माझी मातृभाषा मराठी निबंध
‘माझी माय मराठी माझी आई मराठी’! तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी आपली मराठी!
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीचा जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’ हे म्हणत म्हणतच मी लहानाची मोठी झाली. मी जन्माला आले, ते एका मराठी कुटुंबातच! त्यामुळे आपसूकच माझी मातृभाषा ही मराठी झाली. माझे बाबा हे कवी आहेत आणि माझ्या आईला मराठी भाषा खूप आवडते. त्यामुळे दोघांनीही मला मराठीचे खूप चांगले संस्कार दिले. लहानपणापासून मला उत्तम साहित्यिकांची पुस्तके आणून दिली. एवढेच नाही तर मराठी नाटके, चित्रपट बघायला लावले! मी जर कधी चुकून अशुद्ध मराठी भाषा बोलले, तर माझे बाबा मला खूप ओरडायचे. ‘भाषा ही कायम शुद्ध असली पाहिजे आणि आपली मातृभाषा ही आपणच समृद्ध करत असतो. त्यामुळे त्यात चूक करायची नाही.’ असे दोघांनीही उत्तम संस्कार दिले.
माझा दादा देखील मराठीतला पंडितच आहे. त्यांनी आज पर्यंत खूप सारी पुस्तके वाचली आहेत. मराठी विषयात त्याला तर अगदी पैकीच्या पैकी मार्क मिळतात.
आपली मराठी आहेच तेवढी प्रगल्भ! मग आपले मराठी लेखक असू देत, संत असू देत की कवी असू देत. प्रत्येकाने आपले मोलाचे योगदान आपली मातृभाषा मराठीसाठी दिलेले आहे.
‘कृष्णाजी दामले’ म्हणजेच आपल्या मराठीतील केशवसुत! त्यांनी साहित्याचा एक मोठा काळ गाजवला. किंवा ‘शिवराज गोरले’ यांच्यासारखे लेखक जगण्याला एक वेगळा दृष्टिकोन देऊन जातात! आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजेच ‘पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे’ म्हणजेच ‘पु. ल. देशपांडे’. यांनी आपल्याला हसायला शिकवले, जगायला शिकवले. संत-महात्म्य मध्ये आपण मागे राहिलो नाही. उत्तम संतांचे साहित्य मराठीत लिहिलेले आहे.
मराठीतील कवींनी तर एक दर्जा निर्माण केला आहे. कविता म्हटल्या की सर्वप्रथम ‘बालकवी’ हे नाव ओठांवर येते. साध्या सरळ सोप्या भाषेतील कविता, समजायला अगदी सोप्या जसे ‘बहिणाबाई चौधरी’ यांच्या शेतीवरच्या गावाकडच्या कविता. असे अनेक कवी महाराष्ट्रात होऊन गेले.
मराठी बोलीभाषा ही प्रत्येक बारा किलोमीटर वरती बदलताना आपल्याला दिसते. मराठीचा गोडवा हा प्रत्येक ठिकाणी आहे. कोणतीही मराठी भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नाहीये, ती प्रत्येक भागात वेगळी आहे! प्रत्येक भागातील मराठी भाषा ही एकापासून दुसरी वेगळीच आहे. मराठी भाषेत खूप गमतीदार गोष्टी आहेत. याचे कारण असे की मराठी भाषेत अनेक शब्द आहेत, प्रत्येक शब्दाचे वेगळे अर्थ आहेत. म्हणूनच मराठी भाषा वळवावी तशी वळते असे म्हणतात ते उगाच नाही! मराठीचा शब्दकोश खूप मोठा आहे, म्हणूनच जर एखाद्या दुसऱ्या भाषेच्या माणसाला मराठी शिकायची असेल तर त्याला शिकण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.
मराठीतील चित्रपट आणि नाटकांची तर आपण गोष्टच नको करायला!, खूप गाजलेली नाटके आजही रंगभूमीवर आहेत. मग ’बटाट्याची चाळ’ असू देत, की खूप गाजलेले ‘नटसम्राट’ असू देत. या सगळ्या नावांमध्ये आपण बालगंधर्वांची नाटके कधीच विसरू शकणार नाही. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने तर संगीत नाटकासाठी एक वेगळीच छाप निर्माण केली. ‘जाणता राजा’ बघून आपल्याला महाराजांचा काळ आठवतो. आपली चित्रपटे आणि नाटके इतकी प्रसिद्ध झाली आहेत की ती केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात चालतात. आता तर अनेक नाटके ही विदेशातही जाऊन त्याचे प्रयोग केले जातात.
आपले मराठी कलाकार हे बॉलीवूडच्या मोठमोठ्या प्रसिद्ध अशा सिनेमांमध्ये देखील काम करतात! मराठी भाषा महाराष्ट्र राज्यासाठीच फक्त सीमित राहिली नाही. महाराष्ट्रात मुंबई-पुणे अशा दोन मोठ्या शहरांचा समावेश आहे, जिथे देश विदेशातील अनेक लोक येऊन स्थायिक होतात, त्यामुळे ते लोक देखील मराठी भाषा लिहायला वाचायला शिकतात.
आपले महाराष्ट्रातील नेतेमंडळी आणि राजकीय पक्ष देखील मराठी भाषा वाचवण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. मराठी मिडीयम मध्ये शिकल्यास म्हणजेच आपल्या मातृभाषेत शिकल्यास आपण आपली भाषा खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. मात्र आजकालचे विद्यार्थी आणि पालक मराठी माध्यमात आपल्या मुलांना टाकत नाहीत. त्यामुळे त्यांची एकही भाषा चांगली नसते ना मराठी चांगली असते, ना इंग्रजी चांगली असते. त्यामुळे या सगळ्यांचे भान हे विद्यार्थ्यांना आणि पालकांना असले पाहिजे. मला माझी मातृभाषा मराठी आहे याचा अभिमान आहे!