भारतात अनेक राज्यांमध्ये अनेक वेगवेगळे सण साजरे होतात. पावसाळा ऋतू संपला की, श्रावण महिना येतो. श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवातच होते. परंतु माझा आवडता सण हा ‘होळी’ आहे. होळीचे खूप महत्त्व आपल्या देशात आहे. होळी म्हणजे रंगांची उधळण आणि दुष्ट प्रवृत्ती चा नाईनाट.
भारतामध्ये होळी ही वेगळ्या प्रकाराने साजरी केली जाते. दक्षिण भागात ती साजरी करण्याची पद्धत वेगळी आहे. तर उत्तर भारतात वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करतात. परंतु होळी साजरी करण्याचा हेतू सगळ्यांचा सारखाच असतो. होळीच्या बरोबरीने दुसऱ्या दिवशी ‘रंगपंचमी’ हा सण देखील असतो. रंगपंचमीला रंगांची उधळण होते. तर होळीला होळी पेटवून आपण हिवाळ्याच्या थंडीला निरोप देत असतो. हा सण साधारण मार्च महिन्यामध्ये येतो, जेव्हा थंडीची लाट खूप तीव्र असते आणि थंडी संपायला आलेली असते. त्या थंडीच्या काळात होळीच्या निमित्ताने जरा उबदार वातावरण आजूबाजूला झालेले असते.
होळी कशी साजरी करतात? तर होळीला नारळाच्या जावळ्या, गवत, शेणाच्या गोवऱ्या या सगळ्याचा मिळून एक उंच असा ‘माड’ तयार केला जातो. त्यानंतर लाकूड जाळून या होळीला पेटवले जाते. मग सगळ्या बायका एकत्र येऊन त्या होळीची पूजा करतात. त्याला गोल प्रदक्षिणा घालत “होळी आली रे! होळी आली रे!’’ असे म्हणत त्यांच्या आयुष्यातील वाईट त्या होळीमध्ये टाकून देतात. म्हणजेच वाईट प्रवृत्तीचा विनाश होतो आणि चांगल्या प्रवृत्तीचा विजय होतो.
काही ठिकाणी होळीला गुळाची पुरणपोळी असते. परंतु उत्तर भारतामध्ये ‘गुजिया’ नावाचा एक गोड करंजी सारखा प्रकार बनवला जातो. प्रत्येक ठिकाणी खाद्य संस्कृती ही जरी वेगळी असली, तरी हा सण साजरा करण्याची तयारी मात्र सगळेजण अगदी आवर्जून करतात.
प्राचीन भारताच्या इतिहासापासून होळी हा सण आपण भारतात साजरा करतो. याचे पुरावे देखील मिळालेले आहेत. भागवत पुराणांमध्ये याची गोष्ट सांगितली जाते. ‘हिरण्यकश्यापू’ नावाचा जो राजा असतो त्याने खूप वाईट प्रवृत्ती चिंतून एक गोष्ट जगासमोर ठेवलेली असते. ते म्हणजे या संपूर्ण पृथ्वी तलावावर सगळ्यांनी त्यालाच ‘देव मानले पाहिजे’ आणि त्याच्या या दुष्ट प्रवृत्तीमुळे तो लोकांना त्रासही देत असे. त्याच्या या दुष्ट प्रवृत्तीला संपवण्यासाठी त्याच्याच मुलाने, म्हणजे प्रल्हादने ‘श्री विष्णु भगवान’ यांना साकडे घातले. हिरण्यकश्यपूला त्या गोष्टीचा खूप राग आला. त्याने त्याच्या मुलाला खूप भयानक शिक्षा दिली. त्याचा छळ बघून शेवटी भगवान विष्णू यांनी नरसिंह भगवंताचे रूप घेतले आणि हिरण्यकश्यपूला संपवले. भगवान विष्णू यांचा अर्धा सिंह आणि अर्धा मनुष्य असा अवतार बघून कोणालाही भीती वाटेल. अशा अवतारात त्याने हिरण्यकशपूचे पोट फाडले आणि त्याचा वध केला. होळीच्या आसपासच्या काळात ही घटना घडली म्हणूनच आपण प्राचीन काळापासून होळी साजरी करतो आणि दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करतो.
होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण असते म्हणूनच मला होळी फार आवडते.आम्ही लहानपणापासून होळी पेटवतो, पूजा करतो आणि दुसऱ्या दिवशी आवर्जून रंग देखील खेळतो.
तसेच होळीचे अजून एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे होळी पेटवण्यासाठी किंवा जी होळी सगळेजण मिळून तयार करतात, त्यासाठी वेगवेगळे साहित्य लोक एकत्र जाऊन घेऊन येतात. सगळे मिळून होळीचा सण एकत्र साजरा करतात.
होळीला जी पुरणपोळी केली जाते त्याचा नैवेद्य मंदिरात जाऊन बायका दाखवून येतात. त्यानंतरच घरचे सगळे त्या पुरणपोळीचा आस्वाद घेतात. याचे कारण असे की सगळ्यात पहिले आपण देवाला नैवेद्य दाखवतो, मगच जेवतो. म्हणूनच होळीची पुरणपोळी ही सगळ्यात महत्त्वाची असते. महाराष्ट्रात होळी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. तसेच सगळी लहान मुले रंगांचा खूप आनंद घेतात. परंतु आता बरेचसे लोकं पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणूनच ‘इको फ्रेंडली होळी’ ही गेल्या चार-पाच वर्षात खेळली जात आहे.
यात लोक फुलांपासून बनवलेल्या रंगांचा वापर करतात. तसेच पाण्याचा वापर शक्यतो टाळतात. यात कोरडी होळी खेळली जाते. एकमेकांना इको फ्रेंडली रंग लावले जातात. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही. आम्ही सगळी मुले रंगांच्या पिचकारी, पाण्याचे फुगे बनवून एकमेकांवर फेकत असतो. परंतु एक-दोन वर्षापासून आम्ही पर्यावरणाला नुकसान नको, म्हणून फुलांची होळी खेळत आहोत. वेगवेगळी फुले एकमेकांना देऊन आम्ही होळी सण साजरा करत आहोत. भारताच्या बऱ्याचश्या भागांमध्ये होळीचा सण खूप उत्साहात साजरा होतो. त्यामध्ये सगळ्यात पहिले नाव हे ‘बनारस’ येते, त्यानंतर ‘जयपूरचे’ येते. या दोन्ही ठिकाणी होळी अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. होळी हा मुळातच अति उत्साही आणि आनंद देणारा असा सण आहे. म्हणूनच मला होळी हा सण खूप आवडतो.