माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी

माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी

प्राण्यांचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे ‘जंगली प्राणी’ आणि एक ‘पाळीव प्राणी’. जंगली प्राणी आपण घरात आणून ठेवत नाही, पण पाळीव प्राणी आपण घरात पाळतो म्हणूनच त्याला पाळीव प्राणी असे म्हणतात. त्या पाळीव प्राण्यांमध्ये मांजर, कुत्रा, ससा, कासव व इतर या सगळ्याचा समावेश असतो. परंतु मला सगळ्यात जास्त ‘मांजर’ हा प्राणी आवडतो!

मांजराचे रंग खूप छान-छान आणि वेगळे-वेगळे असतात. त्यात करड्या, राखडी, निळा, पिवळ्या, पांढऱ्या, चॉकलेटी अशा अनेक रंगांच्या या मांजरी असतात. मांजर ही कायम मऊ-लुसलुशीत अशी असते. त्यांचे डोळे पण खूप वेगळेवेगळे असतात. प्रत्येक रंगाचे असे वेग-वेगळे डोळे प्रत्येक मांजरीला असतात.

या मांजरींच्याही अनेक जाती असतात. जसे ‘भारतीय मांजरी’ या ‘पर्शियन मांजरी’ पेक्षा खूप वेगळ्या असतात. ज्या पर्शियन मांजरी असतात त्यांचा आकार साधारण मोठा असतो आणि त्यांचे केसही बरेच झुपकेदार असे असतात.

मांजर मुळातच खूप हुशार असा प्राणी आहे. मांजरीला कधी अंघोळ घालावी लागत नाही. ती स्वतःच्या स्वतः चाटून स्वतःचे शरीर स्वच्छ करते. त्यामुळे मांजर पाळणाऱ्या लोकांना तिला अंघोळ घालत बसायचे काम करावे लागत नाही. परंतु कधीकधी मांजर जर खूप मातीत खेळून आली असेल किंवा घाण झाली असेल तरच मांजरीला पाण्याने धुतात. मुळात मांजरीना पाण्याची भीती वाटत असल्या कारणाने त्यांना अंघोळ खूप कमी वेळा घातली जाते.

कधीकधी मांजरी या एक रंगाच्या असतात, तर कधी कधी दोन रंगांच्या पट्ट्याच्या देखील मांजरी असतात, पांढऱ्या-काळ्या मांजरी किंवा पांढऱ्या-चॉकलेटी मांजरी. अशा अनेक प्रकार असलेल्या मांजरी आपल्याला आढळून येतात.

या सगळ्या मांजरीमध्ये पण मला पांढऱ्या शुभ्र रंगाची आणि हिरवे डोळे असलेली मांजर खूप आवडते! आम्ही कितीतरी वर्षांपासून अशा मांजरीचा शोध घेत होतो. परंतु कधी कोणाचे डोळे वेगळे असायचे, तर कधी ती मांजर खूपच लहान असायचे. त्यामुळे आम्ही घरी कधी तिला पाळण्याचा निर्णय घेतला नाही. पण अशीच माझ्या आवडीची एक मांजर माझ्या आयुष्यात आली, ती म्हणजे मिनू!

मिनू ही पांढरीशुभ्र, मऊ मऊ, लुसलुशीत आणि हिरव्या डोळ्यांची अशी खूप छान दिसणारी आहे. मिनूला दूध प्यायला, पोळी खायला, संपूर्ण अंग चाटायला, खेळायला आणि लोळायला फार आवडते. मिनू चे दात खूप मजबूत आहेत. तिला मासे खायला पण खूप आवडतात.

मिनू कुलकर्णी काकांकडे राहते, त्यांनी ती पाळली आहेत. कुलकर्णी काकांकडे तिला नॉनव्हेज खायला मिळत नाही. फक्त भात, दूध आणि बाकीच्या पालेभाज्या अशा गोष्टी तिला खायला मिळतात. मग जेव्हा आमच्याकडे नॉनव्हेज बनते, तेव्हा आम्ही मिनूला आमच्याकडे घेऊन येतो, ती आमच्याकडे येऊन अंडी, मासे, चिकन अशा सगळ्या गोष्टी खाते.

मिनू तशी आमच्या बिल्डिंग मधल्या सगळ्यांचीच आवडती मांजर आहे. ती खूप गुबगुबीत आहे, तिच्या मिशा सुद्धा खूप झुबकेदार अशा आहेत. तिला स्वतःलाच उंदराची खूप भीती वाटते!

एके दिवशी मी ऑफिसमधून घरी येत असताना आमच्या बिल्डींग खाली करड्या रंगाचे मांजर व तीच पिल्लू मला सापडले. त्या मांजरीवर बहुतेक कुत्र्याने हल्ला केला असणार. त्यामुळे ती थोडी जखमी अवस्थेतच आम्हाला सापडली. मला त्या मांजरीची फार दया आली आणि मांजरीला आणि तिच्या छोट्या पिल्लाला घेऊन मी घरी घेऊन आले. ती आमच्या घरी आल्यावर इतकी घाबरली होती की एका कोपऱ्यात तिच्या पिल्लाला घेऊन जाऊन बसली. मला आणि माझ्या आईला तिची फारच दया आली. आम्ही त्वरित तिला वेटरनरी डॉक्टर कडे घेऊन गेलो. तिची मलमपट्टी करून आणली.

ती सुरुवातीला काहीच खात नाही म्हणून ती आजारी पडली. ती खावी म्हणून आम्ही तिला इंजेक्शनने दूध भरवले. मग हळूहळू जसे आम्ही तिला ओळखीचे झालो आणि आम्हाला तिच्या सवई कळल्या, तशी हळूहळू ती आमच्या घरात रुळायला लागली. आम्ही तिचे नाव ठेवले ‘शिलू’!

शिलू आमच्या घरात खूपच छान रमली. पण तिचं पिल्लू मात्र थोड्याच दिवसात घरातून पळून गेले. त्या पिल्याला शोधण्यासाठी आम्ही पूर्ण रस्ता धुंडाळून काढला. जागोजागी तिचे चित्रे लावले. पण आम्हाला काही तिचे पिल्लू सापडले नाही. ते पिल्लू गायब झाल्यानंतर शीलू खूप उदास उदास असायची, पण काही दिवसांनी ती परत पहिल्यासारखी झाली.

शिलू आमच्या घरात आल्यापासून फक्त नॉनव्हेज खाते. तिच्या आवडते खेळणी म्हणजे एक ‘खुळखुळा’ व भांडी वाजवत बसणे. ज्या वेळेला तिला पेट फूड खायला देतो त्यावेळेला ती त्या पेट फूड बरोबर खेळत बसते. त्याच्याशी खेळणे हा तिचा आवडता छंद आहे!

आमची शिलू ही इतकी धीट आहे, की ती रस्त्यावरच्या कोणत्याही मांजरीला घाबरत नाही. उलट त्यांच्याशी जाऊन भांडण करून येते. ती मिनू सारखी घाबरत सुद्धा नाही, ती उंदराला पहिल्या फटक्यात मारते, त्याला खात नाही पण त्याला पळवून लावते.

शिलू कडे बघून असच वाटते, उगाच मांजरीला ‘वाघाची मावशी’ म्हणत नाहीत. ती कुत्र्याला देखील घाबरवते. तिची एक आवडती गोष्ट म्हणजे सकाळी येऊन माझ्या अंगावर पडून मला ‘म्याऊ-म्याऊ’ करत उठवायचे आणि ती गोष्ट मलाही फार आवडते.

तिच्यामुळे आमच्या घरात एक वेगळ्या प्रकारचे चैतन्य निर्माण झालेय. मुळात ती आणायच्या आधी माझ्या आईने ‘कोणताच पाळीव प्राणी आपण घरात पाळायचे नाही.’ अशी सक्त ताकीद मला दिली होती. पण तिची एकूण अवस्था बघून आणि तिला जखमी बघून माझ्या आईने तिला ठेवून घेण्याचा निर्णय घेतला. ठेवून घेतल्यावरती आमच्या सगळ्यांची ती अत्यंत लाडकी झाली. बाबा तर रोज तिला एक गोष्ट सांगितल्याशिवाय झोपतच नाहीत आणि तिला देखील मराठी कळते! अशा अविर्भावात ती रोज गोष्टीचा आनंद घेते आणि मगच झोपी जाते.

माझ्या मांजरीला गप्पा मारायला फार आवडतात. दर रविवारी आम्ही तिला आंघोळ घालून तिची स्वच्छता करतो. आमची शिलू ही बाकीच्या मांजरीन पेक्षा खूप वेगळी आहे. ती फक्त कधीतरीच नख मारते आणि आवडले नाही की वर जाऊन बसते. बाकीच्या मांजरी जितकी चिडचिड करतात तितकी शिलू कधीच चिडत नाही किंवा नख मारत नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *