स्वच्छतेचे महत्व

Featured Image- Swachhateche mahatva

स्वच्छतेचे महत्व निबंध

स्वच्छता म्हणजे काय? तर जी काही घाण आपल्या आजूबाजूच्या परिसरात निर्माण होत असते ती सर्व स्वच्छ करणे म्हणजे स्वच्छता होय. प्राण्यांमुळे, माणसांमुळे, पक्ष्यांमुळे एकूणच कोणत्याही निसर्गातील घटकामुळे होणारी घाण म्हणजे अस्वच्छता होय! ती अस्वच्छता जर पर्यावरणात तशीच राहिली तर खूप घाण वास येतो, रोगराई पसरते. डासांची खूप मोठ्या प्रमाणावर संख्या वाढते तसेच पाण्याचे हवेचे आणि मातीचे प्रदूषण होते.

म्हणूनच जर रोजच्या रोज आपण आपले पर्यावरण स्वच्छ केले तर अस्वच्छता निघून जाईल आणि सगळीकडे स्वच्छता होईल. जर आपण स्वच्छता ठेवली नाही तर आपल्यालाच घरात राहणे आपल्याला खूप कठीण होईल.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण आपले घर, अंगण आणि एकूणच परिसरातील घाण स्वच्छ केली तर परिणामी आपल्या मनाला प्रसन्न वाटते. स्वच्छता ठेवली की लक्ष्मी दारात येते असे देखील म्हणतात! लहानपणी आई मला गोष्ट सांगायची की ‘सातच्या आत सगळी साफसफाई करावी म्हणजे लक्ष्मी आणि वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो!’. स्वच्छतेने आपले आरोग्य देखील खूप चांगले राहते. पण फक्त घराची स्वच्छता म्हणजे सगळीकडची स्वच्छता होते असे  नाही आणि फक्त घराची स्वच्छता करणे आणि बाकी परिसर घाण ठेवणे हे चांगल्या नागरिकाचे देखील लक्षण नाही!

जर आपण फक्त आपले घर स्वच्छ ठेवले आणि आजूबाजूचा परिसर तसाच घाण ठेवला तरी देखील आपण वेगवेगळ्या रोगांना आमंत्रण देत असतो. कारण सगळ्यात जास्त डासांचे प्रमाण आणि  रोगराईची वाढ ही अस्वच्छतेमुळेच होते.

जर तुम्ही कुठे बाहेर खायला गेलात. ती गाडी किंवा तो पदार्थ बनवणाऱ्या व्यक्ती स्वच्छता पाळत नसेल तर त्या खाण्याने आपल्याला जुलाब, उलट्या आणि पोटाचे विकार होतात. या छोट्याशा उदाहरणावरून आपण स्वच्छता ठेवणे किती महत्त्वाचे असते हे लक्षात घेऊ शकतो.

मानव हा एक नैसर्गिक प्राणी आहे. तो समाजात राहतो त्यामुळे आपल्याला घराबरोबरच घराबाहेरील परिसर देखील स्वच्छ करणे गरजेचे आहे. आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपलीच जबाबदारी आहे!

आपण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्यावर आपल्यालाच बरे वाटते. आपण त्या परिसरात राहत असतो, रोज येता-जाता आपण त्या गोष्टी बघत असतो. एखाद्या ठिकाणी जिथे खूप कचरा आहे किंवा कचराकुंडी आहे त्या परिसरात राहणे हे माणसांसाठी योग्य राहात नाही. तसेच प्राण्यांना देखील त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. झाडांना स्वच्छ ठेवणे, प्राणी स्वच्छ ठेवणे हे देखील आपलेच कर्तव्य आहे. नुसतेच ‘झाडे लावा’ या मोहिमेत सहभागी होऊन, त्या झाडांबद्दलचे कर्तव्य संपत नाही. त्याला योग्य प्रमाणात पाणी देणे, खत घालणे तसेच झाड स्वच्छ ठेवणे हे खूप महत्त्वाचे असते. झाडांवर खूप मोठ्या प्रमाणावर वाहनांमुळे धूळ बसते, त्यामुळे झाडे योग्य वेळ आली की धुवावी लागतात. त्यामुळे झाडे स्वच्छ ठेवणे हे देखील आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे.

गाई, म्हशी, मांजरी व कुत्रे या प्राण्यांना देखील स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे. हे सगळे पाळीव प्राणी आपल्या परिसरात आजूबाजूलाच राहतात. जे जंगली प्राणी आहेत, ते जंगलात असल्याकारणाने आपण त्यांची काळजी घेऊ शकत नाही. पण आपण ज्या प्राण्यांची काळजी घेऊ शकतो त्यांची जर काळजी योग्य प्रमाणात घेतली तर आपले पर्यावरणाचे संतुलन नीट बनून राहील.

शेतीची स्वच्छता करणेही तेवढेच महत्त्वाचे असते. शेतीसाठी लागणारी उपकरणे देखील स्वच्छ करावी लागतात. आजकाल शहरी भागात मोठ्या प्रमाणावर जिथे समुद्रकिनारे आहेत तिथे किनारे खूप घाण झालेले दिसतात. तिथे लोक फिरायला जातात आणि खूप मोठ्या प्रमाणावर कचरा करून ठेवतात. त्यामुळे समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे हे देखील आपलेच कर्तव्य आहे. नद्या आणि तलाव देखील खूप अस्वच्छ होतात. तिथे देखील मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. त्यामुळे नद्या आणि तलाव देखील योग्य वेळी स्वच्छ करणे खूप गरजेचे असते. शहरात आणि गावात गटारे तुंबून आजूबाजूला अस्वच्छता निर्माण होते, त्यामुळे गटारे देखील नियमित स्वच्छ करणे खूप गरजेचे असते.

माणसांनी योग्य वेळी स्वच्छता राखावी तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवावा यासाठी सरकारने अनेक योजना अवलंबल्या आहेत. यामध्ये शौचालय बांधणे, संत गाडगेबाबा अभियान यांसारखे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आकारले जातात.

शाळा कॉलेजेसमध्ये देखील दर रविवारी स्वच्छता मोहीम ठरवली जाते. शिक्षक आणि विद्यार्थी मिळून शाळा, कॉलेजची स्वच्छता मोठ्या प्रमाणावर करतात. तसेच जिथे व्यायाम शाळा आहेत, तिथे सुद्धा सगळे खेळाडू आणि शिक्षक व्यायाम शाळा स्वतःहून स्वच्छ करतात.

गायीच्या आणि म्हशीच्या गोठ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शेण आणि बाकीची घाण अस्वच्छता असते, त्यामुळे तिथे देखील मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जाते. रेल्वे स्थानक, बस स्थानक, विमानतळे येथे सुद्धा सफाई कामगार यांना मदत म्हणून आपण थोडीशी स्वच्छता करून त्यांच्या कामाला हातभार लावू शकतो. जरी स्वच्छता ही सरकारी कामगार वर्गाची जबाबदारी असली, तरी भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून स्वच्छता करणे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले देखील कर्तव्य आहे!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *