झाडे बोलू लागली तर

Featured Image - zade bolu lagli tar essay in marathi

झाडे बोलू लागली तर निबंध

आमच्या शाळेतली सगळ्यांची आज सहल गेली होती, कर्जतच्या एका फार्म हाऊसला! ऑक्टोबर महिन्याचा असहाय्य उन्हाळा आणि आम्ही सगळेजण सकाळी-सकाळी सहलीसाठी निघालो. वाटेत बस बंद पडली! म्हणून अर्धा-पाऊण तास आम्हाला थांबावं लागलं. त्या तळपत्या उन्हात आम्ही सगळे जवळ-जवळ भाजूनच निघालो! आम्ही ठरलेल्या फार्महाउस वर पोहोचेपर्यंत आमची सगळ्यांची अंगातली शक्ती निघून गेली होती. आम्ही सगळे इतके दमलो होतो की शांतपणे जाऊन झोपावसं वाटत होते, पण आम्ही आलो होतो सहलीला, मग असं करून चालणार नाही. जशी बस थांबली तसे आम्ही सगळेजण बस मधून उतरलो आणि मिळेल तशा सावलीच्या ठिकाणी जाऊन बसलो.

 मी धावत धावत एका झाडाच्या सावलीत येऊन बसलो. इतका शांत वाटलं, जितका थंडावा आपल्याला बाकीच्या सावली मध्ये जाणवत नाही तितका थंडावा झाडाच्या सावलीत मात्र लगेच जाणवला. मला लक्षात आलं की झाडे आपल्याला किती सुख देतात! झाडांमुळे माणूस जिवंत आहे. झाड आपल्याला पाणी, फळे, फुले व ऑक्सिजन या सगळ्या गोष्टी देतात. आपण मात्र त्याला काहीच देत नाही. आपण झाड लावतो आणि असे समजतो की आपली जबाबदारी आता संपली. झाड लावल्यानंतर त्याची काळजी घेणं, त्याचं खत बदलणं, त्याला वेळोवेळी पाणी मिळते की नाही? याची काळजी घेणं, हे खरंच आपण करतो का हो?

 मग मला लक्षात आले! या सगळ्या गोष्टी जर झाडांना बोलता आल्या असत्या तर ते माणसांना किती ओरडले असते. जर खरंच झाडांना बोलता आले असते तर त्यांच विश्व किती वेगळे आहे हे आपल्याला समजले असते, किती वेगळ्या विश्वात झाड आपल्याला घेऊन गेले असते. हा सगळा विचार करता करताच मला एक गोष्ट आठवली, ते म्हणजे ‘मी रोज सकाळी आमच्या आईने लावलेल्या झाडांना अगदी मनापासून पाणी घालतो’. जेव्हा पाणी घालतो तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारतो, “काय रे बाळा कसं वाटतेय आज? पाणी बरोबर मिळाले ना? का अजून घालू? माती चांगली ये ना?” त्याला जर एखादी फुल आलं असेल तर प्रेमाने त्याला हात लावून गोंजारतो. मुळातच मला झाड फारच आवडतात!, त्यामुळे मी त्यांची अगदी मनापासून काळजी घेतो. पण असं सगळेच जण करतात का? हा असा प्रश्न मला पडला.

असं वाटलं की खरंच जर झाडं बोलायला लागली तर ती काय बरं बोलतील? आपण जसं झाडापाशी येऊन मन मोकळं करतो, तसेच झाडे पण माझ्याजवळ मन मोकळे करतील का? त्यांचं सुख-दुःख आपल्याला सांगतील का? आणि सगळ्यात महत्त्वाचे जसे एखादे बाळ सगळ्यात पहिल्यांदा बोलायला शिकते तशीच ही झाडे पण शिकतील का? आपण कसं लहानपणी हळूहळू बाराखडी शिकतो, ‘अबकड पासून ज्ञ पर्यंत’ तसेच एक-एक शब्द शिकतो. मग सगळ्यात शेवटी जोडाक्षर बोलायला शिकतो. तशी जर झाडांनी त्यांची स्वतःची एक नवीन भाषा बनवली तर? किती मजा येईल ना! त्यांची एक भाषा, त्यांची एक लिपी तयार होईल व त्यांचा एक समूह तयार होईल, त्यांच्या विचारांचे त्यांच्या सुखदुःखांचे आदान-प्रदान व्हायला सुरुवात होईल.

एखादी गृहिणी एखाद्या झाडाला अगदी आपल्या मुलासारखी जपते. झाड आपल्याला त्याची गोष्ट सांगेल. तिने कसं मला लहानाचे मोठे केले, हे प्रसंग अगदी रंगवून रंगवून सांगतील. जसं माणूस सांगतो अगदी तसंच! किंवा झाडांवर अनेक पक्षी रोज बसतात. प्रत्येक पक्ष्याची एक वेगळी गोष्ट असते. ती गोष्ट आपल्याला कळू शकेल. मुळात झाड आपल्याशी संवाद करू लागले तर अनेक गोष्टींचे उलगडे सुद्धा होतील. म्हणजे काय तर आपण माणूस म्हणून निसर्ग चक्राला अगदी लांबून बघतो. झाडे हे सतत निसर्गाशी निगडित असतात, निरीक्षण करत असतात. निसर्गात झालेल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या बदलाचे ते एक महत्त्वाचे घटक असतात. पक्ष्यांचेच घ्यायचं झालं तर प्रत्येक पक्षी हा त्या झाडावर येऊन एक निवांत वेळ त्यावर घालवतो. प्रत्येक पक्षाचे एक झाड एक घर ठरलेले असते. एखादे झाड ठरवताना पक्षी हा विचार करतात की त्या झाडावरती त्याचे घरटं नीट राहील ना? जर त्या घरट्यात त्यांनी पिल्लाला जन्म दिला तर ते त्या पिल्लांसाठी सुरक्षित राहील की नाही? म्हणजेच काय तर, ते झाड त्या पक्षांच्या सुरक्षिततेचे माध्यम ठरते. झाडे आपल्याला त्यांच्या फुलांबद्दलच्या, त्यांच्या फळांबद्दलच्या सगळ्या गंमती जंमती सांगतील. प्रत्येक फुल एक वेगळा रंग, एक वेगळं रूप घेऊन जन्माला येते. तसेच प्रत्येक फळ देखील एक वेगळा आकार घेऊन जन्माला येते. अशा किती वेगवेगळ्या आकारांची फळे रोज झाडाला लागत असतात आणि फुलांचे रंग पाहून माणसाच्या चेहऱ्यावर आनंद दिसल्याशिवाय राहत नाही. झाड बोलू लागले तर एवढ्याशा कोंबापासून त्याच्या अगदी वृक्षापर्यंतचा सगळा प्रवास आपल्याला सांगेल.

 ते किती वेगवेगळ्या निसर्गचक्रातील वादळांना ते सामोरे गेले आणि घट्ट कणखरपणे उभे राहिले. त्याचा कणखरपणा थोडा देखील माणसात आला तर माणूस त्यांच्या आयुष्यात खूप पुढे जाऊ शकेल! अशा या सगळ्या गोष्टी माझ्या मनात येऊन गेल्या. मग बाईंनी बोलावले आणि मला जावे लागले. पण खरंच माझ्या कल्पनाशक्तीतून आलेली ही कल्पना जर खरी ठरली तर खरंच किती मजा येईल ना!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *