माझ्या आवडीची सहल

शाळेत असताना सहल हा प्रकार सगळ्यांनाच खूप आवडीचा असतो. शाळेत असतानाची सहल ही खूप वेगळी असते, कारण आपण मित्र-मैत्रिणींबरोबर मजा करत एकत्र खात पीत, गाणी म्हणत, गेम खेळत जात असतो. त्यामुळे मी शाळेत असताना मला सहलीला जायला खूप आवडायचे.

सहलीला जाणे, हा वर्षभरातील सगळ्यात जास्त आनंद देणारा भाग असायचा. त्यामुळे नववीपर्यंत मी दरवर्षी सहलीला गेले. दहावीला बाबांनी “परीक्षा आहे, जायचे नाही. अभ्यास करायचा!” म्हणून बाबांनी पाठवले नाही. परंतु पहिली ते नववी यातला एकही वर्ष मी सहलीला गेले नाही असे झाले नाही.

तशी तर आमची शाळा वॉटर पार्क किंवा एखादे रिसॉर्ट अशा ठिकाणी आम्हाला सहलीला न्यायची. परंतु दरवर्षी नवीन ठिकाण असायचे. त्यामुळे प्रत्येक वर्षीचा उत्साह वेगळा असायचा.

आणि या सगळ्यांमध्ये मला एक सहल फार जास्त आवडली, ती आयुष्यभर लक्षात राहील. ती म्हणजे ‘सगुणा बाग ची सहल’.

‘सगुणा बाग’ हे ठिकाण कर्जत आणि नेरळ याच्या मध्ये आहे. नेरळ स्टेशन पासून सगुणा बागला जाणे खूप सोपे आहे.

सहलीच्या दिवशी सकाळी साडेसहाला आमच्या सगळ्यांच्या ठरलेल्या बस मध्ये आम्हाला बसायला सांगितले. तीन वेगवेगळ्या बस मध्ये आम्ही सगळे बसलो, प्रवासाला निघालो. माझ्या मैत्रिणी काही माझ्या बस मध्ये होत्या, तर काही दुसरीकडे. मग आम्ही सगळ्यांनी गाणी म्हणत म्हणत आणलेला खाऊ खात, मजा करत सहलीला निघालो. वाटेत फक्त पाच मिनिटे चहा पिण्यासाठी शिक्षकांनी बस थांबवली. आम्ही सगळे वरती बसमध्येच दंगा करत होतो. मग साधारण नऊ वाजता आम्ही ‘सगुना बाग’ ला पोहोचलो.

सगळेजण बस म्हणून उत्तरलो आणि उतरल्यानंतर जे दृश्य पहिले ते खूपच छान होते. निसर्गरम्य अशा ठिकाणी आम्ही आलेलो होतो. इथले वातावरणही खूप वेगळे होते. वातावरणात छान थंडावा होता, आजूबाजूला हिरवळ होते आणि सगळ्यात महत्त्वाचे गावचे असे वातावरण त्यांनी निर्माण केले होते.

आम्ही सगळे उतरल्यावर आम्हाला प्रत्येकाच्या रूम्स वितरीत केल्या गेल्या, जिथे मुले एका ठिकाणी राहत होते आणि मुले एका ठिकाणी राहणार होत्या. मग आम्ही सगळे नाश्त्याला एकत्र भेटलो. सगळ्यांनी मिसळपाव वर मस्त ताव मारला, खाता खाता आम्ही सगळ्यांनी खूप दंगा केला. आम्हाला शिक्षकांनी एक एक ऍक्टिव्हिटी नीट समजावली. आम्ही एक एक गोष्ट करायला ग्रुप मध्ये विभागले गेलो.

त्यात आम्हाला गाईचे दूध काढणे, शेणापासून गोवऱ्या बनवणे अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज होत्या.

सगळ्यात सुरुवातीला आम्हाला एका गोठ्यात घेऊन गेले. तिथे दूध काढायला लावले. आपण अगदी सहजरीत्या प्लास्टिक पिशवीतून दूध घरी आणतो, परंतु दूध काढायला किती मेहनत लागते, हे त्या दिवशी कळले. दूध काढत असताना गाय लाथ सुद्धा मारते आणि आपण गाईला आपलेपणाने करायचे असते याचा धडा मिळाला. त्यानंतर आम्हाला शेणामध्ये थोडेसे सुकलेले गवत आणि उरलेली धान्याची पूड दिली, त्यांना आम्ही गोवऱ्या बनवल्या. करत असताना सुरुवातीला खूप घाण वाटले परंतु नंतर आम्हाला त्याचे महत्त्व पटले. त्यानंतर आम्हाला सगळ्यांना बैलगाडीची सफर करून आणली. बैलगाडी मध्ये किती मजा येते याची कल्पनाच आम्हाला नव्हती!

त्यानंतर आम्ही आर्चरी नावाचा एक खेळ खेळलो. लहानपणी कथा वाचल्या होत्या की धनुष्यबाण कसे चालवावे? धनुष्यबाण चालवताना किती लक्ष द्यावे लागते, हे सगळे आम्हाला हा खेळ खेळताना जाणवले.

त्यानंतर मुलांच्या संघाने गल्ली क्रिकेट खेळाची सुरुवात केली, सगळी मुले दोन गटांमध्ये विभागली गेली आणि मग क्रिकेटची स्पर्धा खूप छान रंगली. आम्ही मुलींनी बॅडमिंटन खेळायचे ठरवले. थोडा वेळ खेळल्यानंतर सरांनी आम्हाला खूप महत्त्वाच्या खेळासाठी बोलवले ते म्हणजे ‘झिप लाईन’. हा खेळ तसा थोडासा निकरीचाच आहे. या खेळात आपल्याला सगळे धैर्य एकवटून झिप लाईन करावे लागते, म्हणजे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विद्युत लाईनीच्या सहाय्याने जावे लागते. त्यावेळेला त्या दोरीचाच आधार असतो. आमच्यातले बरेचसे लोक हे करायला खूप घाबरत होते. परंतु सगळ्यांनी एकत्र मिळून ही ऍक्टिव्हिटी केली आणि सगळ्यांना खूप मजा आली.

त्यानंतर आम्हाला वडाच्या पारंब्यांना बांधलेल्या झोपाळ्यावर खेळायला नेले आणि थोड्या वेळाने फिशिंग सुद्धा केले, पकडलेले मासे मग आम्ही बार्बेक्यू करण्यासाठी दिले.

अशा पद्धतीने रात्र कधी झाली हे कळलेच नाही. रात्री जेवता जेवता आम्ही मस्त गाणी ऐकत जेवलो, थोडासा दंगा केला मग झोपी गेलो. दिवसभर खूप दमलो होतो, त्यामुळे सगळेजण लवकर झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून चहा नाश्ता करून आम्ही निघायची संपूर्ण तयारी केली. बाईंनी आम्हाला ‘इकडचे प्रॉडक्ट विकत घ्यायचे असतील तर घ्या’ असे सांगितले. मी एक लोणच्याची बाटली, एक जामची बाटली विकत घेतली. आम्ही तिकडून सगळेजण निघालो आणि बस मध्ये बसलो. अशीही सुंदर सहल मला आयुष्यभरासाठी लक्षात राहील.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *