गोधडी चे आत्मकथन

‘गोधडी’ हा प्रकार खूपच छान असतो. “मला आज माझ्या आजीने तिच्या गुप्त अश्या बटव्यातून काढाव तस काढल! तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मी कोण? तर मी ‘गोधडी’. तुमच्या आमच्या सगळ्यांचीच लाडकी अशी थंडीमध्ये तुम्हा सर्वांना उब देणारी अशी गोधडी! छान, मऊ, लुसलुशीत. कळले का मी? आता अनेक लोकाना प्रश्न असतात, की मला कसा बर बनवतात? जेणेकरून मी एवढी मऊ, लुसलुशीत होते? तर माझ्या आत आजीच्या अनेक साड्या आहेत. अनेक कापडांची एकत्र गाठ बांधून मला बनवले आहे. या सगळ्या मुळे मी खूप उबदार बनली आहे”.

“मुळात गोधडी म्हणजे सगळ्यांच्या आवडीची गोष्ट. सगळ्यांसाठी मी खूप खास असते. गोधडी अगदी तान्ह्या बाळापासून, म्हाताऱ्या पर्यंत सगळ्यांना फार आवडते. माझ्या मायेच्या स्पर्शाने मी सगळ्यांना आपलंसे करते. लोक सुद्धा मला रात्री पांघरून शांतपणे सुखाची झोप घेतात. अगदी लहान बाळांच्या पहिल्या मायेच्या स्पर्शाची मी साक्षीदार असते. माझ्याच वरती बाळ रांगायला लागत, पहिल पाऊल टाकायला लागत. खेळायला-बागडायला लागत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बोलायला शिकत.”

“ते बाळ मला आयुष्यभर लक्षात ठेवत. लहानपणापासून त्या बाळाला माझी सवय लागल्याने रोज रात्री तो मलाच पांघरून झोपतो. त्याच्या आयुष्याच्या या छोट्याशा गोष्टीचा मी अविभाज्य घटक झालेली आहे. कारण लोक झोपताना सहजासहजी एकच पांघरून रोज घेऊन झोपतात, ते म्हणजे गोधडी, म्हणजेच मी!”

“हिवाळा आला की तो मान माझाच असतो. म्हाताऱ्या आजी-आजोबांची तर मी अगदी जवळची सखी आहे. मला ते सगळीकडे बरोबर नेतात. मुळातच मला बनवताना आजी, आई यांनी त्यांच्या आवडीच्या साड्या आणि कापडाच्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी माझ्यात भरून मग मला बनवले जाते. त्यामुळे त्यांच्या भावना त्यात गुंतलेल्या असतात.”

“मला बनवण्याचे कारागीर सुद्धा वेगळे असतात, ते कलाकार असतात. सगळेजण काय मला बनवू शकत नाही. त्यासाठी ठरलेले कारागीरच उपयोगी ठरतात. साड्यांनी भरलेली मऊ, लुसलुशीत अशी ही गोधडी सगळ्यांनाच खूप आवडते. त्या साड्यांमध्ये आजी-आई यांच्या भावना जडलेल्या असतात. त्या साड्या त्यांना अत्यंत जवळच्या असतात. या सगळ्या गोधड्या देखील ते आपल्या माणसांसाठी बनवत असतात. माझ्यात किती लोकांचा आपलेपणा आहे! याचा फक्त तुम्ही विचार करा. गावात तर मला गुंडाळून लोक थंडीत सगळीकडेच फिरतात. अशी ही मी गोधडी सगळ्यांचीच लाडाची आहे”.

मी परवा परीक्षेत हा निबंध लिहून घरी आले, माझ्या आजी ने शिवलेली गोधडी घेऊन शांत पणे झोपी गेले. काल जेव्हा मी माझ्या खोलीत झोपायला गेले, तेव्हा मला गोधडी माझ्याशी बोलत आहे, असा भास झाला, पण मी दुर्लक्ष केल! आज परत मी दमून ऑफिस मधून घरी आले. इतके दमले होते की मला लवकर झोपायचे होते. माझा डोळा लागणारच, इतक्यात गोधडी माझ्याशी बोलायला लागली. आज ती माझ्यासमोर माझ्याशी बोलायला लागली होती, ते बघून मी खूप घाबरले. काही वेळाने शांत झाले, परत दिवाणावर येऊन बसले.

तेव्हा गोधडी हळूच म्हणाली की, “घाबरू नको, मी काही करणार नाही तुला! मला फक्त तुझ्याशी बोलायचे आहे”. ती बोलू लागली, ती म्हणाली की, “आज ना मला तुझ्या आईची खूप आठवण येते. तुझी आई कायम मला खूप छान स्वच्छ करायची, माझी काळजी घ्यायची”.

“मला कायम आपलेपणाने वागवायची. मात्र जेव्हापासून तिने मला तुझ्याकडे सोडलंय, तेव्हापासून माझी अवस्था खूप बिकट झाली आहे. इतके महिने मी शांत होते. परंतु आता मात्र माझी अवस्था वाईट होऊ लागली आहे. म्हणून आज मी तुझ्याशी बोलत आहे. तुझी आई आणि आजी मला खूप स्वच्छ, नीटनेटकी ठेवायच्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आईने तिच्या पूर्वीच्या आवडीच्या साड्यांनी फाडून मला बनवले आहे. त्या सगळ्या साड्या तिने तुझ्यासाठी म्हणजे तिच्या आवडीच्या लेकरासाठी फाडल्या आहेत. तिने एवढ्या आपुलकीने हे केल आहे आणि आज इतके महिने झाले तरी तू एकदाही मला व्यवस्थित स्वच्छ केलेले नाही. मला खर तर तुझा खुप राग आला आहे”.

“जेव्हा तुला थंडी वाजते तेव्हा सगळ्यात पहिले तू मला येऊन पांघरतेस. मात्र माझी काळजी घेत नाहीस. आत्ता सध्या माझी अवस्था खरंच खूप वाईट झाली आहे. कित्येक ठिकाणी माझी शिलाई फाटली आहे. बऱ्याच ठिकाणी दोरा उसवला गेलाय. बरेच दिवस न धुतल्यामुळे त्याच्यावर किडेही येऊन बसतात. तरीसुद्धा तुला त्याची काहीच पडली नाहीये. तुला कधीच मला स्वच्छ करावे वाटते नाही. थंडी वाजली की मात्र तुला माझी आठवण येते. जसे तुझ्या आईने मला आपलेसे केले होते, तसे तू केलेले नाहीस. त्यामुळे जमले तर मला उद्या छान धुवून काढ, आपलेपणाने जवळ घे. मला तुझ्या चांगल्या स्पर्शाची उब मिळू दे. तरच यापुढे मी माझे काम खूप छान रित्या करू शकेन”. तिचे हे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. मला स्वतःचा खूप राग आला आणि मी निश्चय केला की, काहीही झाल तरी ही गोधडी छान धुवून, वाळवून, तिला आपलेपणाने वागवायच!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *