आपल्या पृथ्वीवर एक निसर्गचक्र रोज चालू असते. त्यामध्ये दिवस हा बारा तासाचा असतो आणि रात्रही बारा तासाची, असा एकूण 24 तासाचा मिळून एक दिवस बनतो. ‘जर सूर्य मावळला नाही तर’ अशी कल्पना जरी केली, तरी ती निसर्गचक्राच्या विरुद्ध जाणारी आहे.
जर सूर्य मावळला नाही तर, मी मस्तपैकी गिर्यारोहणला जाईल, गडकिल्ले फिरेल, मनसोक्त फिरायला मिळेल, कारण रात्रच होणार नाही. त्यामुळे कुठे जायला परवानगी नाही, असे राहणार नाही! त्यामुळे मी खूप छान पद्धतीत गडकिल्ल्यांची सफर करेल.
जर सूर्य मावळला नाही तर मी मस्तपैकी हिमाचलला बाईक राईड करून घेईन. रात्र होण्याचे टेन्शन किंवा रात्रीत रस्त्यांवर गाडी कशी चालवायची हे कसलेच टेन्शन राहणार नाही. कारण हिमाचल हे तसे डोंगरदर्यांचे ठिकाण आहे. त्यामुळे तिथे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पण जर रात्रच होणार नसेल आणि सूर्यच मावळणार नसेल तर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे खूप सोपे होईल आणि कोणत्याही गोष्टी आपल्याला कॅरी कराव्या लागणार नाही. म्हणूनच माझे संपूर्ण हिमालय बाईकने जाण्याचे स्वप्न देखील पूर्ण होईल. रस्ते सुद्धा उजेडात फार व्यवस्थित दिसतील त्यामुळे रस्त्यांचे देखील टेन्शन राहणार नाही.
जर सूर्य मावळला नाही तर सौर ऊर्जेचा देखील पुरेपूर वापर होईल. बऱ्यापैकी बाकी इंधने यांचा वापर वाचेल आणि सगळी वाहने सोलरची बनवता येतील. त्यामुळे पेट्रोलचा वापर कमी होईल. बाकी इंधनांचा वापर कमी झाल्याने नैसर्गिक झीज कमी होईल. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून आपण काही गोष्टींना वाचवू शकू. सोलारमुळे गाड्या सतत चालू राहतील, त्या गाड्यांमध्ये सोलार एनर्जी जतन करून ठेवता येईल. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विजेची बचत होईल. जर अंधारच पडला नाही, तर आपण लाईट लावणार नाही. जितकी वीज आपण रात्री वापरतो तितकी लागणार नाही. सूर्य जर मावळला नाही तर आपल्याला दिवे लावायची गरजच पडणार नाही.
जर सूर्य मावळला नाही, तर पक्षी छान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दिवसभरात कधीही जातील. त्यांना रात्रीची विश्रांती घेऊन परत पुढच्या प्रवासाला जावे लागते तर पक्षांना सुद्धा ते सोयीस्कर ठरेल.
प्राण्यांना देखील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला दिवसभरात कधीही जाता येईल. रात्रीच्या वेळी प्राण्यांना देखील कुठेतरी निवासस्थानी थांबावे लागते, त्यांचा प्रवास थांबवावा लागतो. परंतु जर सूर्य मावळला नाही तर प्राणी देखील एका ठिकणावरून दुसऱ्या ठिकाणी कोणत्याही वेळी जाऊ शकतात.
सूर्य मावळला नाही तर होणारे फायदे आपण बघितले, पण जर तुलना करायची झाली तर सूर्य मावळला नाही तर फायद्यांपेक्षा तोटे आपल्याला जास्त होतील!
जर सूर्य मावळला नाही तर ऋतुचक्रामध्ये मध्ये प्रचंड फरक होईल, पिके जळून जातील, शेतीला आणि एकूणच वनस्पतीला थोड्याशा उन्हाची गरज असते परंतु ते जर खूप प्रमाणात मिळायला लागले तर त्याचा चांगला परिणाम होण्याऐवजी त्याचा वाईट परिणाम होतो! म्हणजे शेती अतिउन्हामुळे जळून जाण्याची शक्यता असते.
तसेच ऋतुचक्रामध्ये देखील खूप मोठा बदल होईल ऊन, वारा, पाऊस या सगळ्या गोष्टी नियमित राहणार नाही. सतत बाष्पीभवन चालू राहिल. थंड हवा आणि रात्र हे सुरळीत चालू नसल्याने निसर्ग चक्रावर खूप मोठा फरक पडेल.
सूर्य मावळला नाही तर कोणताच प्राणी पक्षी आणि मानव देखील झोपू शकणार नाही, त्यामुळे तो सतत काम करत राहिला तर आजारी पडेल. पक्षांचे देखील हेच आहे, जरी पक्षांना दिवसभरात सूर्य मावळला नाही तर ठिकठीकाणी फिरता जरी येत असले तरी सुद्धा जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा पक्षी विश्रांती घेतात, ते एका ठिकाणी जागा शोधून रात्री शांततेत झोपी जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या उमेदीने आकाशात भरारी घ्यायला तयार असतात.
जर सूर्य मावळला नाही तर अनेक आजार पसरतील आणि लोकांना आराम न मिळाल्याने वेगवेगळे आजार वाढायला सुरुवात होईल. झोप न येणे, डोके दुखणे, डोळे दुखणे, आम्लपित्ताचा त्रास वाढणे या सगळ्या समस्या भेडसावतील.
तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रात्री खूप शांतता असते. दिवसभराचा थकवा रात्री शांत होतो. त्यामुळे मानसिक शांतता देखील रात्रीच मिळते. त्यामुळे सूर्य जर मावळला नाही तरी यातील कोणत्याच गोष्टी होणार नाहीत. कारण लोक सतत कार्यरत राहतील आणि शांतता भंग होईल. वाहतुकीचे आवाज हे सतत चालूच राहतील.
त्यामुळेच सूर्य मावळण खूप गरजेचे आहे.
तसेच आपण नेहमी नवीन दिवसाची सुरुवात सकाळी करतो, जर सूर्य मावळला नाहीस तर दुसरा छान नवा दिवस कसा तयार होईल?
सूर्य मावळला नाही तर आळशीपणा वाढेल, लोक दमून जातील आणि काहीच करण्याचा उत्साह लोकांमध्ये राहणार नाही.
सूर्य मावळला नाही तर सूर्यकिरणांनी उन्हात फिरण्याचा त्रास होईल तसेच सूर्याची किरणे सतत अंगावर पडल्यास आपल्याला विविध आजार होण्याची देखील शक्यता असते. ऑफिस, शाळा, कॉलेजेस, रुग्णालय सगळ्यांमध्येच कोणतेच कामकाज नीट चालणार नाही. मुळातच आपले दैनंदिन जीवन प्रचंड विस्कळीत होईल आणि म्हणूनच निसर्गचक्र इतके स्वच्छ सुरळीत चाललेले असताना, जर सूर्य मावळला नाही तर अशी कल्पनाच करवत नाही. देवाने आपल्या निसर्ग खूप चांगला बनवला आहे.