माझे घर

प्रत्येक माणसासाठी त्याच घर खूप खास असते. सगळेजण मिळून आपले-आपले घर खूप प्रेमाने सजवत असतात. त्यातली एकेक वस्तू माणूस प्रेमाने आणि खूप कष्टाने घेऊन आलेला असतो .

माझ्या आईने मला लहानपणी एक कविता शिकवली होती. ती अशी होती , “घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती.” म्हणजे घर हे माणसांमुळे बनते. नुसत्या भिंती कधीच घर नसतात, घर हे कायम कुटुंबामुळेच बनते. म्हणूनच प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात घराचे महत्व खूप जास्त असते.

आमचे मुंबईला घर आहे. पण ‘घर’ हा शब्द म्हटल्यावर मला आठवते, ते माझे आजोळ. रत्नागिरीतले आमचे कोकणातले घर!

आम्ही एकूण १८ ते २० लोक, सगळेजण मिळून एकत्र रत्नागिरीला दरवर्षी जातो. उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळी आणि गणपती हे दिवस ठरलेले असतात. जेव्हा आम्ही कोकणात जातो. मावशी, मामा, मामी, त्यांची दोन मुले, आत्या, काका सगळेजण एकत्र मिळून आम्ही खूप दंगा करतो.

हे घर आजोबांनी मुळात खूप वेगळया कारणासाठी बांधले होत. आम्ही सगळे मुंबईत स्थायिक असून सुद्धा. आजोबांनी घर कोकणात घेण्याचा कारण असे आहे की, माझ्या आजीला त्यावेळी हृदय विकाराचा झटका आला होता. म्हणून आजोबा तिला मुंबईच्या दूषित वातावरणापासून वेगळे लांब असे रत्नागिरीच्या छान हवेच्या ठिकाणी घेऊन आले.

इथे आल्यावर एक तर हवा खूप छान आहे. तसेच इकडचे घरही खूप छान आहे. म्हणून आजीचे आयुष्य खरंच वाढले आणि या कारणामुळे आमच एक छान घर कोकणात झाले.

आमचे हे घर खूपच छान आहे. बंगल्याचे नावच ‘कुटुंब’ असे आहे. घरात आल्या-आल्या छान मोठे अंगण आहे. अंगणातून आत गेल्यावर चौकदार असा एक भाग आहे, जिथे मोठा दिवाणखाना आहे. छान मोठ्या लाकडी कौलांचं टूनटूनीत घर आहे. पुढे अंगण, अंगणामध्ये आजी रोज रांगोळी काढते. मोठा दिवाणखाणा, मागचे अंगण, सागवानी लाकडाने बांधलेला फर्निचर, हे आजकाल बघायला दुर्मिळ आहे. कारण त्याची किंमत फार जास्त असते. त्यामुळे खूप कमी लोक आता सागवानी लाकडाचे फर्निचर बनवून घेतात.

प्रत्येक गोष्ट खूप खास आहे. काळ्या रंगाच्या फरश्या ज्यामुळे घर थंड वाटते. बाहेर कितीही गरम असले तरी, घरात या फरशांमुळे खूप थंड वातावरण असते, त्यामुळे घरात खूप छान वाटते. देवघर तर खूपच छान आहे. त्यात असणाऱ्या सगळ्या मुर्त्या यापूर्वीच्या पितळ्याच्या बनवलेल्या आहेत. या मुर्त्यांवरचे कोरीव काम देखील खूप वेगळे आहेत. तसेच पितळेची भांडी देखील आहेत. आता तशी भांडी बनत देखील नाहीत आणि बघायलाही मिळत नाही.

आजी-आजोबांनी आम्हाला कायम संस्कृती जपायला शिकवले. त्यामुळेच त्यांनी आम्हाला घर सगळ्यांचे असते आणि सगळ्यांनी कामे करायची असतात हे शिकवले. त्यामुळे आमच्या घरात कोणी एकच व्यक्ती सगळी काम करत नाही. आम्ही सगळे मिळून सगळ्या कामांना हातभार लावतो. त्यामुळे कधीच कामामुळे एकमेकांशी भांडणे, एकमेकांचा तिरस्कार करणे, अशा काही गोष्टी आमच्या घरात घडत नाहीत.

तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अंगणामध्ये असलेली झाड आजकालच्या ‘फ्लॅट सिस्टीम’ मध्ये कुठे ना कुठे आपण कमी लावतो. परंतु या घरात आजीने अगदी तुळशी पासून ते आंब्याच्या झाडापर्यंत सगळी झाडे लावली आहेत. सगळ्यात जास्त आकर्षण हे पारिजातकाच्या झाडाचे आणि चाफ्याच्या झाडाचे आहे. कारण त्याचा सुगंध घरभर दरवळत असतो. घराच्या गेटवर आत आल्यापासूनच पारिजातकाचा सुवास चालू होतो. कधी कधी या झाडांखाली सापही आढळतो.

तसेच या घरात सुंदर फर्निचर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजीने काही खास पदार्थांसाठी आणि महत्त्वाच्या सणवारांसाठी घरात चूल देखील बनवून घेतली आहे. गणपतीमध्ये नैवेद्याच्या वेळी उकडीचे मोदक आम्ही या चुलीवरतीच करतो! चुलीवरच्या वेगळ्या जेवणाची चव खरच खूप छान असते!

या घराचा प्रत्येक कोपरा वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेला आहे. आज कालच्या ज्या गोष्टी खूप दुर्मिळ आहेत, त्या सगळ्या गोष्टी आजीच्या घरी आम्हाला सापडतात. आई, मावशी आणि मामाने या सगळ्या गोष्टी खूप कष्ट करून आणल्या आहेत. या घरामुळे माझ्या आईचे तर तारुण्य खूप छानच गेले. पण आमच्या बाकीच्या भावांच्या लहानपणीच्या आठवणी आणि माझे बालपण माझ्या घराने जिवंत ठेवले आहे. म्हणूनच मला हे घर खूप आवडते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *