आई संपावर गेली तर

आई संपावर गेली तर निबंध

मुळात आपण या जगात जन्म घेतो तेव्हा जन्माला आल्यावर नर्स अगदी अलगदपणे ज्या विश्वासाने दोन हातांमध्ये आपल्याला देते तो हात असतो ‘आईचा’. आईच्या हातांमध्ये मायेच्या स्पर्शाने जणू सगळं जग ती तिच्या दोन हातांमध्ये सामावून घेते आणि आपल्याला उचलते अगदी अलगदपणे!

आई आपले संपूर्ण आयुष्य आपल्याला वाढवण्यात पणाला लावते. तिच्या सगळ्या गोष्टी ती बाजूला ठेवून आपण जन्माला आल्यावर आपली संपूर्ण वाढ होईपर्यंत, तिला तिचे स्वतःचे असे आयुष्य नसतेच. एकदा आई झाली की ती तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत आईच असते. तिची काळजी कधीच संपत नाही. मुले कितीही मोठी झाली, त्यांच्या पंखात पूर्णपणे बळ आले तरीसुद्धा आईची काळजी ही कधीच संपत नाही. मुळात आईसारखी काळजी घेणारी दुसरी कोणतीही व्यक्ती या जगात नसतेच.

 मला आठवतंय, एकदा आईशी मी भांडले होते आणि त्याचा राग जेवणावर काढला होता तर ती देखील मी जेवले नाही म्हणून पूर्ण दिवस उपाशी राहिली होती. मग मला जवळ घेऊन मला आनंदाने आधी घास भरवला आणि मग स्वतः जेवली. हे जगात फक्त आईच करू शकते.

फक्त माणसांचीच आई एवढी काळजी घेत नाही, तर प्राण्यांची, पक्ष्यांची आई देखील त्यांची जीवापाड काळजी घेते. त्यांना काही होऊ नये म्हणून सतत सतर्क राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बाळाला कोणी नाव ठेवू नये यासाठी ती जगातील सगळ्या गोष्टी आपल्या बाळाला शिकवायचा प्रयत्न करते! जी स्त्री आपल्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टींचा त्याग करते ती आई असते. तिच्यासारखं काळजी दुसरं कोणीच कधीच करू शकत नाही.

मग जर आई संपावर गेली तर काय बर होईल?

मुळात या कल्पनेनेच माझ्या अंगावरती आधी काटा आला! कारण आपण आईवर जन्मल्यापासूनच खूप अवलंबून असतो. अगदी आपल्या कपाटातील गोष्ट शोधण्यापासून ते आपल्याला जो खाऊ चालणार नाही तो न देता कितीही वाजले तरी आवडेल असा खाऊ तयार करून देण्यापर्यंत. सगळ्या गोष्टी या आपल्या आईच करत असते आणि फक्त कामांसाठी नाही तर मानसिक रित्या ही गोष्ट विचार करणे फार त्रासदायक आहे.

आपण शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या आईवर प्रचंड अवलंबून असतो. आई आपले प्रत्येक काम अगदी रोज न थकता करते. आपल्याला प्रत्येक गोष्टीत समजून घेते. जरी आपल्यावर चिडली तरी ते थोड्याच काळासाठी असते. थोड्या वेळाने तिच आपल्या पिल्लाला भेटायला आतुर असते. आपण तिच्याशी न बोलता एक क्षणही नाही राहू शकत, मग अशावेळी जर आई संपावर गेली आणि घरात दिसली नाही तर? मनाची किती बिकट अवस्था होईल, याची मी कल्पनाच करू शकत नाही. जगात आपल्याला सगळ्यात जास्त आईच समजून घेते. आई आपले सगळे उद्योग धंदे सोडून फक्त बाळाची काळजी घेते. ती कधीच दमत नाही. रोज काम करून सुद्धा आईला कधीच कोणी पगार देत नाही आणि मुळातच आई आहे म्हणून हे आयुष्य खूप सुंदर आहे ती नसेल तर जगायला काही अर्थ येणार नाही.

आईविना घराला घरपण येणार नाही. मी तर स्वप्नात देखील आईविना आयुष्य जगण्याची कल्पना करू शकत नाही. एक-दोन दिवस जरी आई गावाला गेली असली आणि आपल्याला घर सांभाळायचे असले की जाणीव होते की, आई किती गोष्टी घरात असताना करते, किती काम करते आणि घर स्वच्छ ठेवण्यासाठी किती कष्ट करायला लागतात. नुसते घर झाडून काढायला अर्धा तास निघून जातो!

ती तर घरातील धुणी-भांडी, केर, लादीसह अगदी दहा ते पंधरा मिनिटात सगळी कामे आटोपते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती कधीच या कामातून सुट्टी घेत नाही. तिला अगदीच बरं नसेल तरच ती फक्त एखाद्या दिवशी काम करत नाही. नाहीतर रोज ती या सगळ्या कामांना जुंपलेलीच असते.

जर आई संपावर गेली तर नुसत्या माझ्या एकटीचेच नाही तर घरातल्या सगळ्याच व्यक्तींची कामे खूप जास्त प्रमाणात अडून राहतील, कारण आईचे नियोजनच तसे असते. रोज सकाळी उठल्यावर ती केर-लादी आधी पूर्ण करून स्वयंपाकाला लागते. बाबांचा डबा देते. ताईचे जेवण बनवते. आमच्या छोटू कुत्र्याला फिरायला घेऊन जाते. आजी-आजोबांचं नाष्ट्याचं बघते. मला शाळेत सोडायला जाते. या सगळ्या गोष्टी आई करते. त्यामुळे जर आई संपावर गेली, तर आमच्या कोणाचीच कामे सुरळीत रित्या होणार नाहीत. आई घरात असली की ती घर अगदी आरशासारखं चकाचक ठेवते. पण ती दोन दिवस जरी गावी गेलेली असली तरी आमची सगळ्यांची धांदल उडते. कोणते काम कोणी करायचे, यासाठी आम्ही आधी भांडतो आणि मग ठरल्यावर ते काम करायला सुरुवात करतो. ते आईसारखं पटकन आणि नीट व्यवस्थित होतच नाही. उलट आम्ही अजून काम वाढवून ठेवतो. ही सगळी त्रेधातिरपीट बघून आई घरी आली की हसायला लागते!

त्यामुळे जर आई संपावर गेली तर घरातील कोणतीच व्यक्ती सुरळीतपणे जगू शकत नाही! आणि आई काय फक्त काम करण्यासाठीच असते असे नाही. ती नसली तर या जगात कोणीच तिच्या इतकं मायेने जवळ घेणार नाही! भीती वाटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आठवते ती ‘आईची कुशीच’. मी तर लहानपणी वीज चमकल्यावर देखील घाबरून आईला जाऊन मिठी मारायचे. काही कारणाने रडल्यावर अश्रू पुसणारी ही आईच असते. थोडंसं जरी लागले तरी तोंडातून आपसूक ‘आई ग!’ हाच शब्द बाहेर येतो त्यामुळे आईविना हे आयुष्य भकास होऊन जाईल. आई संपावर जाणार! असा विचार केला तरी इतके विचार मनात येऊन गेले. नकोच तो संप आणि नकोच तो आईचा विरह!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *