मी चित्रकार झालो तर मराठी निबंध
जर मी चित्रकार झालो असतो तर खूप आनंद झाला असता. जगातील कोणतेही चित्र मी कागदावर रेखाटू शकलो असतो आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरशी एक अन एक रेषा मी काढू शकलो असतो. माझ्या चित्रांनी लोकांच्या आयुष्यात रंग भरू शकलो असतो, त्यांना आनंद देऊ शकलो असतो. मुळात मला निसर्ग फार आवडतो त्यामुळे निसर्गातील प्रत्येक गोष्ट कागदावर रेखाटू शकलो असतो आणि तो आनंद दुसऱ्या कशातच नाही. सूर्याचे रोजचे रंग खूप वेगळे असतात. आपल्याला सूर्य रोज वेगवेगळ्या रंगांनी प्रेरणा देत असतो. आपण त्यांना बघून खूप आनंदी होतो. कधीतरी पिवळा, कधी नारंगी कधी गर्द तांबडा तर कधी लाल भडक. सूर्याच्या वेगवेगळ्या छटा पाहून मनाला खूप आनंद होतो आणि आपल्याला देखील त्यातून ऊर्जा मिळते. निसर्गात झाडांचे रंग देखील खूप वेगळे असतात, ते रोज नवीन प्रोत्साहन देऊन जातात. अगदी छोटासा कोंब आलेला असू देत किंवा कुंडीतले रोप ,ते त्यांच्या अस्तित्वाने आपल्याला प्रेरणा देत असतात.
कुंडीतले रोप गर्द हिरव्या रंगाचे असते तर जे नुकतेच कोणते फुटलेले रोपट असते ते पांढरा आणि हिरव्या रंगाचा असते. आपल्या जगण्याला एक प्रोत्साहन रोज झाडे देऊन जातात. झाडांना नुकतेच फळे-फुले यायला सुरुवात होते आणि झाडे जे सतत निसर्गाला देत असतात त्याची सुरुवात होते. त्या छोट्या कोंबातून रोपटे होते तेव्हा त्याला हळूच पालवी फुटायला लागते आणि हे सगळे मला चित्रात काढायला जर मिळाले असते, तर कोंबापासून ते मोठ्या झाडापर्यंतचा सगळा प्रवास मी कागदावर रेखाटला असता आणि या सगळ्याचं रेखाटन करताना मला खूप आनंद झाला असता. निसर्ग खूप सुंदर आहे. निसर्गाची अनेक रंगरूपे, देखण्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. निसर्गाकडून आपण रोज नवीन-नवीन गोष्टी शिकत असतो आणि या सगळ्या गोष्टी मला माझ्या पद्धतीने कागदावर रेखाटायला खूप आवडतात. थंडी, वारा, पाऊस सगळे झेलत आपला निसर्ग सतत प्रेरणा देत असतो.
डोंगर, दऱ्या, नद्या तग धरून उभे असतात. कठीण काळात कणखरपणे उभे कसे राहायचे? निसर्गच आपल्याला शिकवतो. हे सगळे मला रेखाटायला मिळाले असते.
फुले तर मला खूप आवडतात. फुलांचे अनेक रंग रोज बदलत असतात. निसर्गाला आणि त्याच्या चित्रांना पाहून आपल्याला खूप आनंद होतो आणि फुलांचे अनेक रंग सुद्धा त्यात भर घालतात. पक्ष्यांचेही अनेक रंग रेखाटताना खूप मजा येते. नुसत्या कबुतरांचे उदाहरण घेतले तरी करडा रंग, त्यांच्या डोळ्याचा मोरपिशी रंग छान दिसतात, त्यांच्या पंखांना कधीतरी पांढरी छटा असते तर कधीतरी करडा रंग असतो. या सगळ्या गोष्टींमध्ये रंग भरताना एक जादुई रूप प्राप्त होते. ती निर्जीव गोष्ट हळूहळू रंग भरल्यावर सजीव वाटायला लागते.
मुळात चित्रांची तर हीच जादू असते, चित्रकार कोणत्याही गोष्टीला एक रंग रूप देऊन निर्जीव वस्तू सजीव करू शकतो. तसेच शब्दशः चित्र निर्जीवच असते, परंतु त्याला सुंदर रेखाटून त्याला सजीव रूप देण्याची ताकद ही फक्त चित्रकारातच असते! ती एक जादू असते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठलीही चित्रे काढता येतात.
प्रत्येक माणसाचे वैशिष्ट्य हे खूप वेगळे असते आणि प्रत्येकाचे डोळे, त्यांचे केस, लकबी ह्या खूप गोष्टी सांगून जातात. या सगळ्या गोष्टी मला कागदावर काढायला खरंच खूप मजा येते.
माणसांची अनेक रूपे असतात, तसेच अनेक भावना देखील असतात. कधी माणूस खूप दुःखी असतो, तर कधी खूप सुखी असतो. क्रोध, दुःख,आनंद, भय असे अद्भुत नवरस देखील मला काढता येतील. प्रत्येकाच्या रूपरेषा आणि हावभाव हे माणसाच्या आयुष्यात चालणाऱ्या एक चक्राचे स्वरूप आहे, त्या भावना खूप काही सांगून जातात. ती भावना रेखाटून मी जणू काही एक गोष्टच रंगवत आहे. चित्रे या फक्त कल्पना नसून या वेगवेगळ्या गोष्टी असतात.
चित्रकार कायम त्याच्या चित्रातून कोणती तरी गोष्ट देण्याचा प्रयत्न करत असतो! त्या गोष्टीतून माणसाला शिकायला मिळते.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवीदेवता आणि मंदिरांनाही खूप महत्त्व आहे. जर मी चित्रकार झाले तर प्रत्येक देवाची एक सुंदर मूर्ती मला साकारता येईल. एखाद्या देवीचे कधीही न पाहिलेले रूप मला रेखाटायला खूप आवडेल. तसेच मंदिरे सकाळच्या वेळी खूप वेगळी दिसतात, तर संध्याकाळी नारंगी रंगाच्या प्रकाशात मंदिरांचे रूप हे खूप वेगळे असते. रात्री दिवे लावल्यावर ती तर डोळे दिपवून टाकणारे रूप असते. हे सर्व मलाच कागदावर रेखाटायचे आहेत कारण माणसे इतिहास तेव्हाच लक्षात ठेवतील जेव्हा त्या इतिहासाचे काही ना काहीतरी पुरावे आपण मागे ठेवून जाऊ! चित्रकाराला चित्र काढणे आणि त्यातून गोष्टी सांगणे हे जणू इतिहास घडवण्यासारखेच आहे. कारण आज तो जे चित्र काढतो, ज्या गोष्टी सांगतो त्या उद्या इतिहास रुपात जमा होतात!
त्यामुळे एका चित्रकाराचे यश हे तेव्हाच असते जेव्हा त्याची सगळी चित्रे लोकांपर्यंत नीट पोहोचतात. एखादे अवघड चित्र काढल्यावर ते लोकांना समजतच नाही आणि मग नक्की या चित्रातून काय सांगायचे आहे किंवा एखादा अवघड पेंटिंग जर असेल तर त्यातून नक्की चित्रकाराला काय सांगायचे हे कळले नाही तर त्या चित्राला काहीच महत्त्व प्राप्त राहत नाही.
म्हणूनच जर मी चित्रकार झालो तर मला या सगळ्या गोष्टी करायला आवडतील. मला ‘राजा रविवर्मा’ यांच्यासारखे एक गाजलेले चित्रकार व्हायला नक्कीच आवडेल! राजा रविवर्मा यांची सगळी देवाची चित्रे आजही आपण आपल्या भिंतीवर लावतो आणि भारत मातेचे चित्र तर आपल्याला शाळेपासून ते मरेपर्यंत प्रत्येक ठिकाणी भिंतीवर लावलेला असते. तशीच अजरामर चित्रसंपदा मला पण निर्माण करायला आवडेल.