारी होण्यापासून वाचवतो परंतु आपण मात्र त्याची काळजी घेत नाही. शेवटी म्हणावेसे वाटते की निसर्ग हे माणसासाठी खरोखरच एक वरदान आहे!  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *