पाऊस पडला नाही तर

Featured Image-paus padla nahi tar marathi nibandh

पाऊस पडला नाही तर निबंध

पर्यावरणातील ‘पाऊस’ हा खूप महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. तर पाऊस कसा पडतो?

आपल्याला अगदी पाचवी – सहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकात पाऊस कसा पडतो? हे शिकवले जाते. सगळ्यात पहिले समुद्राची वाफ म्हणजेच त्याचं ‘बाष्पीभवन’ होऊन, त्याचे ढगात रूपांतर होते. मग थंड वारे वाहू लागतात. ढग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर प्रवास करतात. आणि त्यानंतर वातावरणाचा दाब वाढतो, मग ढगाचे रूपांतर पावसामध्ये होते. हे ऋतुचक्र वर्षानुवर्ष तसेच चालू आहे.

पाऊस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. पावसाने शेती तयार होते. पावसाआधी शेतकरी बियाणे लावून घेतो. म्हणजे त्याचे पेरणीचे काम पूर्ण झालेले असते आणि तो मेघराजाची वाट अगदी आतुरतेने बघत असतो. कारण एप्रिल – मे महिन्यात अत्यंत कडक उन्हाळ्यात खूप कष्ट करून शेतकऱ्याने पेरणी केलेली असते.

जर वेळेवर पाऊस आला नाही तर त्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. कारण पावसाच्या पाण्यानेच शेतीचे काम चालते. त्यानंतर झाडे – झुडपे यांना देखील पावसाचा आधार असतो. जी झाडे माणसे स्वतः जाऊन लावतात, त्या झाडांना रोज पाणी घातले जाते. मात्र जी झाडे डोंगरावर, नदीकिनारी असतात किंवा दऱ्यांमध्ये देखील अनेक झाडे उगवतात, अशा झाडांना पावसाचे पाणी हा एकमेव आधार असतो. वर्षभरात तीन – चार महिने जो पाऊस पडतो, तो ही झाडे वर्षभर पुरवतात. त्यामुळे झाडाझुडपांसाठी देखील पावसाचे पाणी खूप महत्त्वाचे असते.

तसेच पहिल्या पावसाची मजा काही वेगळीच असते. पहिला पाऊस पडला की, वातावरण खूप छान होते. मातीचा वास संपूर्ण परिसरात पसरतो. त्यामुळे खूप उन्हानंतर पडणारा, पहिला पाऊस हा अत्यंत आनंददायी असतो!

पावसाच्या पाण्यावरती पक्षी आणि प्राणी हे सगळे अवलंबून असतात. प्राण्यांना जंगलात आणि इतर ठिकाणी पाणी मिळण्यासाठी पाऊस हा एकमेव स्त्रोत आहे. त्या प्राण्यांसाठी पहिला पाऊस आणि एकूणच पावसाळ्यातले चारही महिने खूप महत्त्वाचे असतात. कारण त्यात ते प्राणी पाण्याचा साठा करून ठेवतात. पक्षांना देखील पहिला पाऊस पडल्यावर खूप आनंद होतो. पक्षांना तर पावसाची चाहूल सगळ्यात आधी लागते. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. तसेच पाऊस पडणार असेल तर ते अशा ठिकाणी आसरा घेतात, जिकडे ते खूप जास्त प्रमाणात भिजणार नाहीत आणि त्यांचे संरक्षण होईल. त्यामुळे पक्षांना देखील पावसाचा खूप आनंद होतो.

जर पाऊस पडला नाही, तर धरणे भरणार नाहीत, तलाव भरणार नाहीत, नद्यांना देखील पाणी नसेल. त्यामुळे पाण्याचा साठा करणे गरजे आहे, कारण पावसाचे चारच महिने असतात. ज्यामुळे पृथ्वीवर पाण्याचा साठा केला जाऊ शकतो. नंतर पावसाळा संपलला की, आपण केलेल्या साठ्यातूनच पाण्याचा वर्षभर वापर करत असतो. त्यामुळे जर पाऊसच पडला नाही, तर सगळीकडे कसे कोरडे आणि ओसाड माळरान होईल आणि सगळीकडे भकासपणा जाणवेल.

पाऊस मुळात झाडांना, रोपांना तारुण नेतो. पाऊस पडला नाही, तर ताज्या टवटवीत रोपांचे रूपांतर झाडांमध्ये होणार नाही. सगळी शेती सुकून जाईल. तसेच नदीतले आणि समुद्रातील मासे मरतील कारण त्यांना पाणीच मिळणार नाही. नदी – तलाव सगळे सुकून जातील. पृथ्वीवर पाणी जरी ७०% असले, तरी देखील ते समुद्राचे आहे, ते पाणी पिण्यासाठी किंवा शेतीच्या पिकांसाठी आपण वापरू शकत नाही. त्यामुळे जे काही पावसाचे पाणी आहे, तेवढेच पाणी आपण सगळ्या गोष्टींसाठी वापरू शकतो.

पाऊस नसला तर कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला खायला अन्न मिळणार नाही, प्यायला पाणी मिळणार नाही. संपूर्ण अन्नसाखळी नष्ट होईल. मरणाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि रोगराई निर्माण होईल. पाण्यासाठी अनेक देशांमध्ये युद्ध निर्माण होतील, अनेक नवनवीन आजार होतील. तसेच जर पाणीच वापरायला नसेल तर साफसफाई होणार नाही, त्यामुळे सर्व परिसरामध्ये रोगराई मोठ्या प्रमाणावर वाढेल, आणि माणसांचे तसेच प्राण्यांचे जीव जातील. मुळातच पर्यावरण हे खूप छान आहे. त्यामुळे पाऊसच पडला नाही, तर अशी कल्पनाच करवत नाही. कारण, जर तसे झाले तर निसर्गाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *