दिवाळी सणाची माहिती

माझा आवडता सण दिवाळी

आपल्या भारतात अनेक सण साजरे होतात. विविध धर्माचे लोक एकत्र येऊन सगळेजण हे सण अगदी उत्साहात साजरे करतात. त्यापैकीच एक सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा सण तर नुसता भारतातच नाही तर जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो. वेगवेगळ्या देशांमध्ये जिथे भारतीय आहेत आणि भारतीय मंडळे आहेत, तिथे अगदी जोरात दिवाळी साजरी केली जाते. सगळे लोक उत्साहात एकत्र येतात. एकमेकांना भेट वस्तूंचे आदान-प्रदान करतात. लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि पाडवा यासारखे अत्यंत सुंदर दिवस एकमेकांबरोबर साजरे करतात. मुळातच दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास, दिवाळीत कधीच आपल्याला अंधार दिसत नाही. मुळातच हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार दिवाळी हा सण आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून दिव्याच्या लख्ख प्रकाशाने उजळून टाकणारी अशी एक भेट आहे. सगळे लोक उत्साहात एकत्र येऊन अगदी आनंदाने दिवाळी साजरी करतात.

 पूर्वीच्या काळी सहामाही परीक्षा दिवाळीच्या सुट्टीच्या आधी असायची. त्यामुळे सर्व मुलांना परीक्षा संपल्यानंतर सुट्टी मिळायची आणि वेड लागायचे ते दिवाळीचे. दिवाळी हा अत्यंत आनंदमय सण असल्याकारणाने सगळे लोक आपल्या माणसांकडे, आपल्या लोकांकडे धाव घेतात. सर्व कुटुंबाने एकत्रितपणे साजरा करायचा असा हा सण आहे. आजच्या आधुनिक काळात देखील परीक्षा झाल्यावर सगळी मुले उत्साहात एकच सणाची वाट बघत असतात आणि ती म्हणजे दिवाळी.

दिवाळीत आनंदी राहण्यासाठी एक नाही तर शंभर कारणे असतात. म्हणजे दिवाळी येणार म्हणून घरात साफसफाई करायला सुरुवात होते. घरातील सगळे लोक एकत्र येऊन आपापला खारीचा वाटा या साफसफाईत उचलतात. त्यानंतर येती ते दिव्यांची रोषणाई कशी करायची हा विचार? आजी, आई-बाबा सगळे मिळून यावर्षीचा आकाश कंदील काय असेल? किंवा यावर्षी आपण काय नवीन लाइटिंग लावू शकतो का? यावर चर्चा विनिमय करतात आणि शेवटी एक डिझाईन फायनल करून घराला ते सजवले जाते, म्हणजेच काय तर कुटुंबातील प्रत्येक सदस्य दिवाळीत एकत्र येऊन काही ना काहीतरी करून सण खूप उत्साहात साजरा करतो!

दिवाळी म्हटलं की दुसरा सगळ्यात आवडीचा प्रकार डोळ्यासमोर येतो तो म्हणजे फराळ. माझी आजी तर सांगते की पूर्वीच्या काळी आम्ही किलो-किलोच्या भाजण्यांचे पीठ दळून चकल्या करायचो! परंतु आता शहरीकरण आणि आधुनिकीकरणामुळे हे सगळं करणं शक्य नाही. पण तरी आमच्या घरात आजी, आई व आत्या सगळे एकत्र येऊन फराळाचे सगळे पदार्थ उत्तमरीत्या बनवतात. मग तो दोन प्रकारचा चिवडा असू दे की बेसन आणि रव्याचे लाडू! गंमत म्हणजे शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात ज्या बिल्डिंगमध्ये लोक राहतात त्यांच्या घरात बेसन भाजण्याचा खमंग वास आमच्या परीक्षागृहात येतो आणि पेपर वरचे लक्ष आपसूकच दुसरीकडे निघून जाते हे दरवर्षी माझ्यासोबत घडतं. माझी आजी तर रवा लाडू इतकी सुंदर करते की बिल्डिंग मधले सगळे लोक आमचा फराळ कधी एकदा त्यांच्या घरी जातोय याची आतुरतेने वाट बघत असतात! ही प्रथा किती सुंदर आहे की दिवाळीत प्रत्येक गृहिणी आपल्या घरात बनलेला फराळ दुसऱ्यांच्या घरी अगदी उत्साहात नेऊन देते आणि दुसऱ्यांचा घरातील फराळ आपल्या घरात घेऊन येते. प्रत्येक घरातील फराळ हा त्यांच्या त्यांच्या चवीने बनवलेला असतो. प्रत्येकाची फराळ बनवण्याची पद्धत खूप वेगळी असते. चकली जरी एक असली तरी त्याच्या बनवण्याच्या पद्धती शंभर आहेत! अशा अनेक प्रकारांनी बनलेल्या चकल्या आपल्याला फक्त दिवाळीतच खायला मिळतात, ही अशी प्रथा भारतातच अनुभवायला मिळते. बाकीच्या देशांमध्ये पॉटलक वगैरे सारखे प्रकार असतात पण आपल्याकडे फराळाचा पॉटलक असतो.

 माझा आणि आजीचा एक आवडता प्रकार म्हणजे शंकरपाळ्या बनवणे. सुट्टी लागली की मी आधी आजीकडे जातो आणि आजीला विचारतो की, “आजी शंकरपाळ्या कधी करायच्या?” आमच्याकडे शंकरपाळ्यांचा नुसता त्रिकोणी आकार नाही बनवत, तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराच्या शंकरपाळ्या मी आणि आजी मिळून बनवतो! मग त्या तिखट शंकरपाळ्या असू दे किंवा गोड, या सगळ्यात मला खूप मजा येते.

 मामा येताना ‘छात्र प्रबोधन’ नावाचा दिवाळी अंक घेऊन येतो. त्या अंकात सगळ्यात शेवटी आकाश कंदील बनवण्याची एक खूप मजेशीर गोष्ट असते म्हणजे काय तर आपण घरच्या घरीच आकाश कंदील बनवू शकतो असे सामान ते पाठवतात! मग आपण ते कापायचे आणि योग्य पद्धतीने दिलेल्या सूचनांनुसार तो आकाश कंदील बनवायचा. या सगळ्यात खूप मजा येते म्हणून मी मामाची येण्याची अत्यंत आतुरतेने वाट बघत असतो. माझ्या बाबांना तर दिवाळी अंक हे दिवाळी संपल्यानंतर पुढचे चार महिने पुरतात आणि दिवाळी अंकाचे वाचन ते मन लावून करतात.  

 मग येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे ‘फटाके’. माझी आते, चुलत, मामे आणि मावस अशी सगळी भावंडे एकत्र आली की आमचे गॅंग तयार होते आणि आम्ही सगळेजण मामा बरोबर फटाके घ्यायला जातो. ज्याला जे आवडते तो ते घेतो. मला तर फुलबाजी आणि सुतळी बॉम्ब खूप आवडतो. प्रत्येक जण त्याच्या आवडीचे फटाके घेतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या फटाक्यांचे उद्घाटन होते आणि खूप सारे फटाके जरी आणले असतील तरी ते आम्ही तीन दिवसात संपवतो. मग उरलेले दिवस काय तर फटाक्याच्या आणलेल्या माळा सोडवून त्या उडवत बसणं हा आमचा आवडता छंद होऊन बसतो!

दिवाळीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे रांगोळी! मग ती संस्कार भारती असू दे की ठिपक्यांची रांगोळी असू दे. कोणत्याही रांगोळीचे चार ठिपके सुद्धा खूप सुंदर दिसतात! त्या रांगोळीची शान वाढवायला आपली पणतीताई असतेच जोडीला. एकूणच काय रांगोळी आणि दिवे या सगळ्यांमुळे आपल्या घराला जी काही झळाळी येते ती फक्त दिवाळीतच. आणि आमच्या घरात अजून एक गोष्ट घडते. ती म्हणजे आमचे आजोबा गेले त्यावर्षीपासून आम्ही एक नवीन उपक्रम चालू केला आहे. ते जाण्याआधी आम्ही सगळी नातवंडे मिळून आकाशात दिवे सोडायचो. ते गेल्यानंतर आम्ही दिवे सोडणे बंद केले, परंतु माझ्या वडिलांनी दोन वर्षांपासून ही प्रथा परत सुरु केली. त्यांची आठवण म्हणून आम्ही दरवर्षी दिवाळीला आकाशात दिवे सोडतो. त्यांची मनापासून आठवण काढतो आणि सगळे एकत्रपणे दिवाळी साजरी करतो. या दिवाळीत इतकी आनंदाचे क्षण येतात म्हणूनच मला हा सण खूप आवडतो.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *