माझी बहीण निबंध

Featured Image- majhi bahin nibandh

माझी बहीण निबंध

छान, छोटीशी, अल्लड, गोंडस परी म्हणजे ‘माझी बहीण’, माझी छोटी बहिण ‘सौम्या’!

ती यायच्या आधी मला आई-बाबांनी सांगितले होते, ‘कोणीतरी येणार आहे जी तुला ताई म्हणेल! ती तुझा मान राखेल, तुझ्याशी खेळेल, तुझ्याशी भांडेल’. पण ती येणार होती का तो? हे मला माहित नव्हते. पण ती आल्यावर मला जास्त आनंद झाला. बहिणी-बहिणीचे नाते फार वेगळेच असते. भावा-बहिणींचे पण नाते तसे खास असते, पण बहिणी-बहिणींचे जास्त जीवस्य कंठस्य असे नाते आयुष्यभरासाठी होऊन जाते. म्हणूनच मला बहिण झाली यात मला फार आनंद झाला होता. मी त्यावेळेला जास्तीत जास्त सहा वर्षाची असेल आणि तेव्हा सहाव्या वर्षातच तुम्हाला कोणीतरी एवढा मान देणारा आले याचे मला फार आश्चर्य वाटत होते आणि फार भारी वाटत होते. तिचा जन्म झाल्यावर मी माझ्या वर्गात सगळ्यांना काजूकतली वाटली होती. ती काजुकतली सारखीच गोड होती! तिचे गाल खूप गुबगुबीत आणि डोळे मस्त छान घारे-घारे आणि गोरी-गोरी पान अशी सुंदर देखणी माझी बहिण सौम्या!

बहिणी-बहिणीचे नाते खूप छान असते, खूप वेगळे असे असते. बहिण कायम आधार देते. खोड्या काढते, तिच्याशी खोटे भांडण करणे, तिच्या धमाल खोड्या खपवून घेणे, हेच तर आमचे खरे नाते आहे.

सौम्या कायम चुका करते आणि मी त्या चुकांवर पांघरुण घालायचे काम करते. आई-बाबांचा ओरडा तिला मिळू नये याचा अतोनात प्रयत्न आम्ही दोघी करत असतो. पण सतत चुका करणारी एकमेव जगातली माझीच बहीण असावी. तिला एक गोष्ट सांगितली की ‘ही करू नकोस’ की ती मुद्दाम जाऊन तीच गोष्ट करून येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘तिच्या सगळ्या मैत्रिणी या माझ्या मैत्रिणी झाल्याच पाहिजेत’ असा तिचा अट्टाहास असतो त्यामुळे ती सगळ्या मैत्रिणींना आधी मला भेटवते, मग आईला सांगताना ताईला तर हे माहिती होते असे म्हणून माझी चुगली पण करते!

पण आमची सौम्या खरंच खूप प्रेमळ आहे. ती लहान जरी असली तरी सुद्धा ती खूप मोठ्या लोकांसारखी सगळ्यांची काळजी घेते. जर आम्हाला काही दुखले खुपले तर सगळ्यांना सांभाळते. मी तिचा अभ्यास घेते म्हणून कधी कधी ती सुद्धा माझा अभ्यास घेते. तिला त्यातले येत काही नसते पण ‘ताई मी तुझा पण अभ्यास घेते ना! मला तू प्रश्नांची उत्तरे दे, मग मला बाई झाल्यासारखे वाटेल’ असे म्हणते. तिला शाळेतल्या शिक्षिका, आमच्या हेडमास्तरीण बाई व्हायचे असते आणि माझा अभ्यास घ्यायचा असतो. काही का असेना तिचा तो अल्लडपणा मला खूप आवडतो.

सौम्या माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. जरी माझी बहीण असली तरी सुद्धा बहिणीपेक्षा जास्त ती माझी मैत्रीण आहे! तिला येऊन सगळ्या गोष्टी मी सांगते जरी ती लहान असली तरी सुद्धा ती सगळ्यात जास्त समजूतदारपणाने वागते.

एकदा सौम्या मांजर घेऊन आली होती. मी तिच्यासाठी म्हणजेच तिला वाचवण्यासाठी आई-बाबांशी खूप वेळ भांडले होते आणि मग आईला थोडीशी दया येऊन तिने आम्हाला ती मांजर ठेवून घेण्यासाठी सांगितले. तेव्हा सौम्याने माझ्या कौतुकाचा वर्षाव सगळ्या नातेवाईकांमध्ये केला होता. किती भारी वाटले होते मला! माझी लहान बहिण मला एवढा मान देते! हे बघून मला खरंच खूप भारी वाटते.

रविवारचा आमचा प्रोग्रॅम फिक्स असतो. सौम्याला वेगवेगळ्या हेअर स्टाईल करायला फार आवडतात. त्यामुळे माझे केस हा तिच्या नवीन हेअर स्टाईल चा एक बहाणा असतो! जे काही करायचेय त्याच्यासाठी तिला माझेच केस सापडतात. मग माझ्या वेण्या घालून देते, कधी बो घालते, कधी थोडेसे केस कापूया असे म्हणते, मग आईचा ओरडा खाऊन घेते. माझे कपडे ढापायला तर तिला खूप आवडतात. तो तिचा नेहमीचा आवडीचा छंद बनला आहे. माझ्या कपाटात जर एखादी गोष्ट सापडत नाहीये म्हटल्यावर ती मला सौम्याचेच कपाटात जाऊन शोधायला लागते आणि तेव्हा कळते की माझे अजून दहा कपडे देखील तिथेच पडलेले आहेत.

तिला त्रास देणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे! हे आमचे खरे ब्रीदवाक्य आहे. आम्ही दोघीही एकमेकांना भरभरून त्रास देतो. आमची भांडणे अगदी शिगेला पोहोचल्यावर मग आमचे आई-बाबा त्यात लक्ष घालतात. माझ्या आईने तर आम्हाला दोघींना सांगून ठेवलेले आहे, ‘जर कोणाला हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ आली तरच फक्त मला बोलवावे अन्यथा तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही तुम्ही सोडवा’.

मला बाबांनी पितळ्याची भांडीकुंडी आणून दिली होती. माझी सगळी भांडीकुंडी आता सौम्याची भांडीकुंडी झालेली आहेत. ती तिला इतकी आवडतात सगळ्या जगभर घेऊन फिरवत ती भांडी वापरत असते. तिला तर बाबांनी मिक्सर, कपाट, फ्रिज, डॉक्टरचा सेट, हॉस्पिटलचा सेट अशा सगळ्या गोष्टी आणून दिल्या आहेत!

शाळेत सुद्धा तिला माझ्याच नावाने ओळखले जाते. ‘अनघाची लहान बहिण ना ग तू’ असे म्हणून सौम्याची ओळख सध्या आहे. त्याचे तिला बऱ्याचदा वाईटही वाटते की मला सगळेजण ताईच्या नावाने ओळखतात असे ती बोलत असते.

सौम्याला गाणे गायला, नाच करायला आणि लिहायला फार आवडते. ती लहान असून सुद्धा घर स्वच्छ ठेवते. तिला रांगोळी काढायला खूप आवडते. मुळात काय तर लहान असून आई-बाबांची आदर्श मुलगी झाली आहे आणि त्याच्याविरुद्ध मी आळशी! काहीच काम न करणारी असे आई मला खूप ओरडते. पण मी तिचे खूप लाड करते आणि म्हणूनच आई-बाबा मला जरा कमी ओरडतात. अशा रीतीने आमचे चौघांचे चौकोनी कुटुंब अत्यंत छान आहे आणि मला माझी बहिण सौम्या खूप जास्त आवडते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *