माझे कुटुंब निबंध मराठी

माझे कुटुंब

आपण ज्या घरात जन्म घेतो आणि ज्या घरात लहानाचे मोठे होतो त्याला आपण ‘कुटुंब’ असे म्हणतो. कुटुंब प्रत्येक माणसासाठी खूप महत्त्वाचे असते. कुटुंब ही आपली खरी ओळख असते. आपण त्या एका कुटुंबाचे आडनाव लावतो. त्यामुळे कुटुंबाची काळजी आपण आयुष्यभर घेत असतो आणि त्यातील प्रत्येक सदस्य हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. कुटुंब हे कधीच एका माणसाचे नसते, एकापेक्षा जास्त असलेल्या माणसांनाच आपण कुटुंब असे म्हणतो.

कुटुंब आपल्यासाठी काही करायला तयार होते. आपल्याला सगळ्या अडीअडचणींपासून वाचवते. जेव्हा आपल्यावर खूप मोठा कठीण प्रसंग येतो, तेव्हा अडीअडचणीला कुटुंबच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते.

प्रत्येकाचे कुटुंब वेगळे असते. पूर्वी भारतात एकत्र कुटुंब पद्धती होती, पण आता न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे.

सगळ्यांची कुटुंब व्यवस्था वेगळी असते ती प्रत्येकाच्या स्वभावानुसार ठरवली जाते. आमचे कुटुंब ही फार आगळे वेगळे असे आहे, आम्ही एकूण सहा जण एकत्र एका घरात राहतो. त्यात माझी आई, माझे बाबा, माझा दादा, वहिनी, आजी आणि मी असे सगळे आहोत. आम्ही सगळे एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत, पण स्वभाव जरी जुळत नसले तरी आमची सगळ्यांची मने जुळलेली आहेत. म्हणूनच आम्ही सगळे आनंदाने एका घरात राहतो.

आजकाल तर फक्त नवरा-बायको इतकच कुटुंब मानले जाते, परंतु तरीदेखील माझी आजी, माझे दादा, वहिनी, आणि आई-बाबा सगळेजण एकत्र गोडीने राहतात.

जशी सगळ्यांची आई असते, तशीच माझी आई सुद्धा खूप प्रेमळ, सगळ्यांची काळजी घेणारी आहे. माझ्या आईला शास्त्रीय संगीत गायला आणि नृत्य करायला फार आवडते. माझी आई संगीताची शिक्षिका आहे. गेली 18 वर्षे ती एका शाळेत संगीत विद्यालयात शिकवत आहे. ती आमच्या सगळ्यांची काळजी घेते. जर कोणाला दुखलं-खुपल तर ती रात्रभर जागून सगळ्यांना व्यवस्थित औषध पाणी देते, आमच्या आवडीचे जेवण बनवते, म्हणूनच बाबा तिला ‘कुटुंबाचा कणा’ म्हणतात. माझी आई खरंच खूप छान जेवण बनवते म्हणून बाकीचे लोक, नातेवाईक तिला ‘अन्नपूर्णा’ असेही म्हणतात. त्यामुळे आमच्या घरात खरंच लक्ष्मी आणि अन्नपूर्णा राहते. माझ्या वहिनीला आम्ही ‘लक्ष्मी’ म्हणतो, कारण ती आल्यावर ती आमच्या घराची भरभराट व्हायला सुरुवात झाली.

माझे बाबा सगळ्यापेक्षा खूप वेगळे, थोडेसे रागीट आहेत. माझे बाबा खरंतर ‘फणसच’ आहेत, म्हणजे बाहेरून काटेरी आणि आतून मऊ! बाहेरून खूप रागीट असल्याचा जरी अविर्भाव करत असले, तरीसुद्धा आतून ते खूप मऊ आणि प्रेमळ आहेत. आमच्या कुटुंबाची काळजी घेतात. सगळं फायनान्शिअल प्लॅनिंग करतात, कोणाला काहीच कमी पडू देत नाहीत. आमच्या सगळ्या गरजा भागवतात. कधी असे म्हणत नाहीत की हे मी देणार नाही! बाबांनी जितके लाड केले तितके लाड कोणीच केले नाहीत. मी एक खेळणे मागितले तर माझे बाबा दहा खेळणी आणून देतात!

माझा दादा खूप प्रेमळ आणि धाडसी आहे. लहानपणापासून त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मी जन्म घेतला, त्यामुळे तो नेहमी मला सगळ्या गोष्टींमध्ये सांभाळून घेतो. माझ्या चुकांवर पांघरून घालतो. त्याने त्याच्या आयुष्यात बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण केली. खूप खडतर प्रसंगातून जाऊन त्याने स्वतःच घर घेतले, गाडी घेतली आणि त्याची सगळी स्वप्ने त्याने खूप लहान वयातच पूर्ण केली, म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो!

माझी वहिनी दोन वर्षांपूर्वी आमच्या घरी आली. ती देखील नोकरी करते. तिला जपानी भाषेचे खूप चांगले नॉलेज आहे! तिला फिरायला आणि जगातील सगळ्या भाषा बोलायला आणि शिकायला फार आवडतात. ती आमच्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे आणि खूप छान आहे. ती आल्यापासून आमच्या घरात खूप आनंदाचे वातावरण असते.

माझी आजी तर आमच्या घरातील सगळ्यात तरुण व्यक्ती आहे! आज 80 वर्षाची झाली तरी, तिच्यातील उत्साह कमी होत नाही. ती खूप प्रेमळ आहे, तिला प्रत्येक गोष्ट छान करायला आवडते. आजी इतके वेगळे-वेगळे पदार्थ करून खाऊ घालत असते, ज्याची नावे कधी ऐकलेली नसतात. आजीला वाती करायला खूप आवडतात. ती तिच्या रिकाम्यावेळी वाती करत बसते. तिला अनेक नवीन गोष्टी शिकायला या वयातही आवडतात. आमच्या घरातील उत्साहाचे भंडार जर कोणी असेल तर ती माझी आजी आहे!

आणि मी! मला पण नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात. मला लिहायला आवडते. मी घरातल्या शेंडेफळ असल्याने सगळ्यात जास्त मस्तीखोर आहे! मला सगळेजण सगळ्या गोष्टी अगदी हातात आणून देतात, सगळेजण माझे खूप लाड करतात. असे छान छोटे सुंदर आमचे कुटुंब आहे! तशी मला फक्त बाबांचीच भीती वाटते. बाकी कोणीच मला ओरडत नाही त्यामुळे सगळेजण खूप भारी आहेत. मुळात कुटुंब आहे म्हणून आपण आहोत!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *