अकस्मात पडलेला पाऊस | निबंध, प्रसंग लेखन

Featured image: अकस्मात पडलेला पाऊस

अकस्मात पडलेला पाऊस

नुकतीच दिवाळी संपली होती, सगळेजण थंडीचा झक्कास आस्वाद घेत होते. अचानक मध्येच तीन-चार दिवसांपासून थंडीची लाट खूप कमी झाली आणि तीव्र उन्हाळा जाणवू लागला. सगळे लोक घरातून घेऊन गेलेले स्वेटर घडी करून कपाटात परत ठेवायला लागले.

आज तर अगदी खूपच कहर झाला! इतकी उष्णता वाढली की लोकांना घामाच्या धारा लागल्या. गरमागरम सूप पिण्याच्या दिवसात आम्ही थंड-थंड आईस्क्रीम खायचा विचार करत होतो. आई म्हणाली “जेव्हा एवढी उष्णता वाढते तेव्हा नक्कीच पाऊस पडणार.” आईने शाळेत जाताना छत्री हातात दिली, उगाच भिजू नये म्हणून.

शाळेत गेलो तर पिटीच्या तासाला सरांनी सगळ्यांना मैदानात आणले. आम्हाला दोन गटात विभागून दिले, पण नेमक्या दुपारच्या तळपत्या उन्हात आम्हाला कबड्डी खेळायला सांगितले. खरं सांगायचं तर कोणाचीच मनापासून कबड्डी खेळायची इच्छा नव्हती. आम्ही तो पूर्ण तास नुसता दंगा करण्यात घालवला आणि मजा करत परत वर्गात आलो.

दुपारी दोन वाजता शाळा सुटल्यावर घरी यायला निघालो तर जोराचा मस्त वारा सुटला होता. त्या थंड गार वाऱ्याचा अनुभव घेत आम्ही सगळे मित्र घराच्या दिशेने निघालो. आम्ही सगळ्या मित्रांनी मस्त छोटी पेप्सी घेतली होती व ती चोखत चोखतच आम्ही बागडत घरी गेलो.

घरी गेल्यावर आईने मस्त पावभाजीचा बेत केला होता. जेवायला बसल्यावर अचानक बाहेर आवाज आला! मी आणि आई उठून पळत खिडकीपाशी गेलो तर ढगांचा गडगडाट सुरू झाला होता. एवढा वारा सुटला होता की दुकानाचे पत्रे उडायला लागलले. लोक पाऊस येणार या भीतीने घरी लवकर पळायला लागले, कारण वारा एवढा जोराचा होता म्हटल्यावर पाऊसही जोरात येणार.

गेले चार-पाच दिवस असलेला एवढा उन्हाळा बघून सगळेजण घरची वाट धरू लागले. एवढ्यातच थेंब थेंब पाऊस पडू लागला. आम्ही पटपट जेवण संपवून खिडकीपाशी जाऊन थांबलो तर रस्त्यावर धावपळ चालू झाली होती. फळवाले, भाजीवाले सर्व आसरा शोधण्यासाठी गडबड करू लागले होते.

आईला अचानक लक्षात आले! बाहेर कपडे वाळत टाकलेत म्हणून ती पळत आत गेली. नशिबाने पत्रे असल्याने कपडे खूप भिजले नाही. थोडा थोडा पाऊस वाढतच होता आणि नंतर तर गारांचा पाऊस अकस्मात पडायला लागला आणि पावसाने हळूहळू रौद्ररूप धारण केले.

हे बघून आम्हाला भीती वाटली, घरात फक्त मी आणि आईच होतो! बाबा ऑफिसला गेले होते आणि एवढा सगळा पाऊस बघून बाबांचा फोन आला. अचानक पावसामुळे मुंबई लोकल ट्रेन बंद झाली होती! ‘ऑफिस मधून बाबा घरी कसे येतील?’ असा प्रश्न आम्हाला पडला होता. मी आणि आई आम्ही बातम्या लावून बसलो. आई तशी फार काळजीतच होती पण काही वेळाने थोडासा पाऊस ओसरता झाल्यावर बातम्या वाल्यांनी देखील गाड्या पूर्ववत झाल्या आहेत अशी बातमी दिली. आईला याचा आनंद झाला.

तेवढ्यात बाबांचाही फोन आला की अकस्मात आलेल्या पावसामुळे ऑफिसमधून घरी लवकर सोडत आहेत. आईने बाबा लवकर येणार व पाऊस पडतोय हे बघून कांदा भजी आणि फक्कड चहाचा बेत केला! तोपर्यंत मी आईला घर आवरायला मदत करत होतो. पण थोड्याच वेळात पावसाचा कमी झालेला जोर परत वाढला. बाबा घरी आले आणि थोड्याच वेळात ट्रान्सफॉर्मरचा मोठा आवाज झाला आणि लाईट गेले.

जसा पावसाळ्यात पडतो तसा पाऊस जोरात पडत होता! लाईट गेल्यावर सगळ्यांच्याकडे मेणबत्त्या लावण्यात आल्या. आम्ही अर्ध्या मेणबत्तीच्या दिव्यात अभ्यास करायला बसलो. हवा इतकी होती की त्याने लावलेली मेणबत्ती सुद्धा विझली. मग आम्ही आईने केलेल्या कांदाभजींवर मस्त ताव मारला. एवढ्यात लाईट आली. सगळेजण खुश झाले आणि सगळ्यांनी ओरडून एकच दंगा केला. मात्र परत पाच मिनिटांनी ट्रान्सफॉर्मर परत उडाला. मग काय आम्ही मेणबत्तीच्या  प्रकाशात मस्त कॅण्डल लाईट डिनर केला.

हा नोव्हेंबर मधला अकस्मात पडलेला पाऊस खूप आनंद देऊन गेला!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *