ध्वनी प्रदूषण
प्रदूषण अनेक प्रकारचे असतात. हवेचे प्रदूषण, मातीचे प्रदूषण, जलप्रदूषण तसेच आवाजाचे देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. सध्याच्या आधुनिकीकरणाचा वाईट परिणाम पृथ्वीवर झाला आहे. त्यामुळे ‘वसुंधरा बचाव’ ही मोहीम सध्या काढली आहे. वसुंधरेवर आपण अनेक प्रकारच्या अत्याचार रोज करत असतो. आपल्या दैनंदिन जीवनात आपण इतक्या गोष्टींचा वापर करतो, की ज्याने प्रदूषण निर्माण होते आणि त्याचा परिणाम पृथ्वीवर होत आहे. झाडे तोडल्यामुळे आपण खूप मोठ्या प्रमाणावर जमिनीचा ह्रास तर करतच आहोत, पण झाडांचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. तसेच आवाजाच्या प्रदूषणामुळे देखील अनेक आजार होतात.
अनेक लोकांच्या कानांवरती आवाजाच्या प्रदूषणामुळे डायरेक्ट परिणाम दिसतो, त्यांना अकाली बहिरेपण जाणवते. इतकेच नाही तर ध्वनी प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम हे खूप मोठ्या प्रमाणावर असतात, ते फक्त शारीरिक नसून मानसिक ताण वाढणे, चिडचिड होणे, झोप न येणे यासारख्या गोष्टी देखील माणसाला सहन कराव्या लागतात.
मग नेमके हे ‘ध्वनी प्रदूषण’ म्हणजे काय आहे?
तर ‘ध्वनी प्रदूषण’ म्हणजे मानवनिर्मित किंवा यंत्रांच्या साहाय्याने सततचे होणारे ध्वनीचे प्रदूषण होय. प्राण्यांचे ओरडणे हे देखील आजकालच्या सरकारच्या नियमानुसार थोड्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणात येते. त्यात कुत्र्यांच्या ओरडण्याचा सहभाग सगळ्यात मोठ्या प्रमाणावर दिसतो! परंतु जास्त करून ध्वनी प्रदूषण हे मानवनिर्मित आणि यंत्र निर्मितच झालेले आपल्याला दिसते.
‘शांत वातावरणात सतत भरपूर आवाजामुळे निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे ध्वनी प्रदूषण होय’.
ध्वनी प्रदूषणाची मुख्य कारणे कोणती?
‘लोकांचा आवाज’ ध्वनी प्रदूषणात सगळ्यात मोठा वाटा आहे. लोकांच्या आवाजाचा त्रास बाकी लोकाना होत असतो. लोक एकमेकांशी समोरासमोर किंवा अगदी दूरध्वनीवर देखील बोलत असतील तरी त्यांच्या आवाजाचा पट्टा हा खूप मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे लोकांच्या मोठ्या बोलण्याचा त्रास दुसऱ्या लोकांना होतो आणि ध्वनी प्रदूषण होते.
दुसरा महत्त्वाचा आवाज म्हणजे ‘मोठ्याने वाजवणारे हॉर्न’. ट्रॅफिक मध्ये असताना सगळ्यात जास्त प्रमाणात माणूस वाहनांचा आवाज करतो. त्यामुळे कानांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. काही लोकांना बहिरेपण देखील येते. रस्त्यावर सतत आवाज झाल्या कारणाने लोकांची चिडचिड होते. त्यांचे मानसिक संतुलन बिघडते आणि लोक एकमेकांशी जोरजोरात भांडायला सुरुवात करतात. एका ध्वनी प्रदूषणाला थांबवण्यासाठी दुसरे ध्वनी प्रदूषण निर्माण होते.
तसेच वाद्यांच्या आवाजामुळे देखील ध्वनी प्रदूषण होते. जेव्हा लग्नाची वरात वगैरे असते त्यावेळेला मोठ्याने वाद्य वाजवून, डीजे लावून गाणी ऐकली जातात. त्या डीजेचा आवाज इतका मोठा असतो की त्याच्या ठोक्यांमुळे माणसाच्या छातीच्या ठोक्यांवरती परिणाम होतो. जे लहान मुले असतात त्यांच्या हृदयाचे ठोके त्या डीजेच्या आवाजामुळे वाढतात त्याचप्रमाणे आजी-आजोबांचे देखील तेच हाल होतात. अशा परिस्थितीत मोठ्यांना डीजे वाजवून लग्नाच्या वरातीत जोरजोरात नाचून आपण नक्की काय साध्य करतो याचा विचार करणे गरजेचे आहे. काही लोकांचे म्हणणे असे असते की या सगळ्या गोष्टी करून त्यांना आनंद मिळतो, परंतु दुसऱ्याला त्रास देऊन मिळणारा आनंद हा खरा आनंद असतो का? याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. मुळात आपण सामाजिक प्राणी असल्याकारणाने समाजात वावरताना प्रत्येक गोष्ट करताना याचा परिणाम नेमका काय होईल? याचा विचार करणे खूप गरजेचे असते.
फटाक्यांचा आवाज हा ध्वनी प्रदूषणाचा मुख्य स्त्रोत असतो. कोणाच्याही लग्नात वाजणारे फटाके क्रिसमस, दिवाळी, न्यू इयर अशावेळी वाजणारे फटाके हे हवेचे प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या दोन्ही गोष्टींना निमंत्रण देते. त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. बऱ्याच ठिकाणी फटाक्यांमुळे अस्थमा पेशंटला त्रास होताना आपण बघतो. त्या आवाजामुळे लहान मुले घाबरून रडायला लागतात किंवा म्हातारी माणसांची झोप होत नाही, ते देखील त्या आवाजाने घाबरतात.
गिरण्यांमधील भोंगे मोठ्या प्रमाणावर वाचतात आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. ज्या गिरण्या असतात तिथे कर्मचाऱ्यांनी वेळेवर पोहोचले जावे, गिरणी काम चालू आहे हे सर्वांना समजण्यासाठी गिरणीचे भोंगे वाजवले जायचे, त्या मुळे देखील मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होते.
विविध माध्यमातून जशी दूरदर्शन, रेडिओ या सर्वांमुळे देखील थोडेफार प्रमाणात ध्वनी प्रदूषण होताना दिसते.
ध्वनी प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम हे शारीरिक, मानसिक दोन्ही प्रकारचे असतात. शारीरिक तर बहिरेपणा येतोच पण मानसिक ताण वाढतो, चिडचिड होते, लोक आक्रमक होतात, एकमेकांशी भांडतात व झोप न येणे, माणसाचा रक्तदाब वाढतो, हृदय रोगाला निमंत्रण मिळते व कानाचा पडदा फाटतो यासारखे अनेक आजार होतात.
ध्वनी प्रदूषण थांबवण्यासाठी सरकारमार्फत अनेक नियम व प्रणाली आकारल्या जात आहेत. त्या पुढील प्रमाणे –
1. वाहनांची वाढती संख्या आणि आधुनिकीकरण स्टेट शो यावर नियंत्रण म्हणून जानेवारी 2014 ला ‘आयएसटी’ नियम बनवला होता. ज्यात जास्त आवाज करण्यास आणि ध्वनी प्रदूषण निर्माण करणाऱ्यास गुन्हा दाखल केला जाईल. तेच काय तर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हॉर्न वाजवण्याची संख्या वाढेल. तसेच आधुनिकीकरणांमुळे कारखान्यांचे यंत्रांचे आवाज खूप वाढतील. वेगवेगळ्या प्रकारचे स्टेज सुरू केल्यावर स्पीकर चा आवाज खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येईल. या सगळ्यावर नियंत्रण म्हणून ‘आय एस टी’ या नियमाच्या खाली जे लोक जास्त आवाजाची निर्मिती करतात अशांवर तातडीने गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
2. त्याचप्रमाणे स्पीकर हे 10- 11pm नंतर बंद करणे गरजेचे असते, म्हणजेच वेगवेगळे सण उत्सव भारतात साजरे केले जातात, मोठ्या प्रमाणावर गाणी लावली जातात, लाऊड स्पीकर आणले जातात तेव्हा त्या लाऊड स्पीकरवर अकरा वाजल्यानंतर निर्बंध घातले जातात. जर एखाद्या इमारतीमध्ये किंवा त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात अकरा वाजल्यानंतर लाऊड स्पीकरवर मोठ्यांना गाणी लावलेली आढळली आणि जर कोणी त्यांच्या विरोधात तक्रार केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
3. दिवाळीत ख्रिसमसला किंवा नवीन वर्षाला जे फटाके वाजवतात, त्या फटाक्यांवर देखील बंधन घालण्यात आलेले आहे. ते फटाके रात्री बारानंतर वाजवायचे नाहीत अशी सक्त मनाई केलेली आहे आणि पोलिसांचे यावर लक्ष असते.
तसेच वाहनांसाठी हॉर्न प्रतिबंधाचा देखील नियम बनवला गेला आहे. जास्त वेळा हॉर्न वाजवणाऱ्या व्यक्ती वरती देखील गुन्हा दाखल केलेला आहे. अशा रीतीने ध्वनी प्रदूषणाचा खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणावर फरक पडतो. तो थांबवण्यासाठी, त्यावर आळा घालण्यासाठी आपण स्वतः देखील आवाज न करता शांत राहून त्याच्यावर मात करू शकतो.