माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध

Featured Image -maza avadta rutu pavsala

माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी

जीवन निसर्गचक्रामुळे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू भारतात बघायला मिळतात. पण जगामध्ये चौथा ऋतूही बघायला मिळतो, जसं की ‘स्प्रिंग ऋतु’. अमेरिका किंवा युरोपच्या अन्य देशांमध्ये हा ऋतू बघायला मिळतो. भारतात अनेक लोकांना उन्हाळा जास्त आवडतो. कारण उन्हाळ्याच्या सुट्या लागतात, गावाला जाता येते, कुठेही फिरायला जाता येते म्हणून. परंतु मला मात्र लहानपणापासून एकच ऋतू आवडतो. तो म्हणजे पावसाळा!

पावसाळ्यात सगळ्यात पहिल्यांदा मनात येत, तो म्हणजे पहिला पाऊस! ज्या वेळेला मे महिन्यातील कडक उन्हाच्या लाटा कमी होऊन थंड वारा सुटतो. त्यातून खूप भारी म्हणजे, खूप उन्हानंतर पहिल्या पावसात जमिनीवर पहिला थेंब पडतो, त्यातून येणारी वाफ! ही बघायला तर एक वेगळीच, मजा येते. पहिला पडलेला पाऊस मातीचा दरवळणारा सुगंध हा एक वेगळाच अकस्मात अनुभव देऊन जातो. मुळातच पहिला पाऊस हा सगळ्यांनाच खूप आवडतो, कारण पहिल्या पावसानंतर लागणारा ओलावा किंवा पडणारी थंडी ही वेगळीच निसर्गाची किमया आहे. पावसानंतर पक्षांचा होणारा किलबिलाट आणि पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद ही खरंच शब्दात व्यक्त करता न येणारी भावना आहे!

पावसाआधी आणि पावसानंतर बदललेला आकाशाचा रंग हा खूप काही सांगून जातो. पावसाच्या सुरुवातीचा रिमझिम पाण्याचा आवाज हा जोरात पडणाऱ्या पावसाच्या आवाजापेक्षा खूप वेगळा असतो. त्यात विजा चमकत असतील तर त्याचा अनुभव ही वेगळा असतो. विजांच्या कडकडाटात वाटणारी भीती मनाला थोडीशी घाबरून जाते, पण त्यातही आनंद मिळतो.

पहिला पाऊस पडला की जसा मातीचा वास घरभर पसरतो, तसेच सगळ्यांच्या घरी बनणारे चहा आणि भज्यांचे कार्यक्रम! हे तर भारताच्या सगळ्या प्रांतात अगदी महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसानंतर शांत झालेला आकाश, वाहणारा वारा. हा खूपच वेगळा असतो. रात्री जोरात विजा कडकडल्यानंतर आईला मिठी मारून झोपण्याची मजा ही काही औरच आहे.

पावसाळा चालू झाला की गिर्यारोहक मित्रांनाही अति उत्साह संचारतो. सगळे मावळे वेगवेगळ्या गड किल्ल्यांना भेट द्यायला जातात. त्यांना मुसळधार पावसात देखील वाट काढून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा आनंद हा पाऊसच देऊन जातो.

मी माझ्या मामा बरोबर मागच्याच महिन्यात रायगडवर गेलो होतो. आम्ही ट्रेकला सुरुवात केली तेव्हा काहीच पाऊस नव्हता. पण जसे जसे आम्ही वर जात होतो, तसा तसा थंड वारा सुटला, आणि अचानक पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली. पावसात ट्रेक करण्याची एक वेगळीच मजा आहे! एकीकडे पाऊस चालू होता, दुसरीकडे आम्हाला टोकावर पोहोचण्याची घाई होती आणि पोहोचल्यावर आम्ही सगळ्यात पहिले धो-धो पावसात चहाची चव घेतली. तसेच आमचा आवडता छंद म्हणजे पावसाळ्यात सिंहगडावर जाऊन मस्त भाजी भाकरीचे जेवण करायचे आणि रविवार खूप छान रित्या घालवायचा.

पावसाळ्यात निसर्गात देखील अनेक बदल होत असतात. जसे अनेक पक्षी जे कधीच भारतात येत नाहीत ते या दिवसांमध्ये भारतात येतात. थोडे दिवस राहून परत हिवाळा सुरू झाला की परतीच्या वाटेला जातात. फ्लेमिंगो पक्षी तर पावसाळ्यात बघायची एक पर्वणीच आहे!

काही छोटी कासवे देखील त्यांच्या प्रजनन काळात किनाऱ्यावर येतात आणि पावसाळा संपला की परत पाण्यात जातात. पावसाळ्यात मासेमारी ला सुद्धा खूप महत्त्व प्राप्त होते. काही माश्याचा प्रजननाचा काळ पावसाळ्याच्या दरम्यान असतो. म्हणजेच काय तर या जीवसृष्टीत घडणाऱ्या खूप महत्त्वाच्या घटना या पावसाळ्या ऋतुशी निगडित आहेत!

पावसाळ्यामध्ये झाडांची हिरवळ खूप वाढते. सगळ्या झाडांवर बसलेली माती निघून जाते. जणू वर्षभराची सगळी धूळ पावसाच्या पाण्यामुळे निघून जायला थांबली आहे. वर्षभराचा झाडांचा थकवा देखील पावसाळ्यातच भरून जातो. रस्त्यावर किंवा उंच ठिकाणी लावलेल्या झाडांना माणूस रोज जाऊन पाणी घालत नाही. त्या वेळेला पावसाळ्यात पडणारा पाऊस हा त्या झाडांसाठी खूप महत्त्वाचा घटक ठरतो.

पावसाळा हा शेतकऱ्याचा देखील खूप जिवश्य कंठस्य मित्र आहे. म्हणजे काय तर शेतकऱ्याने पावसाळा आधीच पेरणी करून ठेवलेली असते आणि तो मेघ राजाची आतुरतेने वाट बघत असतो. पाऊस आला की त्यांच्या पेरणीला कोंब फुटायला सुरुवात होते जणू एक नवीन जीव या पावसामुळेच जन्माला येत आहे.

आपल्या मराठी भाषेच्या गायनात सुद्धा ‘घननिळा बरसला’ या गाण्याने पावसाचे वर्णन खूप छान केले आहे. पावसाळा आला की श्रावण महिना येतो, हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार अनेक सण हे श्रावण ऋतूपासूनच सुरुवात होते. म्हणजेच काय तर कोणत्याही नवीन गोष्टीला एक पालवी फुटते ती पावसाळा या ऋतूमुळेच! म्हणून मला पावसाळा खूप आवडतो.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *