आज बाईंनी वर्गात पर्यावरणाच्या तासाला तुम्हाला आयुष्यात काय बनायचे, याचा निबंध लिहा असे सांगितले. निबंध झाल्यावरती हे पुढे येऊन सगळ्यांना सांगा, असे देखील सांगितले. कोणाचाच हात वर होत नव्हता. पण माझा निबंध लिहून पूर्ण झाला होता. मग मी क्षणाचाही विलंब न होऊ देता पटकन हात वर केला आणि पुढे जाऊन बोलायला सुरुवात केली. बाईंनी विचारले, “कशावर लिहिल आहे?, सांग बरं सगळ्यांना”.
मी सगळ्यांना सांगायला लागलो की, “मला पुढे आयुष्यात ‘डॉक्टर’ व्हायच आहे. मी एक आयुर्वेदिक डॉक्टर होणार”. तेव्हा बाईंनी विचारले, “तुला खरच डॉक्टर व्हायचे आहे का? बघ हं! तुला खूप वेळ हॉस्पिटल मध्येच राहावे लागेल. सगळ्या रुग्णांना बघायला लागेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुला कधीच दमून चालणार नाही. याला तू तयार असशील तरच डॉक्टर हो”.
बाई असे बोलल्यावर वर्गातले सगळे विद्यार्थी हसायला लागले. पण मी ठरवल होत, आपल्या मतावर ठाम राहायचे. मी बोलायला सुरुवात केली. “हो! बाई मला डॉक्टरच व्हायच आहे. काही झाल तरी”. मग बाईंनी सगळ्यांना शांत केल आणि मला निबंध वाचायची परवानगी दिली.
मला डॉक्टर व्हायचंय. कारण मला रुग्णांची सेवा करायची आहे. मला सामाजिक संस्थांमध्ये (एनजीओ) मोफत तपासणी करायची आहे. त्याचप्रमाणे लोकांच्या गरजेच्या वेळी त्यांच्या मदतीला धावून जायचे आहे. डॉक्टर म्हणून रुग्णांना तपासण हे जरी माझे कर्तव्यच असले, तरी देखील बरेचसे डॉक्टर ते कर्तव्य मोफत करत नाहीत. परंतु मला मात्र रुग्णांची सेवा काहीही पैसे न घेता करायची आहे. त्यांना मदत म्हणून त्यांच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी मला घ्यायची आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की, आतापर्यंत भारतात आणि जगात असे काही आजार आहेत ज्यांचे निदान अजून मिळालेले नाही. अशा रोगांवर मला उपचार शोधायचे आहेत. जेणेकरून लोक त्या रोगाला घाबरणार नाहीत. त्या रोगावर मात करतील. मला खूप आनंद आहे की, माझा जन्म भारतात झाला. कारण भारतामध्ये डॉक्टरकीचा इतिहास खूप मोठा आहे.
आपल्या इतिहासात वैदिक काळापासून आपण ‘आयुर्वेद’ या शास्त्राचा वापर करून अनेक औषध बनवत आहोत याचे पुरावे मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे भारताने आयुर्वेद उपचार शास्त्र जे आजकालच्या काळात खूप महत्त्वाचे आहे, ते सर्वप्रथम संपूर्ण जगाला दिले. आज अनेक देश रासायनिक औषधांचा मार्ग न अवलंबता नैसर्गिकरित्या बरे होण्याकडे जास्त लक्ष देतात. आयुर्वेदामुळे रोग तर बरा होतोच, परंतु त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर खूप काळासाठी होतो.
पण आयुर्वेदिक उपचारांमध्ये गुण यायला जरा जास्त काळ जाऊ द्यावा लागतो. कारण ‘ऍलोपथी’ मध्ये जास्त डोस घेतल्यावर रुग्ण तात्पुरता बरा होतो. परंतु आयुर्वेदामध्ये तसे नसते. आयुर्वेदाचा परिणाम हा शरीरावर आयुष्यभरासाठी होतो. पण त्याचा गुण यायला थोडा काळ जाऊ द्यावा लागतो.
आयुर्वेदाचे असंख्य फायदे आहेत. म्हणूनच मला आयुर्वेदिक डॉक्टर बनायचे आहे.
मुळात डॉक्टर या संपूर्ण पेशालाच ‘देव’ म्हटले जाते. कारण कोणकोणत्या परिस्थितीतून रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतात. त्यावेळेला त्याला फक्त डॉक्टरच असतो, जो वाचवू शकत असतो. म्हणूनच मला लोकांची मदत करायची आहे. त्यांना त्यांच्या आजारातून मुक्त करायचे आहे.
सध्या लोक ‘होमिओपॅथी’ आणि ‘आयुर्वेदिक’ या दोन शास्त्रांचा वापर करून बरे होण्याकडे जास्त लक्ष देतात. कारण या दोन्ही गोष्टींमुळे लोक एक चांगले आरोग्य घडवू शकतात.
आजकालच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आणि धावपळीच्या जगण्यामध्ये लोकांना तंदुरुस्त राहण सगळ्यात जास्त महत्त्वाच आहे. कारण सतत धावपळ करण्यासाठी सर्वात आधी तुमचे शरीर तंदुरुस्त असण महत्त्वाचे असते.
त्यामुळेच मला आयुर्वेदिक डॉक्टर बनायचे आहे.