मी अनुभवलेला २६ जानेवारी

२६ जानेवारी, २०२३ हा दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. २६ जानेवारी, २०२३ ला भारताला ७५ वर्ष पूर्ण झाली.मी आणि माझी मैत्रीण मरीन ड्राईव्हला प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करायला भेटलो होतो. त्यावेळी आम्हाला भारतीय सैन्यातील एक रिटायर्ड जनरल जाधव सर भेटले. मरीन ड्राईव्हला अनेक लोक भारताचा हा दिवस जल्लोषात साजरा करायला एकत्र जमले होते.

या सगळ्या लोकांमध्येच एक होते ते जाधव सर. त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांचा एक प्रसन्न चेहरा आम्हाला दिसला. साधारण ते ९०-९५ वर्षाचे ते आजोबा आहेत. सगळ्या लोकांकडे ते अत्यंत उत्साहाने बघत होते. पण त्यांच्याकडे मात्र कोणी लक्ष देत नव्हते. कारण मरीन ड्राइव वरती सगळे नेहमीच आपापल्या गोष्टींमध्ये मग्न असतात, तसेच त्या दिवशी पण होते. आम्ही सुद्धा आमच्या आमच्या गप्पा मारत होतो. पण माझ्या मैत्रिणीचे लक्ष्य आजोबांकडे गेले आणि तिने मला दाखवले. आम्हाला मात्र त्यांच्याकडे बघून एक उत्सुकता निर्माण झाली.

त्यांनी करड्या रंगाचा सदरा आणि लाल रंगाची टोपी घातली होती. त्यांच्याकडे बघून आम्हाला असे वाटले की त्यांना आमच्याशी बोलायचे आहे. आम्ही त्यांच्याकडे बघत होतो, हे त्यांनी बघितले आणि आमच्याकडे बघून ‘इकडे ये’ अशी खूण केली. मी आणि अश्विनी त्यांच्याकडे गेलो, त्यांनी आम्हाला विचारले,” कुठून आला आहात? काय करता?” वगैरे. आम्ही सुद्धा खूप उत्साहात त्यांना तुम्ही काय करता? तुमची बॅकग्राऊंड काय आहे?? हे सगळे विचारायला सुरुवात केली. त्यांना बहुतेक हे खूप आवडले आणि ते बोलायला लागले, “बाळा मी इकडे गेले पंचवीस वर्षे येतोय. तुमच्या सारखी तरुण मंडळी इथे येतात माझ्याशी बोलतात. मला त्यांच्याशी बोलून बरे वाटते. त्यांना माझ्याकडून बरंच काही शिकायला मिळते, हे मला फार आवडते. मी भारतीय सैन्यातून नियुक्त झालेला एक जनरल ऑफिसर आहे. माझे वय वर्ष ९५आहे. मी अनेक युद्धांना आणि अनेक राजकीय गोष्टींना सामोरे गेलेलो आहे. भारत हा स्वतःहून जरी कधी युद्ध करत नसला, तरी आपले अनेक दुश्मन आहेत. शत्रूला हरवण्यात माझे आयुष्य पणाला लागले यात मला खूप धन्यता आहे. म्हणूनच दरवर्षी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला मी इकडे आवर्जून येतोच आणि बाकीच्या दिवशी भारताला अजून कसे समृद्ध करू शकू, यासाठी मी प्रयत्न करत असतो! आपल्या भारताला जर महासत्ता बनवायचा असेल, तर आपण सगळ्यांनी एकमेकांशी न भांडता, आपुलकीने देशाची प्रगती करणे महत्त्वाचे आहे. ह्या देशाप्रती हे तरुण पिढीला सांगणे आणि जनजागृती करण, हे मी माझे कर्तव्य मानतो.”

आम्हाला हे ऐकून खरंच खूप बरे वाटले, त्यांचं वय ९५ असून आयुष्यात कधीच हार न मानून तो व्यक्ती अजूनही एका वेगळ्या पद्धतीने देशासाठी लढतो आहे. हे बघून आमच्या दोघींना एक वेगळाच उत्साह संचारला. मी इतिहास प्रेमी असल्याकारणाने त्यांना स्वातंत्र्यपूर्वीच्या इतिहासाबद्दल विचारले. त्यांनी अनुभव सांगायला सुरुवात केली, कसे ब्रिटिशर आपल्यावर जुलूम करायचे? आपल्याला किती कमी लेखायचे. आपल्याला आपल्याच देशात नोकरासारखे वागाव लागायचे. एक नाही दहा अनुभव त्यांनी सांगितले! अंगावर शहारा येण्यासारखे ते अनुभव होते. पारतंत्र्यात असलेला देश हा राहण्यासाठी नागरिकांसाठी खरंच खूप त्रासदायक बनला होता. स्वातंत्र्याचा खरं महत्त्व त्यांच्या इतकाच कोणी अनुभवलेलं नसणार. त्या पिढीने भारताचे अनेक टप्पे बघितले. स्वातंत्र्य मग आणीबाणी,आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींचे महत्त्व, भारत-चीन युद्ध, त्यावेळचा ब्लॅक आऊट. भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, अशा एक नाही अनेक समस्यांना ती पिढी सामोरी गेली होती. सगळ्यात महत्त्वाचे हरितक्रांती आणि दूधक्रांती!, पूर्वी अमेरिकेतून आणलेला सडका गहू खाऊन त्यांनी आयुष्य काढलेले होते. हे सगळे अनुभव खूप अंगावर येत होते. ते बोलत होते आणि आम्हाला भारताचे जुने चित्र डोळ्यासमोरून जात होते. त्यावेळी असे वाटले, की आपण किती भाग्यवान आहोत, आपला जन्म 2000 नंतर झाला. आपल्याला आता सगळ्या सुख-सुविधा उपलब्ध आहेत.

भारतासाठी जे लढले, ज्यांनी आपले रक्त सांडले, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवाची कालवा कालव केली, त्यांच्या कष्टांचे खरंच आपण चीज करत आहोत का? हा प्रश्न भेडसावून गेला. आपण या देशासाठी एक नागरिक असण्यासाठी काय बरं करतो? ज्या माणसाने आयुष्यभर फक्त देशाची सेवा केली त्याच्यासमोर उभं राहायची तरी आपली लायकी आहे का? हा प्रश्न आम्हाला दोघींना पडला. मनात विचार आला की खरंच देशाला जर महासत्ता बनवायचे असेल तर आपण आपल्या परीने एक माणूस म्हणून देशाचा जबाबदार नागरिक म्हणून काय करू शकतो? या देशाची कशी सेवा करू शकतो? याची कल्पना आली.  ही दोन तासाची भेट आम्हाला आयुष्यभराची शिकवण देऊन गेली! काही माणसं भेटतात आणि आपल्याला खूप काही देऊन जातात, हे आमच्या बाबतीत खरे ठरले आणि म्हणूनच २६ जानेवारी, २०२३ हा दिवस मी खरंच कधीच विसरू शकणार नाही! कारण जीवनाला कलाटणी देणारे प्रसंग काय असतात, हे मी अनुभवले आहे. या माणसाला भेटून मी नक्कीच आपल्या देशासाठी काही ना काहीतरी छोटे मोठे का होईना आयुष्यात करणार, हे ठरवले ते याच दिवशी! जनरल जाधव सर तुम्हाला खरंच मानाचा मुजरा!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *