मी शाळा बोलतेय मराठी आत्मकथन

‘शाळा’ आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचे ठिकाण आहे. शाळा हे एक ‘माध्यम’ आहे, जिकडे माणूस आयुष्यभरासाठी घडतो. एक विद्यार्थी म्हणून सुद्धा! आणि एक माणूस म्हणून सुद्धा! आपल्या आयुष्यात शाळेला खूप महत्त्व आहे. माझी शाळा सुद्धा माझ्यासाठी खूप खास होती. ज्यावेळी आपल्याला काही कळत नाही, त्या वयापासून ते दहावी इतका मोठा काळ आपण शाळेमध्ये घालवतो. नंतर आपण शाळेतून बाहेर पडतो. शाळेत असतानाच माणूस घडतो किंवा बिघडतो. शाळेचे संस्कार माणूस आयुष्यभर लक्षात ठेवतो!

शाळेतील शिक्षक कसे आहेत? यावर तुमचे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. माणूस स्वतःला कधीही बदलू शकतो हे जरी कितीही खरे असले तरी सुद्धा माणसाने वेळोवेळी बदलावे, ही भावना शाळा आपल्यात रुजू करते. आपण माणूस म्हणून किती चांगले होऊ शकतो, हे देखील शाळेतून बाहेर पडल्यानंतरच कळते.

मी मागच्या वेळी डोंबिवलीला माझ्या जुन्या शाळेला भेट द्यायला गेले होते.तेव्हा मला खूप आनंद झाला. पण थोडे वाईट देखील वाटले कारण आमच्या शाळेची इमारत पूर्णपणे बदलली होती. ज्यावेळी आम्ही शाळेत शिकत होतो त्यावेळची इमारत आणि आत्ताच्या इमारतीत जमीन आसमानाचा फरक होता. त्यामुळे आम्हाला आमची शाळा आपलीशी वाटत नव्हती. शाळेतून बाहेर पडल्यावर परत आम्ही रियुनियनच्या निमित्ताने एकदा शाळेत आलो होतो. त्यावेळीआमची शाळा आधी होती तशाच अवस्थेमध्ये होती.

पण यावेळच्या खेपेला मात्र शाळा खूपच बदललेली होती. तिची इमारत बदलली होती. तिच्या आजूबाजूचा परिसर बदलला होता. आम्ही असताना तिथे अनेक झाडे होती. पण ती सगळी झाडे कापून तिथे आता नवीन इमारत उभी केली होती. मैदानाच्या ठिकाणी ‘प्लेग्राउंड’ आले होते. जिथे बऱ्याच सोयीसुविधा उपलब्ध होत्या. पण ती मैदानाची जी मजा होती, ती कुठे ना कुठे मी मिस करत होते.

हे सगळं बघून मी पूर्वी आमची इमारत जिकडे होती तिकडे गेले. आमचा वर्ग दहावीचा जिकडे होता, तिथे जाऊन थांबले. इकडे तिकडे बघितले. फळ्यावरनं हात फिरवला. थोडेसे बेंच बदलले होते. फळाही बदललेला होता. पूर्वीचा काळा फळा आता नामशेष झाला होता.

तेव्हा तिथे हळूच आवाज आला! “काय ग पोरी आलीस?” मी जरा इकडे तिकडे बघितले. आणि परत आवाज आला. “ऐकू येते का तुला? मी तुझ्याशी बोलतेये.”  

आता मात्र मी खरच घाबरले! बघितले तर, फळा माझ्याशी बोलत होता! “काय गं पोरी विसरली मला ?अरे वा लग्न पण झाले वाटते? इतक्या वर्षात फिरकली नाहीस शाळेत?” बघितलं तर तो फळा म्हणजेच, ती शाळा माझ्याशी बोलत होती!

“मला तुमच्या सगळ्यांची खुप आठवण येते! तुम्हाला मी आठवते का? तुम्ही एवढेसे होतात तेव्हापासून माझ्याकडे शिकायला येत होतात. तुमचे एवढे एवढेच हात पाय असून उड्या मारत मारत शाळेत येत होतात. आणि शेवटी दहावीच्या वर्गातून मस्त मोठे होईपर्यंत माझ्याकडे रोज येत होतात.”

“तुम्ही तुमच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि मोठा काळ माझ्याबरोबर घालवला. याचा मला खरच खूप आनंद होतो. पण आता मी कोणाला आठवत नाही. बाकीचे विद्यार्थी तर भेटायला पण येत नाहीत.”

“माझ्यातला ज्ञानाचा सागर मी तुम्हाला सतत देत असते. पण आता मी दमली आहे. थकली आहे. माझी इमारत आता बदलली आहे. या सगळ्या बदलांमध्ये मला फक्त एकच गोष्ट छान वाटते. ते म्हणजे माझ्याकडे शिकून गेलेले जुने विद्यार्थी परत शाळेला बघायला, म्हणजेच मला बघायला येतात! यातच मला काय तो आनंद मिळतो.”

“जसे तुम्ही मला आपलेसे केले होते. तुम्ही मला तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक अत्यंत मनापासून बनवला होता. तसे आजकालचे विद्यार्थी नाही येत. आजकालचे विद्यार्थी यूटूब वर बघून जास्त शिकणारे आहेत. त्यांना मी असल्याने नसल्याने काहीच फरक पडत नाही. त्यांच्यासाठी शाळा महत्त्वाची नसून कोचिंग क्लासेस आणि ऑनलाईन मिळणारी माहिती जास्त महत्त्वाची झाली आहे. त्यांचे पालक देखील शाळेला फक्त परीक्षेच्या माध्यम या दृष्टिकोनातून बघतात. त्यामुळे जी आपुलकी तुम्ही मला दिलीत, ती आपुलकी आत्ताच्या विद्यार्थ्यांकडून मला मिळत नाही. म्हणूनच माझी इच्छा असते की तुम्ही लोकांनी तरी मला भेट द्यावी, कधीतरी माझ्याशी गप्पा माराव्या तेवढाच मला आनंद होतो!”

“तुमच्या वेळेला जे शिक्षक शिकवायला होते ते सुद्धा सगळे सोडून गेले. काही रिटायर्ड झाले तर काही देवा घरी गेले. शिक्षकांच्या आयुष्यातील देखील संपूर्ण चढ-उतार आम्ही बघितले. ते शिक्षक आत्ताच्या शिक्षकांपेक्षा खूप वेगळे होते, त्यांनी माझ्यासाठी त्यांचा सर्वस्व अर्पण केले. शाळेचे नाव मोठं व्हावे यासाठी जीव तोडून शिकवायचे, पण ते बिचारे या जगाला निरोप देऊन दूर निघून गेले.” हे ऐकून मला खूप वाईट वाटले.

शाळा आता खूप हळवी होऊन बोलत होती, “तू बघतीयेस ना पोरी माझे संपूर्ण स्वरूपच बदलले, पूर्वी मी ज्या रूपात होते त्यातील काहीच उरले नाहीये सर्वनामशेष झाले आहे, पूर्वी जे मैदान होते ते आता प्लेग्राउंड झाले. माझ्या जीन्यावर बसून तुम्ही जसं तास-तास गप्पा मारायचा ती जागा आता लिफ्टने घेतली आणि बागेची जागा आता मॉडेल मशीन रूमने घेतली. जिथे वर्चुअल गेमिंग आणि बाकीच्या गोष्टी केल्या जातात. माझी तीन मजली शाळा आता सात मजली झाली आहे. सगळे शिक्षक बदलले, जुनं काहीच राहिलेले नाहीये त्यामुळे मला खूप उदास उदास वाटतं. पण आज तू आली आहेस तर मला खूप बरं वाटतंय.”

“अशीच येत रहा गं पोरी आणि तुझ्या बाकीच्या साथीदारांना सुद्धा घेऊन ये! माझ्याशी थोड्यावेळ गप्पा मारा आणि मग परत आपल्या घरी जा.”

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *