दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत निबंध

माझ्या आजोबांना दवाखान्यात ऍडमिट केले होते, म्हणून मी रुग्णालयात गेलो होतो. तिकडे माझी भेट ‘पाटील’ काकांशी झाली. पाटील काका म्हणजे आपल्या भारतातील काळ्या मातीचा राजा, म्हणजेच शेतकरी! एवढ्या निसर्गतेने भरलेल्या आपल्या भारतात काम करणारा एक शेतकरी.

हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या सगळ्यांचे लक्ष आपसूक पाटील काकांकडे गेले. पाटील काका भर हॉस्पिटलमध्ये हमसून-हमसून रडत होते. कारणही तेवढे सिरीयस होते. त्यांच्या प्रेग्नेंट सुनेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता!

मला राहवले नाही, मी त्यांना ‘का आत्महत्या केली?’ असे विचारले. त्यावर काका असे म्हणाले की “अरे आमचेच दोन वेळेचे खायचे वांदे आहेत. त्यात नवीन जीवाला जन्माला घालायचे, म्हणजे अजून एक तोंड आले खायला. इथे आमच्याच पोटाला चिमटा काढून आम्ही कसेबसे जगतो. सुनबाईंनी हा विचार केला आणि आत्महत्येचा विचार तिच्या मनात सगळ्यात पहिल्यांदा आला. नवीन जीव जन्माला घातला आणि त्याचे संगोपन करायला जर पुरेसे अन्न देखील नसेल, तर त्या जीवाला जन्माला देऊन काय उपयोग?”

ही भयानक परिस्थिती बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली! विदर्भात राहणारे हे पाटील काका मागच्या दोन वर्षांपासून ‘दुष्काळग्रस्त शेतकरी’ म्हणून जगताय. त्यांच्या ज्वारीला, बाजरीला, नाचणीला योग्य तो दर देखील मिळत नाहीये. त्यांच्या घराजवळच्या विहिरी सगळ्या सुकून गेल्या आणि नुसतच पाणी नाही ही समस्या नाहीये, ज्यावेळी पीक भरत आलाय त्यावेळी तिकडे अकाळी पावसामुळे झालेले नुकसान, हा सुद्धा खूप मोठा मुद्दा होऊन बसला आहे. निसर्गचक्रामध्ये मानवाने केलेल्या बदलामुळे निसर्गचक्रात प्रचंड फरक पडला आहे.

म्हणूनच आजकाल डिसेंबर महिन्यात अचानक पडणारा पाऊस आपण बघतो. या काँक्रीटच्या जंगलामुळे, प्रदूषणामुळे आपण मिळालेल्या निसर्गाचा किती प्रमाणात ऱ्हास करतोय? हे आपल्यालाच कळत नाहीये. शहरात राहणाऱ्या लोकांना सगळ्या गोष्टी महाग चालतात, मात्र ज्यावेळी भाजीपाला आणि धान्य घ्यायची वेळ येते, त्यावेळी मात्र आपण अचानक महागाई आहे असे म्हणायला लागतो. म्हणजेच काय तर मॉलमध्ये जाऊन आपण कधीही मोलभाव करत नाही. परंतु भाजी घ्यायला जाताना मात्र कोथिंबीर, कढीपत्ता फुकट मिळावा म्हणून भाजीवाल्यांशी तासभर भांडतो. म्हणजेच काय की शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला देण्यासाठी आपणच स्वतःला थांबवतो हे किती योग्य आहे? त्यांच्या कष्टांचा त्यांना योग्य मोबदला मिळायला नको का? आणि सर्वात दुःखदायक हे आहे की, हे असे प्रश्न आपल्याला कधीच पडत नाहीत.

त्यांच्याशी या सगळ्या गोष्टी बोलून मला समजले की आपण सुद्धा काही वेगळे करत नाही! किती चुकीच्या गोष्टी आपण अगदी सहजरीत्या करून जातो. या शेतकऱ्यांना पाणी न मिळणे, अवकाळी पाऊस, त्यांना योग्य तो भाव न मिळणे, पीक एका वेळेपेक्षा अधिक लवकर यावे म्हणून केलेले मातीचे प्रदूषण, उगाच जास्तीची घातलेली खते आणि कीटकनाशक चा अतिवापर. या सगळ्या गोष्टींमुळे जमिनीची सुपीकता वाढत नाही, ती नापीक होते.

शेतकरी देखील या गोष्टीला काही करू शकत नाही. कारण मागणी जास्त असली की पुरवठा करायला पाहिजे. म्हणून शेतकरी या सगळ्या गोष्टींचा मार्ग अवलंबतात. पण इतके कष्ट करून देखील, त्यांच्या कष्टांना आपण पुरेसा मोबदला देतो का? हा प्रश्न एक देशाचे नागरिक म्हणून विचार करून बघा.

जिकडे पाण्याचा एक हंडा आणायला बायका दोन किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करतात, अशा भागात जाऊन एक सुजाण नागरिक म्हणून आपण मदत करू शकतो का?

याचा विचार आपण सगळ्यांनीच करूया. भारत देशासाठी शेतकरी हा कणा आहे! सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. जर त्यालाच मान मिळाला नाही, तर हळूहळू आपला हा ‘आत्मनिर्भर देश’ अन्नपाण्यासाठी देखील दुसऱ्या देशांवर अवलंबून राहायला लागेल, जसे बाकीच्या देशांमध्ये राहतात तसे. सध्याच्या आधुनिकीकरणात दुबई, सिंगापूर सारखे शहर एकही धान्याचा कण स्वतः पिकवत नाहीत. म्हणून ते दुसऱ्या देशांवर अवलंबून असतात. आपल्यावर ती ही वेळ येऊ नये म्हणजे झाल!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *