माझे बाबा निबंध

बाबा म्हटले की सगळ्यांच्या मनात पहिली गोष्ट येते ते म्हणजे आपुलकी आणि मग येते ती इमोशनल फिलिंग!

जसे आई आपले सर्वस्व असते, तसेच वडील आपला भक्कम आधार असतात. जगात खूप शुभेच्छा नेहमी आईवर असतात, जसे ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ किंवा अनेक भावना क्रिया फक्त आईवर बनवल्या जातात. कवितांचा तर वर्षाव असतो नेहमी! खूप मोठमोठे लेखक आईवर पुस्तकांवर पुस्तके लिहितात. तसेच आईवर अनेक नाटके, सिनेमे, गाणी निघतात. म्हणजे काय तर सगळ्या माध्यमातून आईचे अगदी भरभरून कौतुक केले जाते.

परंतु मग बाबांचे काय? बाबा आपल्याला आयुष्यात महत्त्वाचे नसतात का? की लेखकाला वडिलांबद्दल लिहावे असे सुचतच नाही?

म्हणूनच आज मी बाबांबद्दल बोलणार आहे. कारण बाबांचे आपल्या आयुष्यात नकळतपणे खूप महत्त्व असते. कळू न देता जीवापाड प्रेम करणे ही कला फक्त बाबांनाच अवगत असते.

जसे आई आपल्यासाठी सर्वस्व अर्पण करते, तसे बाबाही आपल्यासाठी सर्वस्व अर्पण करत असतात किंबहुना बाबांचा वाटा थोडा जास्तच असतो!

एका लेखकाने त्यांच्या एका पुस्तकात आयुष्याचे सूत्र खूप छान पद्धतीने मांडले आहे. ते म्हणतात ‘जशी आपल्याला काही शारीरिक इजा झाली की आपण पटकन मराठी मध्ये ‘आई गं!’ असे म्हणतो पण जर काही संकट आले किंवा ज्या गोष्टीत आपण घाबरतो असे काही प्रसंग आले की आपल्याला आधी आपले बाबा आठवतात आणि तोंडातून आपोआपच‘बापरे!’ असाच शब्द निघतो.

म्हणजेच काय तर आई आपल्या आयुष्यात मायेची सावली असते, तर बाबा आपल्या आयुष्यात अत्यंत खंबीर आधार असतात. जेव्हा कधी आपण धडपडतो, पडतो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिले आधार देतात ते आपले बाबाच असतात!

आपल्या मुलाला आयुष्यातील सगळ्यात सुख सोयी ते देतात. तेव्हा ते स्वतःच्या पोटाला चिमटा काढतात. कधीकधी तर काही आईबाप मुलाचे शिक्षण व्हावे म्हणून एक वेळ जेवून स्वतः उपाशी राहून त्यांचे शिक्षण हि पूर्ण करतात! पण खरच आपल्याला तेवढी किंमत असते का ? त्यांच्या कष्टांचे चीज आपण खरच करतो का? याचे उत्तर शोधणे खूप महत्त्वाचे आहे.

कारण बाबा हा एकमेव व्यक्ती आहे जो सतत देतच असतो!

पहिला पगार झाला की आपण सगळ्यात पहिले आनंदाने आईसाठी साडी आणतो. मग त्या वेळेला बाबांसाठी साधा एक रुमाल आणायचा तरी लक्षात राहते का ?आपल्याला जे काही मोठे करतो त्यात फक्त आईचा वाटत असतो का ? बाबांचे न दिसणारे कष्ट आपण कधी लक्षात घ्यायला शिकणार?

नोकरी करुन पैसे कमावणे ही काही साधी गोष्ट नाही. शिवाय सध्याच्या काळात आधुनिकीकरणामुळे वाढलेले प्रेशर, जाताना-येताना बसने धक्के खात ट्रेनच्या गर्दीत आपला दिवसाचा अर्धा वेळ घालवणाऱ्या आपल्या बाबांचे कष्ट कधीच आपल्याला दिसत नाहीत का?

जेव्हा मला सगळ्या या गोष्टी समजल्या तेव्हा मला बाबांचे खरे महत्त्व पटले. माझे बाबा हे सगळ्यांच्या बाबांप्रमाणेच आहेत. ते कविता करतात, खूप छान लिहितात! अध्यात्मातही त्यांना बरीचशी गती आहे. त्यांना फिरायला आवडते. त्यांनी आजपर्यंत इतकी माणसे गाठीशी बांधली आहेत की आम्हाला कधीच नातेवाईकांची कमी भासू दिली नाही. त्यांच्यामुळे आमचे घर खूप खंबीरपणे उभे आहे.

माझे बाबा मला आयुष्यातल्या प्रत्येक संकटांमध्ये खंबीरपणे उभे राहायला शिकवतात.

पूर्वीच्या काळी बापाच्या प्रेमाला एवढे खुलेपणाने कधीच मानले जात नव्हते. परंतु आता बाबांवरती सुद्धा अनेक जण लेख लिहितात, कविता करतात, सिनेमा येतात. मुळात लहानपणापासून कोणाचा तरी धाक असावा, म्हणजे मुलगा वाया जाऊ नये, असा विचार करून कायम बाबा धारेवर धरतात. बाबा मारतील या भीतीने मुले त्यांच्यापासून चार हात लांबच असतात. श्यामच्या आईला हे कधी आमच्या बाबांचे रूप दिसत नाही. शपथ पण फक्त आईचीच घेतात. बाबा काय? बाबांना काही विचारत नाहीत. बाबा म्हणजे फक्त पैसे कमवायचे यंत्र. तेवढेच कर्तव्य असततेका हो बाबांचे?

बाबा त्याहून खूप अधिक आपल्याला आयुष्यात रोज देत असतात. बाबांमुळे आपल्यावर संस्कार होतात. बाबांमुळे खरंच तत्त्व म्हणजे काय? हे कळते. माझे बाबा तर तत्वांचे फार पक्के आहेत. आयुष्यात त्यांनी कधीही एकही काळा पैसा खाल्ला नाही. त्यांनी आजपर्यंत जो काही पैसा कमावला आणि जी काही इज्जत कमावली ती स्वतःच्या बळावर कमावली याचा मला अभिमान आहे.

त्यांना त्यांच्या बालपणी कविता फार आवडायच्या आणि त्यांचे स्वप्न होते की त्यांनी लेखक किंवा कवी व्हावे परंतु परिस्थितीमुळे आणि आजोबांच्या हट्टा मुळे ते लेखक बनू शकले नाहीत आणि त्यांना न आवडीचा विषय त्यांनी आयुष्यात स्वीकारला? का तर त्यांना कुटुंबाची जबाबदारी पार पाडायची होती. आमच्यासाठी इतके वर्ष त्यांनी नोकरी केली, परंतु मला आनंद आहे की निवृत्त झाल्यानंतर ते त्यांच्या आवडीची गोष्ट किंवा त्यांचा पँशन फॉलो करतात. ते लिहितात, कविता करतात, त्यांना अध्यात्मामध्ये रस असल्या कारणाने ते त्यांचे आयुष्य अध्यात्मासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी देत आहेत.

मुळात आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा आपल्याला बाबांचा आधार असतो, तेव्हा आपले आयुष्य खूप सुखकर असते. जेव्हा बाबा जातात तेव्हा आधार गेल्यासारखे वाटते. डोळ्यात प्रेम न दाखवता आपल्या मुलाला अजून शेवटच्या श्वासापर्यंत अपरंपार प्रेम करतो तो बापच असतो! आई चटकन डोळ्यात पाणी काढते पण बाबा डोळ्यातले पाणी कधीच खाली येऊ देत नाहीत. कारण समाजाच्या मते ते चुकीचे असते.

बाबांचे लेकीवर जितकी प्रेम असते तितके प्रेम एखाद्या मुलीवर कोणीच करू शकत नाही! बाबा हा आपल्या साऱ्या आयुष्याचा आधार असतो. तो कधीच कमी होत नाही. आपण आयुष्यात कितीही मोठी चूक केली तरी आई एक वेळ आपल्याला ओरडेल, चिडली असेल तर आपल्या मागे उभी राहणार नाही पण त्या चुकीतून बाहेर येण्यासाठी बाबा आपल्या जीवाचे रान करतो. माझे बाबा तसेच आहेत. मी केलेल्या अगदी छोट्याशा चुकीला सुद्धा ‘विचार करून तू यातून कशी बाहेर पडशील?’ याचे नेहमीच ते मला मार्गदर्शन करत असतात.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाबा कधीच स्वतःसाठी एक रुपयाची खरेदी करत नाही पण आपल्या सगळ्यांच्या गरजा भागवण्यासाठी बाबा अगदी ओव्हरटाईम पण करतात. बाबा मुलाच्या लग्नासाठी अगदी ते जन्माला आल्यापासून एक एक रुपया साठवत असतो पण स्वतःसाठी एक साधी बनियनही विकत घेत नाहीत. माझ्या बाबांनी तर न मागताच अनेक गोष्टी मला आणून दिल्या. मी एक खेळ मागितले की माझ्यासाठी दहा खेळणी आणतात हे प्रेम फक्त बाबाच करू शकतात!

माझे बाबा माझा अभ्यासही घ्यायचे. माझा इतिहासाचा आणि नागरिकशास्त्राचा सगळा अभ्यास बाबा घ्यायचे. माझी ती बालपणाची सगळ्यात आवडती आठवण आहे. मला चांगल्या शिक्षणाच्या संधी कशा मिळतील/ मी आयुष्यात कशी पुढे जाईल? याचा विचार बाबांनीच सगळ्यात जास्त केला.

सगळेच बाबा आपल्या छोट्याशा कोंबाला वटवृक्ष बनण्यापर्यंत मदत करतात, छोट्याशा पक्षाच्या पंखात बळ यायला पाठीशी उभे राहतात. मला माझे बाबा खूप खूप आवडतात!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *