परीक्षा नसत्या तर निबंध

परीक्षा नसत्या तर निबंध

भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये पूर्वीची गुरुकुल पद्धत सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. जगभरात ज्या ज्या गुरुकुल पद्धतीच्या शाळा उघडतात त्या भारतीय शिक्षण पद्धती वरूनच प्रेरणा घेऊन निर्माण केलेल्या आहेत! ज्या देशात आपण राहतो त्या देशाचा सांस्कृतिक आणि एकूणच विद्येचा अभ्यास करण्याचा इतिहास खूप मोठा आहे! गुरुकुल पद्धतीने नंतर ‘नालंदा विद्यापीठ’ वगैरे आले. जगातील नामवंत विद्यापीठातील एक म्हणून ‘नालंदा विद्यापीठाला’ ओळखले जाते. एकूणच शाळांचा इतिहास बघता भारतीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरा फार मोठी असल्याकारणाने भारतीय शिक्षणाला जगात एक वेगळा दर्जा प्राप्त झालेला आहे .

शिक्षणातील एक भाग म्हणजे ‘परीक्षा!’ त्याची खरच खूप भीती वाटते. ती नसेलच तर काय होईल? असेही विचार मनात येऊन जातात. ‘जर आयुष्यात कधीच परीक्षा नसेल तर खूप छान होईल’ असे मला लहानपणी वाटायचे पण आज असे वाटते की जर परीक्षा नसेल तर आपण नक्की कशात चांगले आहोत हेच आपल्याला कळणार नाही.

म्हणूनच परीक्षा घेतली जाणे खूप गरजेचे आहे. जर परीक्षाच नसतील तर नक्की आपण कोणत्या गोष्टीत चांगले आहोत हे कळणारच नाही. परीक्षा नसली तर आपण पुढील इयत्तेमध्ये जाणार नाही! परीक्षा नसली तर आपण नक्की कोणत्या विषयात उत्तीर्ण झाल्यावर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे हे कळणारच नाही. जसे की जर आपण संगीतात चांगले असू तर पुढे जाऊन आपण संगीत या विद्येचे शिक्षण घेऊ आणि त्या घेतलेल्या शिक्षणाचा वापर आपण आपल्या व्यवसायिक जीवनात देखील करू. म्हणजेच मी संगीतकार म्हणून आयुष्यभर काम करायचे की नाही? हे ते शिकल्याशिवाय आणि त्याची परीक्षा दिल्याशिवाय मला कळणार नाही. कारण जर मी नुसतीच शिकत राहिले आणि परीक्षा नसेल तर मी योग्य शिकते की अयोग्य याचा काही थांगपत्ताच मला लागणार नाही. त्यामुळे परीक्षा हे त्याचे सगळ्यात महत्त्वाचे माध्यम असते जिथे आपले कर्तृत्व आपण सिद्ध करत असतो. वेळोवेळी परीक्षा देऊन आपण नक्की किती पाण्यात आहोत? हे देखील समजते. त्यावर सुधारणा करून आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो.

वर्गामध्ये आपल्याला अनेक विषय शिकवले जातात, जसे की संगीत, नृत्य, गणित, सामाजिक अभ्यास आणि अजून बरेच काही. या सगळ्या गोष्टी शिकताना आपण एका वेळेलाच अनेक गोष्टींमध्ये पारंगत होतो. जर एखादा मोठा बँकेत काम करणारा कर्मचारी असेल तर तो फक्त बँकेचा अभ्यास करत नाही, बाकीच्या गोष्टींचाही अभ्यास त्याला थोड्याफार प्रमाणात करावाच लागतो. कारण आपण ज्या बँकेत काम करतो ती बँक नक्की कोणत्या देशासाठी काम करते. त्या देशाची राजकीय, आर्थिक व्यवस्था नेमकी काय आहे? हे कळणे आवश्यक असते.

माणूस हा एक ‘सामाजिक प्राणी’ आहे, त्याला जर समाजात राहायचे असेल तर एका वेळेला अनेक विषय शिकणे फार गरजेचे असते. कोणताही एक विषय शिकून माणूस आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. समाज हा एकमेकांशी अत्यंत निगडित असा आहे. जर आपण एखाद्या क्षेत्रात काम करत असू, तर दुसऱ्या क्षेत्रात जर काही बिघडले तर त्याचा फायदा आपल्या क्षेत्राला नक्कीच होतो. म्हणूनच या समाजाचा घटक म्हणून आपल्याला अनेक विषय एकाच वेळेला माहिती असणे गरजेचे असते. यालाच आपण इंग्रजी भाषेत ‘जनरल नॉलेज’ असे म्हणतो. जरी आपण एखाद्या विषयाचे तज्ञ असलो तरी सुद्धा जर आपल्याला जनरल नॉलेज नसेल तर आपण आपल्या क्षेत्रात देखील पुढे जाणार नाही. त्यासाठी परीक्षा या सगळ्यात महत्त्वाच्या असतात, कारण एकाच वेळेला त्या परीक्षा आपल्याला अनेक गोष्टींमध्ये पारंगत बनवत असतात.

परीक्षेचे अनेक फायदे आहेत. आपण परीक्षेसाठी सगळ्या विषयांचा अभ्यास करतो. मुळातच किती विषय आहेत? प्रत्येक विषयात काय दिलेले आहे? हे नीट तपासतो. परीक्षेमुळे नक्की आपण कोणत्या विषयात चांगले आहोत आणि कुठे कमी पडतो हे कळते. तसेच परीक्षा ही आपली एकट्याची नसते. परीक्षा ही सर्व मुलांची असते, त्या सगळ्या मुलांमध्ये आपल्याला पुढे जायचे आहे. म्हणजेच स्पर्धेत आपण कसे प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण व्हायचे? याचे तंत्र आपल्याला परीक्षेमुळेच कळते.

परीक्षेमुळे आपण आपल्या उज्वल भविष्याकडे पाऊल टाकत असतो. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा असा की परीक्षेमुळे आपले जीवन सुधारायला आणि व्यक्तिमत्व विकासाला देखील मदत होते. म्हणूनच परीक्षा या असल्याच पाहिजेत! जर परीक्षा नसतील तर आपण खूप आळशी होऊ. आपण कधीच कोणत्याही विषयाचा खोलवर अभ्यास करणार नाही, जर आपण अभ्यासच करणार नाही तर आपला पाया पक्का होणार नाही आणि आपण आयुष्यात पुढे जाणार नाही. आपले भविष्य अंधारात राहील. आपण कधीच स्पर्धेला उभे राहू शकणार नाही. परीक्षा न देता आपण पुढे आलेलो असतो, त्यामुळे त्या परीक्षेला कसे तोंड द्यायचे? याचा आत्मविश्वास देखील आपल्यात कधीच असणार नाही. आपण परीक्षा नसेल तर वर्तमानपत्र आणि इतर कोणत्याही गोष्टींचा वापर करणार नाही. अजिबातच पुस्तके वगैरे वाचणार नाही आणि त्यामुळे शाळेत शिकण्याचा, महाविद्यालयात जाण्याचा काहीच फायदा आपल्याला होणार नाही. या सगळ्या प्राण्यांमध्ये माणूस हा एक हुशार प्राणी आहे! जर त्याने त्याच्या बुद्धीचा वापर केला नाही, तर त्या बुद्धीला गंज चढायला काही वेळ लागत नाही. परीक्षा नसेल तर आपले ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ अशीच अवस्था होईल. जर आपल्याला अशी अवस्था स्वतःची करून घ्यायची नसेल तर परीक्षा या आयुष्यात असल्याच पाहिजेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *