माझा आवडता कलावंत निबंध

कलावंत म्हटले कि डोळ्यासमोर येते ती त्याची उत्तम कला आणि त्याचा चेहरा आपल्यासमोर लगेच तरळून जातो. हा आवडता कलावंत, हा काही कायम सारखा राहत नाही, निदान माझ्या बाबतीत तरी असेच झाले. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती मला वेगवेगळे कलाकार आवडत होते. आधी ‘शाहरुख खान’ मग ‘आमिर खान’ मग ‘ऋतिक रोशन’ आणि कोण ना कोण. मराठी मध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि बरीच मोठी सूची आहे. पण मात्र ज्या वयात सगळ्या गोष्टी कळायला लागल्या त्या वयापासून मात्र एकच कलावंत आवडतो.

२०१६ पासून ते आत्तापर्यंत त्यात अजून तरी बदल झालेला नाही. ते नाव म्हणजे ‘ललित प्रभाकर’. एक तर नावच एवढे गोड आहे आणि चेहरा तर विचारायलाच नको! समस्त तरुण मंडळींमध्ये प्रसिद्ध असलेला एक कलाकार आणि तोही मराठीतला म्हणजे ‘ललित प्रभाकर’. सगळ्या तरुणींना त्याचे नाव ऐकल्यावर एकदम उत्साह संचारतो. ललित एक उत्तम कलाकार आहे. उत्तम कलाकार बनण्याचे सारे कौशल्य त्याच्याकडे आहे. नाटक म्हणू नका की वेब सिरीज म्हणू नका, चित्रपट म्हणू नका की सीरियल म्हणू नका! सर्व क्षेत्रात पारंगत.

एक नाही अनेक गोष्टींचा प्रवास अगदी उत्तम रित्या पार पडलेला असा हा कलावंत आहे! तसे तर करिअरच्या सुरुवातीलाच ललित ने अनेक नाटके केली. २००८ पासून ललितने छोट्या पडद्यावर काम करायला सुरुवात केली. तीन-चार सिरीयल नंतर फायनली प्रसिद्धी मिळाली ती ‘जुळून येतील रेशीमगाठी’ मधल्या ‘आदित्य देसाईला’. ही भूमिका इतकी प्रसिद्ध झाली की, महाराष्ट्रभरात सगळीकडे आदित्य देसाईचे नाव सगळ्यांच्या ओठांवर होते. मी तर ही सिरीयल अजूनही पुन्हा पुन्हा बघते आदित्य सारखाच नवरा हवा! असे स्वप्न मी कॉलेजला असल्यापासूनच बघायला लागले. आणि गंमत म्हणजे असा नवरा आपल्याला फक्त अरेंज मॅरेज मध्येच मिळू शकतो हा समज देखील माझा झाला होता. यालाच मी रियालिटी मध्ये उतरवले आणि अरेंज मॅरेज केले आणि नशिबाने माझा नवरा ही आदित्य देसाई च्या व्यक्तिरेखा एवढ्याच छान निघाला म्हणून हे वाक्य खूप सुप्रसिद्ध झाले होते ते म्हणजे, ” तुझ्यासारखा जोडीदार मिळाला भाग्य लागतं”.

ललित प्रभाकर त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. आदित्य असू दे किंवा ‘हम्पी’ मधला सुसाट भटका प्रवासी कबीर असू दे. सतत पाणी वाचवणारा ‘ची. व ची.सौ.का’ मधल्या सत्यप्रकाश असू दे की भाईगिरी दाखवणारा ‘डोंबिवली’ मधला जग्गू असू दे. प्रत्येक भूमिका ही वेगळ्या धाटणीची जरी असली, तरी तो तितक्याच सुंदर पद्धतीने ती साकारतो. हे सगळ्याच कलाकारांना जमते असे नाही. ‘आनंदी गोपाळच’ तर वेगळच कौतुक करायला लागेल. त्यासाठी एक वेगळा निबंध बनेल. भारतातली पहिली महिला डॉक्टर आणि तिचा मागे उभा असणारा तिचा ठाम नवरा याची सांगड इतक्या सुंदर पद्धतीने ललित प्रभाकरच्या माध्यमातून मांडली आहे. त्याकाळी भारतात खूप वेगळ्या प्रकारचे वातावरण होते. या वातावरणात आपल्या बायकोने पहिली महिला डॉक्टर व्हावे! यासाठी त्या माणसाने केलेले कष्ट हे त्यावर चित्रपटात दाखवले आहेत. त्याच शेवटचा शॉर्ट तर इतका सुंदर आहे की पुन्हा पुन्हा तो बघावासा वाटतो.

मध्यंतरी ‘पुणा फिल्म फेस्टिवल’ ला ‘मीडियम स्पाइसी’ नावाच्या चित्रपटात केवळ तो होता म्हणून मी पैसे जमवून 770 रुपयाचे तिकीट काढले! आणि पूर्ण फेस्टिवलचा पास घेतला परंतु हा एकच सिनेमा पुन्हा पुन्हा बघितला. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या सिरीयल मध्ये त्याची कबीर ची भूमिका इतकी गाजली होती, तो ज्या दिवशी त्या सिरीयल मध्ये यायचा, त्याच दिवशी आम्ही ती सिरीयल बघायचो. आवडत्या कलाकारांचे जी फॅन मोमेंट असते तशी माझी पण खूप भारी फॅन मोमेंट झाली ते म्हणजे, ‘पुना फिल्म फेस्टिवल’ ला ललित प्रभाकरला भेटायची संधी मिळाली, फोटो पण काढला त्याच्याबरोबर. त्या दिवशी सातव्या आसमानात पोहोचले होते मी, असे वाटले की जगात आपल्याला सगळेच मिळाले.

ललितच्या अजून एका वेब सिरीज बद्दल बोलायचे झाले तर ती आहे ‘पेट पुराण’. आमच्या आधुनिक पिढीला अगदी रिलेटेबल अशी ही वेब सिरीज, म्हणजे ‘पेट पुराण’ या दांपत्याने पाळीव प्राणी घेऊन पेट पेरेंटिंग किती सुंदर पद्धतीने केले! हे मांडले आहे. त्या नंतर कितीतरी दांपत्यांनी आम्ही पेट पेरेंट्स बनणार असे ठरवले.

ललित प्रभाकर मुळातच खूप वेगळ्यावेगळ्या धाटणीचे, खूप वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट घेतो, त्याच्या प्रत्येक भूमिकेतून तो प्रेक्षकांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. असा हा माझा आवडता कलावंत खरंच खूप खूप भारी आहे! म्हणूनच २०१६ पासून तोच आवडतो.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *