माझा आवडता विषय मराठी निबंध

Featured Image- maza avadta vishay  marathi

माझा आवडता विषय मराठी निबंध

तुमची आमची सर्वांचीच लाडकी ‘मराठी भाषा!’ मराठी अनेक वर्षांपासून खूप जास्त समृद्ध आहे. मी आत्ता इयत्ता आठवी शिकत आहे. आम्हाला शाळेत अनेक विषय शिकवले जातात. सायन्स, मॅथ्स, हिस्टरी, जॉग्रफी पण त्या सगळ्या मध्ये मला मराठी भाषा आणि मराठी हा विषय सगळ्यात जास्त आवडतो. गणितात तर मला जेमतेम गुण मिळतात. माझ्या आईची तर इतकीच इच्छा असते की मी गणितात नापास होऊ नये. मला मराठी, हिंदी यासारख्या भाषा विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क असतात. त्यातही हिंदी पेक्षा जास्त मराठी शिकताना मला खूप मजा येते. त्याचे कारणही असे आहे दुसरीत असताना आम्हाला ‘साबळे बाई’ नावाच्या एक शिक्षिका होत्या. त्यांनी आम्हाला मराठीची गोडी लावली. त्या खूप छान मराठी शिकवायच्या. तेव्हापासून माझी मराठीची आवड सुरू झाली. त्यांनी आम्हाला सोपे सोपे निबंध लिहायला लावले. दर दिवशी विषय वेगळा असायचा. त्यामुळे आमच्या कल्पना शक्तीचा विस्तार रोज नव्याने व्हायचा! एवढेच नाही तर आम्हाला आपली महाराष्ट्रीय संस्कृती आणि परंपरा नीट माहिती असावी, म्हणून प्रत्येक सणासुदीला त्या ‘ही अशी वेशभूषा करून या!’ अस देखील सांगायच्या. जसे गणपतीत शाळेत साड्या नेसून जायचे, आरत्या म्हणायचे. दिवाळीला छान नवीन ड्रेस घालायचे.

आमच्या सगळ्यांच्या आवडीचे म्हणजे एकादशीला आम्हाला बाई ‘विठ्ठल आणि रखुमाई’ बनवायच्या. आम्ही तुळशी वृंदावन घेऊन जायचो. मग त्या ‘दिंडी चालली चालली, माझ्या पंढरपुराला’ या गाण्यावर आम्हाला नाचायला लावायच्या. त्यांच्यामुळेच माझे मराठी भाषेवर खूप प्रेम निर्माण झाले.

मराठी भाषेचे चांगले संस्कार तुमच्यावर लहान वयातच होत असतात. तुम्ही तुमची मातृभाषा जर प्रगल्भ केली तर बाकीच्या भाषा तुम्हाला व्यवस्थित शिकता येतात आणि तसेच माझे झाले. त्यांनी आम्हाला दुसरीपासून छान मराठी शिकवली, म्हणून आज माझी मराठी एवढी स्पष्ट आणि सुंदर आहे.

मराठी भाषेची जादू काही वेगळीच आहे. ती वळवावी तशी वळते. मराठीचा शब्दकोश ही खूप मोठा आहे. मला मराठी विषय यासाठी आवडतो कारण मराठीच्या पुस्तकात कविता, लेख, ललित लेख ,निबंध, पत्रव्यवहार या सगळ्या गोष्टी अगदी नीट छान पद्धतीने शिकवलेल्या असतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्याकरण! माणसाची भाषा किती चांगली आहे हे त्याच्या बोलण्यावरून आणि त्याच्या व्याकरणावरूनच कळते.

 मराठी मधील कविता संग्रह हा सुद्धा प्रचंड मोठा आहे, त्याचप्रमाणे त्या संग्रहावर प्रेम करणारे कवीप्रेमी हा मराठी वर्ग तसेच बाहेरील भाषा प्रेमी ही आहेत. मराठीतल्या कविता मग त्या ‘विंदा करंदीकर’ यांच्या असू दे किंवा ‘बहिणाबाई चौधरी’. मला सगळ्यात जास्त कवी ‘केशवसुतांच्या’ कविता आवडतात.

आठवीला आम्हाला जोशीबाई शिकवतात. त्या देखील खूप छान मराठी शिकवतात. आम्हाला प्रत्येक धडा एक नवीन शिकवण देऊन जातो. आमच्या बाई प्रत्येक धड्यातून आम्हाला काही ना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असतात.

ललित लेख वाचायला मला फार आवडते. त्यामुळे मी बाकीची पुस्तके घेऊन सुद्धा त्यातील ललित लेख अगदी आवर्जून वाचते. आमच्या बाई आम्हाला रोज एक तरी कवीता म्हणायला लावतात. तसेच परीक्षेच्या आधी आमची व्याकरणाची खूप छान तयारी करून घेतात. तसेच बाई आवर्जून आम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण हा प्रश्न टाकतात. तो प्रश्न सोडवायला मला फार आवडतो. कारण तुम्ही वाचलेल्या धड्यामधली एखादी ओळ त्यात घेतलेली असते. आणि त्याचा पुढचा आणि मागचा संदर्भ द्यायचा असतो. हे जणू मला एखादी लहान गोष्ट लिहिण्यासारखंच वाटते म्हणून मला हा प्रश्न फार आवडतो.

पत्रलेखन करायलाही खूप मजा वाटते. पत्रलेखनाचे विषयही खूप जास्त मजेशीर असतात. आईला पत्र लिहिणे, बाबांना पत्र लिहिणे. आज जे आपण सत्य परिस्थितीत करत नाही ते मराठीच्या परीक्षेत आम्ही नक्की आवर्जून करतो. पत्रव्यवहार हा आता जणू नामशेष होत चालला आहे. अशा काळात मराठीच्या परीक्षेत तरी आम्ही पत्र व्यवहार अजून करतो.

आमच्या बाई मराठीची तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा घेतात. मराठीच्या तोंडी परीक्षेत तर खूप मजा येते. संपूर्ण वर्गासमोर उभे राहून तुम्हाला कविता म्हणून दाखवायची असते, वाचून दाखवायचे असते. एखादा विषयावर लगेचच निबंध बनवून बोलायचेअसते. एकूणच काय तर तुमच्या कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर तुम्ही मराठीच्या तोंडी परीक्षेत करायचा असतो आणि लेखी परीक्षा तर खूपच छान असते. एकूणच काय मराठी भाषा ही खरच खूप प्रगल्भ आहे आपले संत, महात्मे, गाजलेले लेखक, कवी यांनी इतके लिहून ठेवले आहे की आपली मराठी भाषा खूपच प्रबल झालेली आहे, म्हणूनच मला मराठी भाषा खूप आवडते!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *