माझे बालपण निबंध

Featured Image-maze balpan essay in marathi

माझे बालपण निबंध

प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो, ते त्यांचे ‘बालपण’. बालपण आपल्याला सगळ्यात सुंदर आठवणी देऊन जाते. कोणाचा बालपण खूप सुखद असते, तर कोणाचे बालपण खूप कठीण असते. कोणी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात, तर कोणाच्या घरी परिस्थितीमुळे दोन वेळेस अन्न देखील मिळत नाही! त्यामुळे प्रत्येकाचे बालपण हे वेगळे वेगळे असते. पण ते कसेही असले तरी ते खूप आनंददायी असते.

माझे बालपण खूप छान गेले. आमची ‘नाईन्टीज किड्स जनरेशन’ खरंच आयुष्याची खूप मजा घेते. कारण आम्हाला खूप अगदीआधुनिक काळात जन्माला येता आले नाही आणि अगदीच पूर्वीच्या काळी जन्माला आलो नाही. म्हणजेच काय तर आमच्या जनरेशनने सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला!

आम्हाला ‘मिलेनियम किड्स’ असे म्हणतात. आम्ही अगदी मातीत खेळलो. आमच्या आईनी कधीच आम्हाला अडवले नाही. शाळेत असताना काही आमच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणे सुद्धा आले नव्हते. थोडे मोठ झाल्यावर आम्ही ‘व्हिडिओ गेम’ पण खेळायचो आणि कबड्डी पण खेळायचो. अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही एकत्र आनंद घेतला.

माझा जन्म दादरच्या एका चाळीत झाल्याने मी लहानपणी सगळ्या काकूंच्या घरात फिरले. कधीच नुसती आईकडे राहून एकलकोंडी झाले नाही. आजकालची मुले नुसती त्यांच्या आईकडे किंवा वडिलांकडे असतात. त्यामुळे त्यांना बाकीची नाती शेजार-पाजार यांचा ओलावा मिळत नाही.

मी सहा वर्षाची असताना आम्ही डोंबिवलीला शिफ्ट झालो. शाळेतून फ्लॅटमध्ये आल्यावर सगळ्यांची घरांची दारे उघडी असायची. म्हणजे आजकालची फ्लॅट सिस्टीम आमच्याकडे लोकांना माहिती पण नव्हती. बिल्डींग मधले लोक एकत्र एकमेकांशी संवाद साधायचे, एकमेकांबरोबर राहायचे, मजा करायचे. तसे आजकाल लोक इमारतीत राहून सुद्धा करत नाहीत.

तसेच आम्ही असे सगळे खेळ खेळलो जे आता अस्तित्वातही नाहीये. उदाहरणार्थ विटी दांडू नावाचा खेळ, काच बांगड्या, डोंगर का पाणी, संगीत खुर्ची, चमचा लिंबू, लंगडी, कबड्डी आणि अजून खूप सारे.

प्रत्येक खेळाचे  एक वेगळे वैशिष्ट्य असायचे. अगदी सुरुवातीला आमच्या आई-बाबांनी आम्हाला भांडीकुंडी आणून दिली होती. पितळ्याची, स्टीलची अशी ती भांडीकुंडी आम्ही खेळायचो!

आम्हाला लहानपणी कधीच हातात मोबाईल, व्हिडिओ गेम या गोष्टी दिल्या नाहीत. त्यामुळेच आम्हाला खेळाचे महत्व आजही आहे. खेळत असताना आपले अनेक मित्र मैत्रिणी होतात! त्यांच्याशी आयुष्यभराचे नातं होऊन जाते. कारण लहानपणी झालेले मित्र मैत्रिणी हे अगदी खरे मित्र मैत्रिणी असतात. लहान वयात कोण चांगले, कोण वाईट हे आपल्याला कळत नसते त्यामुळे आपण अगदी निखळ मैत्री करतो.

त्यानंतर थोडे मोठे झाल्यावर आम्ही सुट्टी लागली की आजोळी जायला आतुर असायचो. कारण आजीच्या घरी मामाची मुले, मावशीची  मुले सगळी एकत्र यायचे आणि आम्ही धमाल करायचो. माझ्या आजी-आजोबांचे घर नाशिकला होते, म्हणून आम्ही सगळे उठून नाशिकला निघायचो. तिथे आजीचा बंगला होता, बंगल्याच्या मागे खूप छान झाडे लावलेली होती. त्यामुळे झाडांना पाणी घालणे, पाण्यात खेळणे हे आमचे आवडते छंद असायचे. मग रात्री गच्चीत सगळेजण गप्पा मारत बसायचो आणि सगळेजण एकत्र भेळ बनवायचे किंवा मग खायला काहीतरी करून द्यायचे.

आता ‘आजोळ’ ही संकल्पनाच मुळात अस्तित्वात राहिलेली नाही, परंतु आम्ही लहान असताना ‘आजोळी जाणे’ म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असायची!

शाळेला सुट्टी लागली की आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एकत्र गृहपाठ करायचो. आई-वडिलांनी आम्हाला एसएससी बोर्डच्या मराठी माध्यमात टाकले. त्यामुळे आमची भाषा ही खूप समृद्ध झाली. मराठी पण आणि इंग्रजी पण!  इंग्रजी सुधारावी म्हणून इंग्रजी व्याकरण देखील आम्ही अगदी घोकून छान पाठ केले. आजकालच्या मुलांना आपली मातृभाषा देखील नीट बोलता येत नाही. म्हणूनच आमची पिढी ही कदाचित शेवटची पिढी असेल जी आई-वडिलांचा, शिक्षकांचा, आजी-आजोबांचा मान राखते. माझे बालपण मला खरंच खूप आवडते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *